शांतिगिरी महाराजांनी केली ईव्हीएमची पूजा! गुन्हा दाखल होणार?
20-May-2024
Total Views | 53
नाशिक : राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी सकाळी मतदान केल्यानंतर ईव्हीएमला हार घातला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लोकसभेच्या अंतिम आणि पाचव्या टप्प्यासाठी नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महारांजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराजांनी मतदान केलं.
मात्र, त्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर तक्रार दाखल झाल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिकमध्ये महायूतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार असलेले शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत आहे.