हरियाणा : दहाही जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार!

    20-May-2024
Total Views | 66
Article on BJP targets Perfect 10 in Haryana

२०१९च्या निवडणुकीत भाजपने हरियाणामधील लोकसभेच्या सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. त्या कायम राखण्याचा भाजपचा निर्धार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हरियाणा सरकार अस्थिर करण्याचेही प्रयत्न झाले. पण, त्यामध्ये विरोधकांना यश मिळाले नाही. तशीच अवस्था लोकसभा निवडणुकीतही विरोधकांची होणार आहे. येत्या २५ तारखेला हरियाणातील दहा मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
 
लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी देशाच्या विविध भागांमध्ये पार पडले. आता सहाव्या टप्प्यासाठीचे मतदान येत्या २५ मे रोजी होत असून, यामध्ये हरियाणा राज्यातील दहा जागांचा समावेश आहे. २०१९च्या निवडणुकीत या राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण, आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणातील भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. पण, तो सफल झाला नाही. त्या राज्यात काही आमदारांनी मनोहरलाल खट्टर सरकारचे समर्थन काढून घेतले होते. पण, ते सरकार पडले नाही. भाजप नेतृत्वाने त्या राज्यात मुख्यमंत्रिपदाची धुरा ५४ वर्षांचे नायबसिंह सैनी यांच्याकडे सोपविली आणि लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याच्या दिशेने भाजपने तयारी सुरू केली. भाजपच्या हातून एक राज्य काढून घेण्याचे विरोधकांचे मनसुबे पार फसले.
 
भाजप हरियाणातील दहा जागा लढवत असून, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह दहा तगडे उमेदवार भाजपने उभे केले आहेत. अंबाला मतदारसंघातून बंटो कटारिया उभे असून, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे वरुण चौधरी उभे आहेत. कुरुक्षेत्र मतदारसंघात भाजपने नवीन जिंदल यांना उभे केले आहे. त्यांच्याविरुद्ध ‘आप’चे सुशील गुप्ता उभे आहेत. सिरसामध्ये भाजपचे अशोक तंवर उभे आहेत, तर काँग्रेसने शैलजा कुमारी यांना उभे केले आहे. कर्नाल मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उभे आहेत, तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने दिव्यांशू बुद्धिराजा यांना उभे केले आहे. हिस्सारमध्ये भाजपने रणजीतसिंह चौताला यांना उभे केले आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे जयप्रकाश उभे आहेत. सोनीपतमध्ये भाजपचे मोहनलाल बदौली उभे आहेत, तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी उभे आहेत. रोहतक मतदारसंघातून भाजपचे अरविंदकुमार शर्मा उभे असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे दीपेंद्रसिंह हुड्डा उभे आहेत. भिवानी - महेंद्रगढ मतदारसंघातून भाजपचे धर्मबीरसिंह चौधरी यांच्या विरुद्ध काँग्रेसने राव दान सिंह यांना उभे केले आहे.
 
 गुडगाव मतदारसंघातून भाजपचे राव इंद्रजीतसिंह यांच्याविरुद्ध काँग्रेसने राज बब्बर यांना उभे केले आहे, तर फरिदाबाद मतदारसंघातून भाजपचे कृष्णपाल गुर्जर यांच्याविरुद्ध काँग्रेसने महेंद्र प्रताप सिंह यांना उभे केले आहे. या दहा जागांचा विचार करता ‘इंडी’ आघाडीसाठी केवळ एक जागा सोडण्यात आली असून, ती ‘आप’ला देण्यात आली आहे. बाकी सर्व जागा काँग्रेस लढवत आहे. भाजप, काँग्रेस, आतापर्यंत भाजपसमवेत असलेला दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष, आम आदमी पक्ष हे प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्याशिवाय मान्यता नसलेले असे बरेच पक्ष त्या राज्यात आहेत. पण, खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच! मतदान अगदी तोंडावर आले असताना हरियाणा काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे त्या राज्याचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी इशारे देऊनही काँग्रेसमधील गटबाजी संपण्याचे नाव नाही.या निवडणुकीत भाजपने प्रचाराचा दणका लावला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध नेत्यांनी हरियाणा राज्य ढवळून काढले आहे.
 
काँग्रेसनेही आपली ताकद लावली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याही सभा त्या राज्यात होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभेत या निवडणूकरुपी कुरुक्षेत्रात एकीकडे विकास आहे आणि दुसरीकडे ‘व्होट जिहाद’ आहे, असे म्हटले आहे. अंबाला, सोनीपत येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘कलम ३७०’ पुन्हा आणण्याचे स्वप्न बघणे काँग्रेसने सोडून द्यावे, असे बजावले. गोहाना येथील प्रसिद्ध ‘मातुराम की जिलेबी’चा संदर्भ देऊन त्यांनी विरोधकांवर टीका केली. ‘पाच वर्षांमध्ये आम्ही पाच पंतप्रधान देऊ,’ असे जे विरोधकांनी म्हटले त्यावर बोलताना, पंतप्रधानपद म्हणजे काय ‘मातुराम की जिलेबी’ आहे काय, असे त्यांनी विरोधकांना फटकारले, तर अंबाला येथील सभेत बोलताना, आपल्या ‘धाकड’ सरकारने ‘कलम ३७०’ची भिंत कबरस्तानात गाडून टाकली आहे, असे स्पष्ट केले. विरोधकांची आघाडी म्हणजे, घोटाळेबाजांची गँग आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. काँग्रेसचे नेते दिल्ली आणि हरियाणात ‘आप’चा ‘झाडू’ हातात घेतात, पण पंजाबमध्ये ‘झाडूवाला चोर हैं’ , अशा घोषणा देतात, याला काय म्हणायचे, असा प्रश्न त्यांनी केला.

काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन माजी मंत्री किरण चौधरी यांनी जाहीरपणे घडविले. ज्या मतदारसंघांतून आपण पाच वेळा आमदार म्हणून निवडून गेलो, त्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार राव दान सिंह येतात, त्याची कल्पनाही आपणास दिली जात नाही. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोनही उचलत नाहीत. असे करून आमचा अपमान केला जात आहे, असे किरण चौधरी यांनी म्हटले आहे. भूपेंद्र हुड्डा भिवानीत येतात, पण त्याची आम्हाला कल्पनाही दिली जात नाही, अशी खंतही किरण चौधरी यांनी व्यक्त केली. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे हे एक लहानसे उदाहरण!काही माध्यमांनी एप्रिल २०२४, मार्च २०२४ मध्ये जे सर्वेक्षण केले होते, त्यामध्ये एका सर्वेक्षणात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नऊ आणि विरोधकांना एक जागा मिळेल, असे म्हटले होते, तर दुसर्‍या सर्व्हेत क्षणात, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आठ आणि विरोधकांना दोन जागा मिळतील, असे म्हटले होते. पण, २०१९च्या निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. त्या कायम राखण्याचा भाजपचा निर्धार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हरियाणा सरकार अस्थिर करण्याचेही प्रयत्न झाले. पण, त्यामध्ये विरोधकांना यश मिळाले नाही. तशीच अवस्था लोकसभा निवडणुकीतही विरोधकांची होणार आहे. येत्या २५ तारखेला हरियाणातील दहा मतदारसंघांत मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या विविध सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, पुन्हा एकदा त्या राज्यात सर्वत्र भाजपचाच झेंडा फडकेल, अशी चिन्हे आहेत.
 
 
दत्ता पंचवाघ


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121