काँग्रेस : लडकी हूँ रोती हू!

    02-May-2024   
Total Views |
radhika khera

नुकतेच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेरा रडत रडत छत्तीसगढच्या राजीव भवनातून बाहेर आल्या. मागे काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये भाजपविरोधात मुलगी म्हणायची ‘लडकी हूँ लड सकती हूँ।’ पण, हे वाक्य केवळ प्रियंका गांधींसाठी होते बरं का! ‘सोनियांची मुलगी’ म्हणून त्याच निवडणूक लढणार आणि बाकीच्या महिला नेत्यांच्या बाबतीत काय? तर ‘लडकी हूँ, रोही सकती हूँ’ हेच! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जांजगिरी चांपा जिल्ह्यात सभा होती. सभा संपल्यानंतर राज्याचे संचार प्रमुख आणि काँग्रेस नेता सुशिला आनंद शुक्ला यांनी राधिका यांना अपमानित केले. अद्वातद्वा बोलले. त्यांना हाकलवून दिले आणि या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा काढला गेला. भयंकर अपमानित झालेल्या राधिका यांना अश्रू अनावर झाले. त्या रडत रडत राजीव भवनातून बाहेर आल्या. त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिले - ‘कौशल्या माता के मायके में बेटी सुरक्षित नहीं हैं। पुरुषवादी मानसिकता से ग्रसित लोग आज भी बेटियों को पैरों तले कुचलना चाह रहे हैं।’ म्हणजे, काँग्रेसमध्ये मुलगी सुरक्षित नाही, हे राधिका यांनी जाहीररीत्या कबूल केले. काँग्रेस पक्षात आजही महिलांना तथाकथित पुरूषवादी वर्चस्व असलेल्या मानसिकतेचे बळी व्हावे लागते? राधिका यांचा दोष काय, तर त्या स्त्री आहेत हाच? काँग्रेस पक्षातला हा लिंगभेद सर्वथा निंदनीयच. मागेही युवा काँग्रेसच्या पदाधिकारी युवतीने काँग्रेसचा राष्ट्रीय युवा अध्यक्ष लिंगभेद करतो, असे आरोप केले होते. अतिशय घाणेरडी मानसिकता? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून लिंगभेदाला हद्दपार केले. पण, काँग्रेस अजूनही लिंगभेदात अडकली आहे. राधिका खेरा यांनी यांसदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे म्हणे. पण, कारवाई झाली नाही. यावर राधिका खेरा यांनी म्हंटले आहे की, 
दुशिल को लेकर कका का मोह
एक लडकी की इज्ज्त से बढकर हैं...
अर्थात, काँग्रेसच्या सर्वेसर्वा नेत्यांना ना मुलीच्या इज्जतीपेक्षा स्थानिक राजकीय स्वार्थ महत्त्वाचा असे त्यांचे म्हणणे. कसल्या कसल्या अर्थहिन यात्रा काढून स्थानिक मुलीमहिलांसोबत फोटोशूट करणार्‍या राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये खरंच आता मुली-महिलांसाठी ‘लडकी हूँ रोही सकती हूँ’ हाच नारा योग्य आहे का?


डर अच्छा हैं...
“मुस्लिमांनी मतदान करू नये, यासाठीचा बंदोबस्त भाजपने केला आहे,” असे नुकतेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता यांचे मुस्लीमप्रेम तर शब्दातीत. हे याआधीही अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. अर्थात, संविधानाने हक्क दिलेला आहे. कुणी कुणाला आवडून घ्यावे, कुणी कुणाला आपले मानावे, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण, ममता बॅनर्जी या संविधानिकरित्या भारत देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना सर्वधर्मीय नागरिक समान असायला हवेत. मुस्लीम मतदारांनीच भरघोस मतदान करावे, यासाठी त्यांचा जितका जीव तुटतो तितका जीव हिंदूंनी मतदान करावे, यासाठी तुटतो का? तर असे चित्र दिसत नाही. सध्या देश राममय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातले बहुसंख्य लोक घरातील आदरणीय, ज्येष्ठ कर्ताधर्ता व्यक्ती मानते, हे जगजाहीर. या सगळ्यामुळे प. बंगालमधील तृणमूलच्या गढीला यंदा खिंडार पडणार, हे सुनिश्चित. राममय झालेला हिंदू अयोध्येत रामललाची मूर्ती स्थापन करणार्‍यांना मतदान करेल, हे ममता यांना माहिती आहे. त्यामुळे हिंदू मतदार काही आपल्याला मतदान करणार नाहीत. मग उरले कोण? तर ममता यांचे सौख्याचे पारंपरिक मतदार म्हणजे मुस्लीम मतदार. त्यांनी एकगठ्ठा भरघोस मतदान केले की, लोकसभेमध्ये तृणमूलचेच उमेदवार जिंकतील, अशी खुणगाठ ममता यांनी बांधलेली. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या तुष्टीकरणाची एकही संधी ममता सोडत नाहीत. रामनाम ऐकताच त्यांना भयंकर संतापताना देशाने पाहिले आहे. अयोध्येच्या रामललांच्या मंदिराबाबतही त्यांची भूमिका जगाने पाहिली. संदेशखालीमध्ये ममतांच्या तृणमूलच्या नेत्याने मागासवर्गीय मुलींवर अत्याचार केले. अत्याचार्‍यांना तृणमूल सरकारने पाठीशी घातले. मुस्लीम मतदारांना भुलवण्यासाठी ममता हे सगळे करत असाव्यात. या अनुषंगाने पंतप्रधान मोदी निवडणुकीदरम्यान सभा घेतात, यावरही त्यांचा आक्षेप. त्या म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींची भीती वाटते.’ ममता यांना भीती का वाटते? कर नसेल तर डर कशाला? घाबरण्यासारखे कृत्य त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने काही केलेे असावे का? मनासारखा दुसरा भविष्यवेत्ता नसतो. केलेल्या दुष्कृत्यांची कबुली मनच देते. त्यामुळे तर ममता घाबरत नाहीत ना? बाकी प. बंगालचे हिंदू म्हणत आहेतच की, ‘डर अच्छा हैं!’
-९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.