तिनिसांजा सखे, मिळाल्या!

    02-May-2024   
Total Views | 123
 
tinhi sanja sakhe milalya
तिनिसांजा सखे, मिळाल्या,
संध्यावेळेला तिन्ही सांजा का म्हणतात? सांगते, त्याआधी भा रा तांबे यांच्या या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. लता मंगेशकरांनी गायलेलं भा रा तांबेन्च हे भावगीत. सांज हा शब्दच मुली संधी या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. संधी म्हणजे दोहोंना जोडणारी. रात्र आणि पहाटेस जोडणारी, दिवस आणि रात्रीस पुन्हा जोडणारी. मग यातली तिसरी सांज ती नेमकी कोणती? खरेतर सूर्य उगवतो त्यावेळी दुसरी सांज होते आणि संध्यासमयी तो अस्तास जातो ती तिसरी. पहिली सांज होते ती पहाटेस पूर्वेकडे किंचित फटफटू लागतं, आकाश कोनाड्यातून उजळाल्यागत तांबडं होऊ लागतं तेव्हा. तर या तिन्ही संधी झाल्या, तिन्ही सांजा एकत्र झाल्या. दिवस सुफळ संपूर्ण झाला. एक झाला. पण तरीही तू अन मी अजूनही वेगळेच आहोत. पहा, तुला अगदी वाचन देतो मी, आजपासून माझ्यासाठी केवळ तूच महत्वाची आहेस. तूच जवळची आहेस. ते म्हणतात,
तिनिसांजा सखे, मिळाल्या, देई वचन दे तुला
आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला
मिश्र यमन रागात गायलेलं हे भावगीत आहे. यमन राग आपल्या चांगलाच परिचयाचा असेल. शास्त्रीय संगीताचा कान असलेल्या सर्वांनाच कोणत्या न कोणत्या वयात किंवा कोणत्या वेळी हा राग आवडलेला असतो. यमन या शब्दाचा अर्थच मुली निसंदिग्धता असा आहे. संपूर्ण विश्वास. लोलुप मनाला आश्वस्त करणारा हा राग. आणि वरून त्यात शब्द भावगीताचे. पुढे त बोलतात,
कनकगोल हा मरीचिमाली
मारीचीमाळी म्हणजे सूर्य. आणि कणकगोल म्हणजे सुद्धा सूर्यच. सोन्याचा गोळा?
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा-
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला
वारा वाहून नेत असलेल्या या सुवर्णकाळाला, क्षितिजास भेटण्यासाठी उतावीळ झालेल्या सूर्यबिंबाला साक्षी ठेऊन तुझे हात हातात घेतो. एकदा हाती घेतलेला हात कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नसतो, तेव्हा हे अभिवचनच. एका प्रेमवेल्हाळ पुरुषी मनाने दिलेली एकात्मतेची ग्वाही.
आता बघा हं, एक होण्याची भाषा करणारा हा चापलूसह पुरुष पुढे काय करतो, तो त्याला हव्या असलेल्या त्याच्या स्त्रीची तुलना करतो. कशाशी? सौंदर्याशी. त्याला भावणाऱ्या सगळ्या सगळ्याशी. तांबे म्हणतात,
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत,
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत,
पाणि जसें मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत,
हृदयीं मी सांठवीं तुज, तसा जीवित जों मजला
अर्थात, हृदयनाथ मंगेशकरांनी या गीताला संगीत दिलंय. त्यातून लतादीदींचा आवाज. कवितेत तांबे आजपासून या शब्दाचा उल्लेख करतात म्हणून याचा काळ शोधावा वाटला. हे गीत आहे १९०२ चे. म्हणजे पहिला चित्रपट येण्याच्याही आधीचा काळ. चित्रपट संस्कृती रूजू लागल्यापासून स्त्रीपुरुष प्रेम आपण पाहत आहोत. त्यापूर्वीचे त्यांचे भावाविषव कसे असेल हे मात्र या कवींच्या कवितेतूनच लक्षात येते. भा. रा. तांबे ग्वाल्हेर घराण्याचे राजकवी होते. ग्वाल्हेर घराणे म्हणजे मुळात रसिक, तेथील राजकवी, काय तो त्याचा थाट? आज १०० हुन अधिक वर्षे होऊन गेली तरीही या प्रेमापेक्षा अवीट गोडी असलेलं हे गीत आपल्या ओठांवर तेवढेच जिवंत आहे. आजही ऐकताना, गुणगुणताना आपण इव्हसारखे, त्यांच्यासारखेच विव्हल होतो. शेवटी आपले कविवर्य म्हणून गेले आहेतच कि, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असतं. अगदी तसेच.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121