मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची निर्घृण हत्या
तंदुरी चिकनच्या पैशावरून झाला वाद; पाच आरोपींना अटक
02-May-2024
Total Views | 185
मुंबई (प्रतिनिधी) : मुलुंड पश्चिम परिसरात अक्षय नार्वेकर (Akshay Narvekar) (३०) या तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यात अक्षयचा मित्र आकाश हा देखील गंभीर जखमी झाला असून त्यास सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तंदुरी चिकनच्या पैशावरून वाद झाल्या कारणास्तव संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती निदर्शनास येत आहे. मुलुंड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. अक्षय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता.
किसन नगर येथील इम्रान खानच्या चिकन सेंटरवर तंदुरी चिकन खरेदी करण्यासाठी अक्षय रविवारी दुपारी गेला होता. तंदुरी चिकन दिल्यानंतर इम्रानने अक्षयकडे २०० रुपये मागितले. मात्र अक्षयने आपल्याकडे रोख रक्कम नाही, त्यामुळे नंतर देतो असे सांगितले असता इम्रानने अक्षयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अक्षयने ऑनलाईन पेमेंट करून वाद तात्पुरता मिटवला होता. मात्र सायंकाळी इम्रानचा भाऊ सलीम याच्या चिकन सेंटरवर अक्षय गेला असता इम्रानही तिथे आला. दुपारी झालेल्या वादावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान सलीम आणि इम्रानने अक्षयला मारहाण केली.
स्थानिक लोकांनी वाद मिटवला व अक्षयला तेथून निघून जाण्यास सांगितले. अक्षय व आकाश काही अंतरावर जाताच सलीम व इम्रान यांनी अन्य तीन जणांसह अक्षय व आकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांवरही चाकू व लोखंडी रॉडने हल्ले केले. त्यानंतर पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले. सदर घटनेप्रकरणी मुलुंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खून, कट रचणे आणि खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. इम्रान महमूद खान (२७), सलीम महमूद खान (२९), फारुख बागवान (३८), नौशाद बागवान (३५) आणि अब्दुल बागवान (४०) अशी आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.