रशिया-युक्रेन युद्ध असो वा इस्रायल-हमास संघर्ष, या युद्धातून जगाला बरेच धडे मिळाले. यामध्ये सैन्य व्यवस्थापनापासून ते सैन्याची क्षमता, रणगाड्यांच्या मर्यादा, क्षेपणास्त्रांंची सरशी अशा अनेक बाबतीतील निरीक्षणे समोर आली. त्यानिमित्ताने जागतिक युद्धसंघर्ष आणि भारताने यातून घ्यायचा धडा याविषयी...
आज जगभरात तब्बल 60 ठिकाणी युद्ध किंवा संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.यामध्ये दोन महत्त्वाच्या युद्धभूमी म्हणजे युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमासची युद्धभूमी. या युद्धभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे, तंत्रज्ञान वापरले जात आहे. या युद्धभूमी प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठले तंत्रज्ञान जास्त प्रभावी आहे आणि कुठले नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. विमाने विरुद्ध विमानविरोेधी क्षेपणास्त्रे यामध्ये क्षेपणास्त्रांचा विजय होताना दिसतो.रणगाडे विरुद्ध अॅण्टी टँक क्षेपणास्त्रांमध्ये क्षेपणास्त्रेच जिंकली आहेत. रणगाड्यांची बरबादी ही दोन्ही देशांच्या रणगाडा लढाईत झाली नाही. त्यांना छोट्या, कमी किमतीच्या, लपून आणि लांबून फायर केलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी बरबाद केले. रशियाच्या काळ्या समुद्रातील मोठ्या विमानवाहू नौका, इतर युद्ध नौका, लांबून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांनी बुडवल्या आणि त्यानंतर रशियन नौदल लढण्याकरिता पुढे आलेच नाही. क्षेपणास्त्रांमुळे होणारे नुकसान असह्य झाल्यामुळे रशियन हवाई दलाने या लढाईमध्ये फारसा भाग घेतला नाही. कारण, ड्रोन्स हवाई दलापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रभावी ठरलेले आहेत.
महागडी लढाऊ जहाजे, फायटर विमाने, रणगाडे हे पांढरे हत्ती
शत्रूची जहाजे, फायटर विमाने, रणगाडे, मोठी शस्त्रे जी आकाशातून ओळखता येतात, त्यांना लांबून क्षेपणास्त्रे फायर करून बरबाद करता येते. युक्रेन युद्धामुळे अजून एक बाब सिद्ध झाली, ती म्हणजे, केवळ सरकार आणि सैन्य लढाई करू शकत नाही. शत्रूशी लढाई करण्याकरिता देशातील इतर संस्था आणि नागरिकांची मदत अत्यंत गरजेची आहे.
देशाच्या युद्धभूमीवर इतर देशांच्या उपग्रहांचेही लक्ष
युक्रेनला उपग्रहामार्फत मिळालेली सर्वात जास्त माहिती, अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या उपग्रहांनी दिली आहे. म्हणून भारतालासुद्धा आपली युद्धक्षमता आणि जास्त दिवस युद्ध लढण्याचा ‘स्टॅमिना’ वाढवण्याकरिता, देशातील इतर संस्थांचा कसा वापर करता येईल, यावर लक्ष द्यावे लागेल. याशिवाय मित्रदेशांकडून मिळणारी गुप्तचर माहितीसुद्धा आपल्या युद्ध नियोजनात सामील करावी लागेल.मात्र, या युद्धामध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, शस्त्रे आणि शस्त्र चालवणारा सैनिक यामध्ये, सैनिक हा जास्त महत्त्वाचा आहे.
रशियामध्ये लढण्याकरिता लढाऊ युवकांची कमतरता
रशियामध्ये लढण्याकरिता लढाऊ युवकांची संख्या कमी पडत आहे. कारण, श्रीमंत रशियन आधीच रशिया सोडून युरोप आणि इतरत्र पळून गेले आहेत. अनेक रशियन युवक सैन्यात भरती व्हायचे नाही, म्हणून देशामध्ये कुठेतरी लपून बसले आहेत. युद्ध थांबवा म्हणून रशियामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने होत आहे.रशिया मोठ्या प्रमाणामध्ये ‘प्रायव्हेट आर्मीज’ (ाशीलशपरीळशी) म्हणजे भाडोत्री सैनिक वापरत आहे, तरीपण त्यांना लढणार्या सैनिकांची कमी भासत आहे. सैन्यात नोकरी करणे सगळ्या युवकांना अनिवार्य केलेले आहे, तरीपण मारून मुटकून पाठवलेले सैनिक युद्धभूमीवर पुरेशा प्रमाणामध्ये लढताना दिसत नाही. थोडासाही कठीण प्रसिद्ध आलाच, तर ते पळून जातात किंवा थेट शरणागती पत्करतात. अनेक भारतीय तरुणसुद्धा या लढाईमध्ये अडकलेले आहेत. कारण, त्यांना सैनिक म्हणून रशियाने युद्धभूमी वरती पाठवले होते. वेगवेगळ्या लढाऊ जमाती म्हणजे गुरखा वगैरेसुद्धा या युद्धभूमीवरती प्रवेश करत आहेत, परंतु त्यांची संख्या कमी पडत आहे.
युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय 45 वर्षे
सैनिकांच्या बाबतीत युक्रेनची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. त्यांना लढाऊ सैनिकांची कमतरता जाणवते. कारण, त्यांचे हजारो सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत. युक्रेनचे अनेक नागरिक विविध कारणे काढून निर्वासितांबरोबर युक्रेनच्या बाहेर पळून गेले आहेत. युक्रेनचे अनेक युवक युद्धभूमीवर जायला अजूनही तयार नाहीत.प्रारंभी असा प्रचार करण्यात आला होता की, युक्रेनचे नागरिक हे देशावर जास्त प्रेम करतात आणि देशाकरिता लढण्याकरिता तयार आहेत. मात्र, हे अर्धसत्य. अनेक नागरिक स्वतःचा प्राण वाचवण्यामध्येच गुंतलेले दिसतात.तरुणांची संख्या कमी असल्यामुळे युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय आहे 45 वर्षे. याचाच अर्थ, तरुणांच्याऐवजी मध्यमवयीन सैनिक युद्धभूमीवर जास्त आहेत. 45 वर्षांच्या मध्यमवयीन सैनिकाची जर 25 वर्षीय तरुण सैनिकांशी झटापट झाली, तर काय होईल? अर्थातच तरुण सैनिक जिंकेल. युरोपमधल्या अनेक लहान देशांत सैन्यात जाण्याकरिता तरुण मंडळीच उरलेली नाही.
युद्धभूमीवर कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती महत्त्वाची
चीनचीसुद्धा अवस्था अशीच दयनीय आहे आणि चिनी नागरिकसुद्धा सैन्यामध्ये जायला मागत नाही. एक श्रीमंत देश झाल्यामुळे बहुतेक चिनी नागरिक हे श्रीमंत मध्यमवर्गीय झालेले आहेत आणि यामुळे ते शहरात राहणारे नाजूक युवक बनले आहेत, जे ‘तिबेट’सारख्या युद्धभूमीवर जायला तयार नाही. सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा लडाख, अरुणाचल, सिक्कीममध्ये होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक शस्त्रांचा फारसा उपयोग नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता, स्टॅमिना, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता, यांची गरज आहे. भारतीय सैन्यात हे गुण आढळतात.
चिनी सैनिक एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात, त्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते कसे व्हावे, हे असते. चिनी सैनिक प्रशिक्षण घेऊन फक्त दोन वर्ष सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्याने रोजीरोटीसाठी काय कमवायचे, याची काळजी त्यांना असते. परिणामी युद्धात लढण्यास त्या सैनिकांना रस नाही.सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा आहे. भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत. ते एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच त्यांची ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत सुरू असते.
चिनी सैनिकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे, 70 टक्के चिनी सैनिक हे एकल कुटुंबातील आहेत. चीनच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा परिपाक म्हणून एका कुटुंबात एकच मूल असल्याने त्यांना युवराजासारखे मोठे करण्यात आलेले असते. परिणामी सैन्यात आलेल्या सैनिकांमध्ये शिस्त नाही, आरामाची जीवनशैली, कॉम्प्युटरचे गेम खेळणे, मोबाईलचे वेड इ. अनेक वाईट सवयी चिनी सैनिकांमध्ये दिसून येतात.‘गलवान’मध्ये आपले कमांडिंग अधिकारी कर्नल बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने कमी असलेल्या भारतीय सैनिकांनी चिन्यांवर हल्ला करून त्यांना कसे रक्तबंबाळ केले, हे आपण पाहिले आहे.
युक्रेन, रशिया, इस्रायल, हमासपासून भारत काय शिकू शकतो?
आपल्याकडे युवकांची काहीच कमी नाही. अजूनसुद्धा सैन्याची भरती म्हटली, म्हणजे हजारोच्या संख्येने युवक सैन्यात भरती होण्याकरिता येऊन पोहोचतात, ज्यामध्ये फारच थोड्या युवकांना सैन्यात घेतले जाते. मात्र, चीन, पाकिस्तानबरोबर दीर्घकाळ महायुद्धाकरिता मोठ्या संख्येने सैनिकांची गरज भासेल. त्यावेळी सैन्यात भरती होण्याकरिता नागरिकांच्या मनामध्ये आपल्याला देशाकरिता काहीतरी करण्याची वृत्ती, देशभक्ती, देशप्रेम हे जागृत करावे लागेल. तसे झाले तरच ते धोकादायक परिस्थितीमध्ये सैन्यात भरती होतील. यामुळे महायुद्धाच्या वेळेस सैन्यात सैनिकांची कमतरता जशी रशिया, युक्रेन, युरोप आणि इतर देशात निर्माण झाली आहे, तशी भारतात निर्माण होणार नाही.