मुंबई, दि,१८: प्रतिनिधी भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
मुंबईला लागूनच असलेले माथेरान हे लहान मुलांपासून ज्येष्ठ्य नागरिकांसाठी सुट्टीचे सर्वात आवडते ठिकाण आहे. तर याठिकाणी धावणारी टॉय ट्रेन सेवा जी नॅरो गेज मार्गावर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते ही विशेष आकर्षणाचा विषय असते. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि १९०७ मध्ये ही टू गेज लाईन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. तर अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते. सद्यस्थितीत नेरळ-माथेरान येथे चालविण्यात येणार्या टॉय ट्रेनचे इंजिन हे डिझेलवर चालते. याच इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. जेणेकरून सदर इंजिन सुरळीत चालावे आणि त्याचे ऐतिहासिक सौंदर्य देखील राखता यावे. हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता. यात सध्याच्या इंजिनचे हुड काढून टाकणे, हुड सारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली आणि नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकर्ससह सजावट करणे यांसारख्या गोष्टींचा यात समावेश होता.