स्वाक्षरीचे ‘छंदोमयी’ प्रसाद देशपांडे

    17-May-2024   
Total Views |
Prasad Deshpande

विविध वस्तूंचा संग्रह करणारी जगभरात अनेक माणसे असतात. मात्र, अशा अनोख्या संग्राहकांना एकत्र आणणार्‍या नाशिकच्या छंदोमयी प्रसाद देशपांडे यांच्याविषयी...
 
नाशिकमध्ये 1973 साली जन्मलेल्या प्रसाद साहेबराव देशपांडे यांना बालपणापासून वाचनाची विशेष आवड.वडील एमएसईबीमध्ये नोकरीला, तर आई गृहिणी. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सीडीओ मेरी हायस्कूलमधून पूर्ण केले. त्याकाळी मोबाईल, व्हिडिओ गेम्स नव्हते. त्यामुळे सुट्टीत काय करायचे, असा प्रश्न पडे. त्याकाळी वाचनालयातून ‘चांदोबा’, ‘चंपक’ यांसारखे त्याचबरोबर अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके आणून वाचणे, नाणी गोळा करणे, पोस्टाची तिकिटे गोळा करणे असे छंद प्रसाद जोपासू लागले.पुस्तक वाचनामुळे ज्ञानातही भर पडायची. आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला पत्र पाठवून त्यांच्या संदेशासह स्वाक्षरी संग्रहित करण्याचा छंद त्यांना जडला. नाशिकमध्ये तसे मोठमोठे साहित्यिक असल्याने त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष स्वाक्षरी घेण्याचाही आनंद मिळे.
ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार नाशिकचे वैभव वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाला. त्यावेळी, प्रसाद यांच्या शाळेत त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्याकाळी प्रसाद यांनी त्यांच्या अनेक कविता, कथा वाचलेल्या असल्याने आणि मराठीच्या शिक्षकांनी कुसुमाग्रज यांच्याबद्दल भरभरून सांगितल्याने शिक्षकांच्या मदतीने त्यांची स्वाक्षरी घेतली. या महान लेखकाच्या स्वाक्षरीने स्वाक्षरी संग्रहाची सुरुवात त्यांनी केली. मग शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ज्येष्ठ नाटककार लेखक वसंत कानेटकर, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, आप्पा टिळक अशा लेखकांच्या कविता कथा वाचल्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या स्वाक्षर्‍या प्रसाद घेऊ लागले. जसजशा स्वाक्षर्‍या वाढू लागल्या, तसतसा त्यातील आनंद आणि अजून वेगवेगळ्या लेखकांच्या स्वाक्षर्‍या मिळविण्याची धडपड सुरू झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत गोदाकाठी मे महिन्यात 30 दिवस ‘वसंत व्याख्यानमाले’च्या ज्ञानयज्ञात अनेक विषयांवरच्या लेखकांची, तज्ज्ञांची व्याख्याने ऐकून त्यांच्या स्वाक्षर्‍या मिळविण्याचा आनंद घेऊ लागले.

अनेक महान मान्यवरांची व्याख्याने ऐकून यातून त्यांच्या यशाची रहस्ये, त्यांचे अनुभव ऐकून प्रभावित होऊन त्यांच्या स्वाक्षर्‍या प्रसाद यांनी संग्रहित केल्या. त्या काळात मोबाईल नसल्याने आणि वेळेवर छायाचित्रकार मिळत नसल्याने, ते क्षण छायाचित्रात कैद करता आले नाहीत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी प्रसाद यांनी स्वाक्षर्‍या आणि नाणी संग्रहाचा छंद कायम ठेवला. 1995 साली नोकरी लागल्यानंतरही ते या छंदासाठी आवर्जून वेळ देत होते. मोबाईलयुग अवतरल्याने त्यांनी पत्र लिहिणे आणि पुढे नाणी संग्रह थांबविला. आपण जसा संग्रह करत आहोत, तसे आणखी कोण करत असेल, असा प्रश्न प्रसाद यांना पडला. तेव्हा त्यांनी विविध वस्तूंचा संग्रह करणार्‍या संग्राहकांची भेट घेतली. पुढे नाशिकमधील अशा हौशी संग्राहकांचा त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू केला. स्वाक्षरी, नाणी, पोस्ट, शंखशिंपले, गारगोट्या, किचेन, जुन्या वस्तू, शस्त्र, प्राण्यांचे दागिने, मोबाईल व्हाऊचर, दगड, माती अशा विविध संग्राहकांना त्यांनी एकत्र आले.
 
महाराष्ट्रभरातील संग्राहक यामध्ये सामील झाले. प्रसाद यांनी पहिली स्वाक्षरी कुसुमाग्रज यांची घेतली होती, त्यांचा ‘छंदोमयी’ नावाचा काव्यसंग्रह आहे. हेच नाव प्रसाद यांनी ग्रुपला दिला. या ‘छंदोमयी’ ग्रुपमध्ये पुढे सदस्यांची संख्या वाढत गेली. यात कोणताही व्यवहार होत नाही. एकमेकांचा संग्रह कसा वाढेल, अनुभव कसा वाटता येईल, हा मुख्य उद्देश या ग्रुपचा आहे. प्रसाद यांच्याकडे अनेक मान्यवरांच्या एक हजारपेक्षा अधिक स्वाक्षर्‍यांचा संग्रह आहे. तसेच, 100 ते 150 नाणी त्यांच्या संग्रही आहेत. स्वाक्षरीसोबतच प्रसाद यांच्याकडे सदर व्यक्तीचे पूर्ण जीवनचरित्रदेखील आहे. असे जीवनचरित्रासह स्वाक्षरी प्रदर्शनही कुसुमाग्रज स्मारकात भरविण्यात आले. संगीत, गायन, राजकारण, अभिनय, क्रीडा, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्वाक्षरी त्यांच्या संग्रही आहे. यात अमिताभ बच्चन, व. पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, सुधीर फडके, श्रीधर फडके, राम नारायण, पद्मजा फेणाणी, धनराज पिल्ले, शरद पवार, प्रकाश आमटे, आशा भोसले, अमोल पालेकर अशा मान्यवरांचा समावेश आहे.
 
प्रसाद यांचा मुलगा परदेशातील नाणी संग्राहक असून, त्याच्याकडे 350 पेक्षा अधिक नाण्यांचा संग्रह आहे, तर भाची नेलपॉलिशच्या बाटल्यांचा संग्रह करत आहे. ‘छंदोमयी’ ग्रुपच्या माध्यमातून नाशिकच्या रुंग्टा हायस्कूलमध्ये 2023 साली 35 संग्राहकांचे दोन दिवसीय ‘छंदोत्सव’ प्रदर्शन भरविण्यात आले. प्रसाद हे शाळांमध्येही आपल्या संग्रहाचे प्रदर्शन मांडतात.
“प्रत्यक्ष सही घेतली तर वेगळा अनुभव मिळतो. संग्रहाच्या छंदामुळे माणसाची शोधक आणि अभ्यासू वृत्ती वाढते. सहीमध्ये आठवण आणि आनंद असतो. जुन्या गोष्टी सांभाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा त्या पुढे पाहायला मिळणार नाहीत,” असे प्रसाद सांगतात. विविध वस्तूंचा संग्रह करणारी माणसे अनेक असतात. मात्र, अशा संग्रह करणार्‍या माणसांचा संग्रह करणार्‍या, अर्थात त्यांना एकत्र आणणार्‍या प्रसाद देशपांडे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
 
पवन बोरस्ते


 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.