असा जाणिजे योगिराणा...

    15-May-2024   
Total Views |
meditation


दया, क्षमा, शांती या गुणांनी योगिराजाला ओळखता येते. या योगिराजाला भौतिक जगातून काहीही मिळवायचे नसते. तो विश्वात असल्याने कशाचाही लोभ त्याला नसतो. अमुक गोष्ट मिळाली काय आणि न मिळाली काय, त्यावर त्यांचे सुख अथवा समाधी अवलंबून नसते. कोठेही चिकटून राहण्याचा त्याचा स्थायिभाव नसल्याने, काही मिळाले नाही तरी त्याचा त्याला राग येत नाही अथवा त्याचे मन चलबिचल होत नाही. असे असले तरी तो आपला स्वाभिमान विसरत नाही. तो रागलोभाच्या पलीकडे असला अथवा क्षमाशील, दयावान असला तरी तो कधीही दैन्यवाणा नसतो.

थोर विचारवंत आचार्य विनोबा भावे यांनी मनाच्या श्लोकांच्या या गटाला ’सत्संगतीने हृदयपरिवर्तन’ असे शीर्षक देऊन सत्संगतीचे महत्त्व सांगितले आहे, हे आपण पाहिले. त्या गटातील काही श्लोकांचा अर्थगाभा आपण समजून घेत आहोत. ज्या सज्जनांनी आपल्या मनात निश्चयपूर्वक परमेश्वराची स्थापना केली आहे, ते ज्ञानाचा साठा असलेले हरिभक्त आपल्या भाषणाने श्रोत्यांच्या मनातील देवाविषयी असलेले संशय किंवा याबाबतीतली पूर्वीच्या मनाची संभ्रमित अवस्था नाहीशी करतात, असे स्वामींनी श्लोकांतून सांगितले आहे. इतर माणसे संभ्रम वाढवतात, पण, हे निष्ठावान हरिभक्त श्रोत्यांचे संभ्रम दूर करतात, नाहीसे करतात. याचे मुख्य कारण म्हणजे, अशा सत्प्रवृत्त हरिभक्तांच्या स्पर्शात, भाषेत श्रोत्यांचे विकारी मन शुद्ध करण्याचे सामर्थ्य असते. देवकार्य किंवा धर्मकार्य याबद्दल बोलायचे तर सर्वसाधारण माणसे उत्सवप्रिय असल्याने त्यांना देवापेक्षाही त्याच्या उत्सवात अधिक आस्था असते.

एकत्र जमून फुले, माळा सजावट, आरती, नैवेद्य हे प्रकार त्यांना प्रिय असतात. उत्साह वाढवणार्‍या त्या वातावरणाचा त्यांना विलक्षण अभिमान असतो, शाश्वत भगवंताविषयी विचारविनिमय न करता, आम्ही उत्सव कसा दणक्यात साजरा केला आणि पुढील वर्षी आणखी काय करणार, यात सारा वेळ जातो. हा सर्व प्रकार सात्त्विक असला तरी अहंकार वाढविणारा आहे. काही प्रसंगी प्रत्येक जण आपला अहंकार वाढवून दुसर्‍याला कमी लेखत असेल, तर वादाचे प्रसंग उद्भवतात. अर्थात, अध्यात्मदृष्ट्या याला ‘सत्संग’ म्हणता येत नाही. भक्तांनी परमेश्वराचे गुणगान वाढवणारे कार्यक्रम, उत्सव अवश्य करावेत, सर्वांनी मिळून केलेल्या भक्तीला महत्त्व आहे. पण, अनुषंगिक दुष्परिणाम टाकायला हवेत. परमेश्वराची निरपेक्ष भक्ती करणारे निष्ठावान भक्त स्वतःला ‘भगवंताचे दास’ म्हणवून घेतात, ते खरे हरिभक्त. त्यांची संगती हा खरा सत्संग, अशा सत्शील सद्भक्त हरिदासाबद्दल स्वामी म्हणतात की, ‘तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे। तया भाषणे नष्ट संदेह मोडे।’ असा हा संत दिसायला आपल्यासारख्या सामान्यांप्रमाणे असतो. त्याला पटकन ओळखता येत नाही. त्याला ओळखायचे तर त्याच्या अंतरंगातील गुणांनी त्याला जाणून घ्यावे लागते, अशा हरिभक्त योगिराजांच्या ठिकाणी कोणते गुण असतात, ते आता स्वामी पुढील श्लोकातून सांगत आहेत-
 
नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी।
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा।
यहीं लक्षणी जाणिजे योगिराणा ॥134॥

संत किंवा सत्पुरुषांचे बाह्यस्वरूप सर्वसामान्य माणसासारखे असल्याने नुसत्या दृष्टिभेटीत आपण संतांना खर्‍या अर्थाने जाणू शकत नाही. अशा सत्पुरुषांचे अंतरंग, गुणविशेष योग्यतेवरून त्यांना जाणता येते. त्यासाठी समर्थांनी अशा ... योगिराणाची लक्षणे वरील श्लोकात सांगितली आहेत. समर्थ भाषाप्रभू आहेत, त्यामुळे ही लक्षणे, गुणविशेष सांगण्यासाठी स्वामींनी चपखल शब्दांचा वापर केला आहे. कमीतकमी शब्दांत आशयपूर्ण विवेचन स्पष्ट करण्याची हातोटी स्वामींच्या बोलण्यात, लिहिण्यात आहे. अशा, मार्मिकपणे स्वामींनी या श्लोकातील ओळींची ’रचना केली आहे. या श्लोकांतील सर्व शब्द आपापल्या स्थानी अर्थपूर्ण आहेत की, त्यांना हलवता येत नाही. या सर्व लक्षणांनी योगिराजाचेे आकलन होते. ही लक्षणे स्पष्ट करून पाहू-
 
आजकालच्या जगात सर्वसामान्य माणसांना, काही लोकांनी पांघरलेल्या चांगुलपणाच्या मुखवट्याचा अंदाज येत नाही. ही भोंदू माणसे वरवर आपण गुणवान असल्याचे भासवतात, तेव्हा स्वामींनी सांगितलेली योगिराजाची लक्षणे काळजीपूर्वक पाहिली पाहिजेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. संताचे पहिले लक्षण म्हणजे, त्यांच्या ठिकाणी किंचितही गर्व नसतो. ते अहंकारापासून दूर असतात. परमेश्वराशी सतत अनुसंधानाने ते जोडलेले असल्याने तदाकार झालेले असल्याने गर्व त्यांच्या ठिकाणी उरत नाही. परमार्थाचे तत्त्व समजल्याने त्यांच्या ठिकाणी देहबुद्धी नाहीशी झालेली असते. देहबुद्धीच नसल्याने कोणत्या गोष्टीवर गर्व करावा? याउलट सामान्य माणसे देहबुद्धीत - आकंठ बुडालेले असल्याने त्यांना देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन विचार करता येत नाही.

 
त्यांच्या प्रत्येक कृतीतून देहाभिमान व्यक्त होतो. देहाभिमानातून ‘मी, माझे व माझेपणा’तून स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थी माणसाला अहंकारांची बाधा होते. क्षुल्लक गोष्टीचाही तो गर्वाने उल्लेख करतो. खर्‍या संताला ओळखायचे तर त्याच्या ठिकाणी अहंकार, गर्व नसतो, या लक्षणाने त्याला ओळखता येते. जो गर्विष्टपणे बढाया मारत असतो, तो संत असू शकत नाही. या योगिराजाचे पुढील लक्षण म्हणजे वीतराग. राग म्हणजे भौतिक गोष्टींविषयी आसक्ती, प्रेम, आकर्षण. दृश्य वस्तूंवरील प्रेमाचा ज्याने त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी या दृश्य वस्तूंबाबत वैराग्य उत्पन्न झाले आहे, त्याला ’वीतरागी’ असे म्हणतात. अशा देहबुद्धी विसर्जित वैराग्यसंपन्न आचरणाने त्याच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती ही लक्षणे दिसू लागतात. सद्विद्यालक्षणी पुरुषाचे वर्णन करताना स्वामींनी दासबोधात म्हटले आहे-

भाविक सात्त्विक प्रेमळ।
शांती क्षमा दयासील।
लीन तत्पर केवळ। अमृतवचनी 2-8.3
 
हा सद्विद्यालक्षणी पुरुष म्हणजेच स्वामींनी वरील श्लोकात सांगितलेला योगिराणा भगवंताच्या गुणांशी एकरूप झाल्याने या योगिराजाचे मन भौतिक गोष्टीत गुंतून राहत नाही. तो विरक्त असतो. त्यामुळे तो बाहेरच्या जगाशी क्षमाशील वृत्तीने राहतो. दया, क्षमा, शांती या गुणांनी योगिराजाला ओळखता येते. या योगिराजाला भौतिक जगातून काहीही मिळवायचे नसते. तो विश्वात असल्याने कशाचाही लोभ त्याला नसतो. अमुक गोष्ट मिळाली काय आणि न मिळाली काय, त्यावर त्यांचे सुख अथवा समाधी अवलंबून नसते. कोठेही चिकटून राहण्याचा त्याचा स्थायिभाव नसल्याने, काही मिळाले नाही तरी त्याचा त्याला राग येत नाही अथवा त्याचे मन चलबिचल होत नाही. असे असले तरी तो आपला स्वाभिमान विसरत नाही. तो रागलोभाच्या पलीकडे असला अथवा क्षमाशील, दयावान असला तरी तो कधीही दैन्यवाणा नसतो. भगवंताने ठेवले त्या स्थितीत तो समाधानी असतो. तो प्रयत्नवादी असतो, पण यश-अपयश ही ईश्वरेच्छा मानून तो सतत सुखी, समाधानी व चिंता आणि भय यांच्यापासून दूर असतो. अशा गुणांनी, लक्षणांनी युक्त संत सत्पुरुष भेटला तर तो ‘योग्यांचा राजा’ आहे, असे त्याला मनापासून ओळखता येते.



 

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..