नारकॉन्डमचा राजकुमार

    13-May-2024   
Total Views |

जगात केवळ अंदमान द्वीपसमूहातील नारकॉन्डम बेटावर आढळणारी धनेशाची प्रदेशनिष्ठ प्रजात म्हणजे नारकॉन्डम धनेश. माहिती, संशोधन आणि अभ्यासाच्या माध्यमातून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रजातीबद्दल आणि संशोधन अहवालाबद्दल माहिती सांगणारा हा लेख, यंदाच्या (Endemic Species Day) ‘जागतिक प्रदेशनिष्ठ पक्षीदिना’निमित्त...



narcondam hornbills
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अंदमान द्वीपसमूहातील केवळ नारकॉन्डम या चहूबाजूंनी समुद्राने वेढलेल्या बेटावर आढळणारा एक पक्षी म्हणजे नारकॉन्डम हॉर्नबिल. आशिया खंडामध्ये आढळणार्‍या धनेशांच्या प्रजातींपैकी सर्वात लहान अधिवास क्षेत्र असणारी ही प्रजात असून ती ’ब्यूसिरोटिडे’ या कुळात येते. मुख्यत्वे काळाभोर दिसणार्‍या या पक्ष्याचे पिसार्‍यांच्या रंगांवरून नर आणि मादी यांच्यातील वेगळेपण ओळखता येते. सामान्यपणे नराचे डोके लालसर तपकिरी रंगाचे असून मादी पूर्णपणे काळी असते. नारकॉन्डम धनेशाच्या डोळ्याभोवतीची त्वचा निळसर रंगाची असून नराचे बुबुळ नारिंगी लालसर असते तर, मादीचे बुबुळ तपकिरी रंगाचे असून त्याला फिकट पिवळी कडा असते.

जगभरात केवळ नारकॉन्डम बेटापुरतेच प्रदेशनिष्ठ असणारे हे पक्षी त्या बेटावर मोठ्या संख्येने आढळतात. अगदी कुठल्याही सामान्य पक्ष्याप्रमाणे नारकॉन्डम बेटावर सहजी नजरेस पडणारे हे पक्षी जंगलनिर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावतात. सामान्यपणे सगळीकडेच जंगलांचा शेतकरी म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी मोठ्या वृक्षांपासून ते अगदी वटकुळातील फळांच्या बिया(फायकसच्या बिया) छोट्या फळांच्या बिया पसरविण्यासाठी मदत करतात. तुम्हाला माहितीच असेल, धनेश ही पक्ष्याची प्रजात मुख्यत्वे फलाहारी असून त्यांच्या विष्ठेतुन येणार्‍या फळांच्या बियांमूळे नैसर्गिकरित्या झाडे उगवण्यास व पर्यायाने जंगलनिर्मिती होण्यासाठी मदतच होते. त्यामूळेच परिसंस्थेमध्ये धनेश महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात आढळणार्‍या धनेशाच्या 9 प्रजातींपैकी नारकॉन्डम बेटापुरती प्रदेशनिष्ठ असणारी ही प्रजात ’आययुसीएन’च्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट आहे.

का साजरा केला जातो प्रदेशनिष्ठ पक्षी दिन?
जगभरात आढळणार्‍या अनेक पक्ष्यांच्या यादीतील 1,350 पक्ष्यांच्या प्रजाती भारतात आढळतात, तर यातील जवळजवळ पाच टक्के पक्ष्यांच्या प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. प्रदेशनिष्ठ म्हणजे एखाद्या प्रदेशापुरतीच मर्यादित न राहणारी आणि इतरत्र कुठेही आढळणारी प्रजात. अशा प्रदेशनिष्ठ पक्ष्यांचे महत्त्व जाणून, त्यांच्याविषयी जनजागृती तसेच संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होण्यासाठी जागतिक प्रदेशनिष्ठ पक्षी दिन साजरा केला जातो. दरवर्षी, मे महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी हा दिवस साजरा केला जात असून विविध देशातील लोक पक्षीनिरिक्षण, पक्षी गणना किंवा जनजागृती असे विविध उपक्रम राबवत हा दिवस साजरा करतात.

नारकॉन्डम धनेश का आहे संकटात?

अंदमान द्वीपसमूहातील नारकॉन्डम बेटांवर असलेल्या उंदरांच्या फौजेमूळे या धनेश प्रजातीला धोका पोहोचत आहे. तसेच, संकटग्रस्त प्रजात असूनही मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार केली जाते. आययुसीएनच्या संकटग्रस्त प्रजातींमध्ये येणार्‍या धनेशाच्या या प्रजातीला शिकारीपासून संवर्धनाची गरज आहे. त्याचबरोबर, दुर्लक्षित राहिलेल्या या प्रजातीला संशोधन आणि अभ्यासाच्या दृष्टीनेही लक्ष देण्याची गरज आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार 1998 मध्ये या नारकॉन्डम अंदाजित लोकसंख्या साधरणतः 330 इतकी होती. 2019 मध्ये पुन्हा गणना केल्यानंतर या संख्येत वाढ झालेली दिसून आली असून ती 1000 वर गेली आहे. असे असले तरी केवळ नारकॉन्डम बेटावरच आढळणार्‍या या धनेशांना वाचविणे गरजेचे आहे कारण, या आकडेवारीप्रमाणे जगभरात केवळ 1000 नारकॉन्डम धनेशांची संख्या शिल्लक आहे. त्यामूळेच परिसंस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या नारकॉन्डम धनेशांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.


“नारकॉन्डम बेटावरील वनस्पतींचं वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्याला आकार देण्यात नारकॉन्डम धनेश महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या बेटावर अनेक अद्वितीय वैशिष्ट्ये असून या बेटावर अनेक फायकस प्रजातींचे वृक्ष तसेच सर्वाधिक नारकॉन्डम धनेशांची घनता वास्तव्यास आहे. अंदमान द्वीपसमूहातील इतर बेटांवर डिप्टेरोकार्प वृक्षांचे प्राबल्य आहे, नारकॉन्डममध्ये मात्र त्यांचा पूर्णपणे अभाव आहे. वनस्पती आणि प्राणी यांच्यातील जैव-भूगोल आणि पर्यावरणीय परस्परसंवादामुळे बेटाच्या जैवविविधतेवर मोठा प्रभाव दिसतो. तरी, या बेट परिसंस्थेच्या यशस्वी संवर्धनासाठी बेटाच्या इकोलॉजीच्या दृष्टीने अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे गरजेचं आहे.

 - डॉ. रोहित नानिवडेकर,
नारकॉन्डम धनेश संशोधक


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.