चोर, चोरी आणि आव...

    13-May-2024   
Total Views |
Raj Thackeray's criticism of Uddhav Thackeray
 
राज ठाकरे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. ‘लाव रे तो व्हिडिओ’चा शुभारंभही त्यांनी ठाण्यातील सभेत केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, व्हिडिओद्वारे पोलखोल केली. राज ठाकरे महायुतीत प्रत्यक्षरित्या सामील नसले, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.ठाण्यातील सभेत तर त्यांनी अक्षरशः उबाठा गटाची पिसेच काढली. ‘माझे वडील चोरले’, ‘माझा पक्ष चोरला’ असे आरोप उद्धव ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून वारंवार करतातत. पक्ष फुटला तरीही उद्धव यांची रडारड मात्र काही थांबली नाही. मुळात ‘पक्ष चोरला, बाप चोरला’ असे म्हणताना उद्धव यांनीही मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक चोरले होते. स्वतः चोरी करताना बिनधास्त करायची ; मात्र तेच काम दुसर्‍याने केले तर आदळआपट करायची, असाच रडीचा डाव उद्धव ठाकरे खेळत आले आहेत. पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्काने बोलणारे उद्धव ठाकरे मात्र बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम करत आहे. उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एका जुन्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंचा ‘म्हातारा’ म्हणून उल्लेख केला होता. तसेच, बाळासाहेबांनी हातात तलवार घेतली, तर हात लटपटतील, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे, आई बसली म्हणून समस्त हिंदूंच्या भावना दुखावण्याचे कामही त्यांनी करून झाले आहे. ज्या अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंचा ‘म्हातारा’ असा उल्लेख केला, त्याच अंधारेबाई उबाठा गटाला प्रकाशाकडे नेण्याच्या बाता मारत ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. उद्धव ठाकरेंनीही वडील बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणार्‍या अंधारेंना उबाठामध्ये योग्य सन्मान, आदर दिला आहे. ज्यांनी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, शिवसेना तळागाळात पोहोचवली, त्यांना अपशब्द वापरणार्‍या अंधारेबाई आज हेलिकॉप्टरने राज्यभरात उबाठा गटाचा प्रचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खर्‍या अर्थाने वाचवली, अन्यथा अंधारेंनीही संजय राऊतांसारखा शिवसेना संपवायला हातभार लावला असता. उद्धव यांनी अशा कित्येक नेत्यांना आपल्या गटात मानाचे स्थान दिले, त्यामुळे त्यांना ‘वडील चोरले’, ‘पक्ष चोरला’ असे म्हणण्याचा अधिकार मुळीच नाही!
 
ओवेसींचा आता नवा डाव


तेलंगणमधील हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेली ओवेसींची धाकधूक जराशी कमी झाली असेल. तिकडे ‘लेडी सिंघम’ भाजपच्या हैदराबाद लोकसभेच्या उमेदवार माधवी लता यांनी ओवेसींना सळो की पळो करून सोडले असताना, त्यात नवनीत राणा यांनीही ओवेसी आणि त्यांच्या बंधूंना जशास तसे उत्तर देऊन हैदराबाद दणाणून सोडले. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत होती, तसतसा ओवेसी यांनी संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. मग, गोमांसाचा विषय असेल किंवा माधवी लता यांचा प्रतीकात्मक बाण मारतानाच्या व्हिडिओसंदर्भात गैरसमज. अखेरच्या क्षणापर्यंत ओवेसींनी तेच ते मुद्दे काढून प्रचार केला. आता तर ओवेसींनी एक दिवस बुरखा घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल, असा खळबळजनक दावा केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींनी असे विधान करून तुष्टीकरणाचा प्रयत्न केला. माधवी लता केवळ हिंदू नव्हे, तर अगदी मुस्लीम महिलांपर्यंत पोहोचल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, ओवेसी फक्त धर्माधारित मते आणि राजकारणवरच अवलंबून राहिले. ओवेसी मुस्लीम महिला पंतप्रधान होईल असे म्हणाले असते तरी ठीक, पण बुरखा घातलेली महिलाच पंतप्रधान होईल, यातून त्यांना नेमके काय सुचवायचे आहे? पाकिस्तानच्या बेनझीर भुत्तो, बांगलादेशच्या शेख हसीना, खालेदा झिया, सिंगापूरच्या हलिमा याकूब अशा अनेक देशांच्या पंतप्रधान बुरखा घालत नव्हत्या किंवा काही आजही घालत नाही. बांगलादेशच्या वर्तमान पंतप्रधान शेख हसीना या तर साडी नेसतात. तसेच, त्यांच्या डोक्यावरील पदर कधीही त्या खाली पडून देत नाही. मग केवळ एक महिलाच पंतप्रधान झाली पाहिजे, असे म्हणण्याऐवजी ‘मुस्लीम महिला पंतप्रधानपदी दिसेल,’ असे सूचित करण्यामागे ओवेसींची बुरसटलेली मानसिकता यावरून दिसून येते. त्यातच ओवेसी एकीकडे सेक्युलॅरिझमची, हिंदू-मुस्लीम समानतेची अधूनमधून भाषा करतात. ओवेसींचे हे वागणे म्हणजे हैदराबादमध्ये माधवी लता यांच्याकडून त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याचे द्योतक आहे. लता मुस्लीम महिला मतदारांपर्यंतही पोहोचल्या. म्हणूनच, अशी विधाने करून मुस्लीम महिलांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, हे अगदी स्पष्ट आहे.

 
पवन बोरस्ते
 
 
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.