चिंगारी का खेल बुरा होता हैं...

    13-May-2024   
Total Views |
Protests in POJK against Pakistan
 
पीओके असो की बलुचिस्तान, पाक सरकार आणि सैन्य नागरिकांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असते. आता मात्र पीओकेमधील जनतेनेच पाकविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. हे काही प्रथमच होत असलेले आंदोलन नाही. यापूर्वीदेखील २०२२ आणि २०२३ साली अशाच प्रकारची आंदोलने पीओकेमध्ये झालेली आहेत.
 
इसे मिटाने की साजीश करने वालों से कह दो,
चिंगारी का खेल बुरा होता हैं।
औरों के घर आग लगाने का जो सपना,
वो अपने ही घर में सदा खरा होता हैं।
 
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची एक प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेत अटलजींनी पाकिस्तानला अगदी नेमक्या भाषेत इशारा देऊन ठेवला आहे. अटलजींच्या द्रष्टेपणास खरे तर दाद द्यायला हवी. कारण, अटलजींचा हा इशारा अनेकदा खरा ठरला. अटलजींनी आपल्या कवितेत पाकच्या एकूणच स्थितीविषयी अगदी चपखल भाष्य केले आहे. आतादेखील गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता पाकच्याच घरात आता आग लागली असल्याचे दिसून येते.अगदी आता-आतापर्यंत ‘जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांची दगडफेक’, ‘जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर काश्मिरी नागरिकरांचा हल्ला’, ‘भारतापासून वेगळे होण्याची काश्मिरी नेत्यांची मागणी’ या आणि अशा बातम्या येत असत. अशा प्रकारे फुटीरतावाद्यांद्वारे जम्मू-काश्मीरला कायम पेटते ठेवण्याची पाकची रणनीती होती.
 
 अर्थात, २०१४ सालानंतर नियोजनबद्ध पद्धतीने जम्मू-काश्मीरमधील अशा सर्व देशविरोधी घटकांना वठणीवर आणण्यात आले. त्यानंतर २०१९ साली ‘कलम ३७०’ काढून या फुटीरतावाद्यांचे उरलेसुरले धाडसही मोडून काढण्यात मोदी सरकारला यश आले आहे. जम्मू-काश्मीर आता विकासाच्या मुख्य प्रवाहात आले असून, तेथे अतिशय शांततेत लोकसभा निवडणुकही पार पडत आहे.त्याचवेळी पाकने बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या काश्मीरमध्ये अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये मात्र ‘स्थानिकांची जोरदार दगडफेक’, ‘पाकिस्तानी सैन्यावर काश्मिरी नागरिकरांचा हल्ला’, ‘पाकिस्तानपासून वेगळे होण्याची काश्मिरी नेत्यांची मागणी’ अशा बातम्या गेल्या आठवड्यापासून येण्यास प्रारंभ झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांनी पाकिस्तानी प्रशासनाच्या अत्याचार आणि क्रूरतेविरुद्ध बंड केले आहे. पीओके गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे.
 
सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करत आहे. मुझफ्फराबाद आणि रावळकोटसह अनेक ठिकाणी सुरक्षादल आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक सुरू आहे. पीओकेमधील अलीकडील निदर्शनांमधून एक बाब सिद्ध होते. ती म्हणजे, या भागावर असलेली पाकची बेकायदेशीर पकड आता बर्‍यापैकी कमकुवत होत चालली आहे. शनिवार, दि. ११ मे रोजी पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये लोकांनी निषेधासह बंदची हाक दिली होती. त्यामुळे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली, तर दुसरीकडे स्थानिक लोक रस्त्यावर आले आहेत.‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी अ‍ॅक्शन कमिटी’ने (जेकेजएएसी) पीओकेमध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याची हाक दिली होती. त्यापूर्वी, शुक्रवार, दि. १० मे रोजी पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये ‘शटर-डाऊन आणि रोड-जाम स्ट्राइक आंदोलना’मध्ये पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामुळे आंदोलकांकडून दगडफेक सुरू झाली.
 
सामहनी, सेहंसा, मीरपूर, रावळकोट, खुईरट्टा, तट्टापानी आणि हत्तीयन बालासह पीओकेच्या विविध भागांमध्ये शनिवार, दि. ११ मे रोजी बंद पाळण्यात आला होता. हा विरोध आता पीओकेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरला आहे आणि पाकिस्तान पोलिसांच्या क्रूरता आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. दोन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. लाठीचार्जमध्ये या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दहा जिल्ह्यांतील लोकांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात निदर्शने सुरू केली आहेत.पीओकेमधील बदललेली परिस्थिती पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ घाबरलेले दिसतात. पाकच्या पंतप्रधानांनी पीओकेमधील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “शांततापूर्ण आंदोलन हे लोकशाहीचे सौंदर्य आहे. मात्र, कायदा हातात घेणे आणि निषेधाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असे शाहबाज शरीफ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, शाहबाज शरीफ यांनी “पीओकेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांनी भूमिका बजाविली पाहिजे आणि प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी चर्चेसाठी दरवाजे उघडले पाहिजेत,” असे आवाहन केले आहे. केवळ पीओकेच नव्हे, तर आता बलुचिस्तानमध्येही पाकविरोधात आंदोलन जोर पकडत आहे. बलुच नेत्या आणि सामाजिक कार्यकर्ते मेहरंग बलोच यांनी ग्वादर बंदर शहराच्या कुंपणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे हे पाऊल बलुच समुदायाला विखुरण्यास भाग पाडण्याची रणनीती आहे, जेणेकरून ग्वादरची जमीन चीनला देता येईल, असा आरोप त्यांनी केला आहे. पीओके असो की बलुचिस्तान, पाक सरकार आणि सैन्य नागरिकांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असते.
 
आता मात्र पीओकेमधील जनतेनेच पाकविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. हे काही प्रथमच होत असलेले आंदोलन नाही. यापूर्वीदेखील २०२२ आणि २०२३ साली अशाच प्रकारची आंदोलने पीओकेमध्ये झालेली आहेत.एकीकडे पीओकेमध्ये नागरिकांचा संताप वाढत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आदी नेत्यांनी ‘पीओके पुन्हा घेणारच’ अशी ग्वाही दिली आहे. पीओके हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे संसदेतही वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, पाकची सद्यस्थिती आणि पीओकेमधील आंदोलन यांची ‘क्रोनोलॉजी’ अतिशय रंजक असल्याचे स्पष्ट होते.