लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष काय करतोय किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांंनी प्रचारासाठी काय मुद्दे घ्यावेत, हा त्यांचा प्रश्न. मात्र, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत, ही देशाची आणि जगाचीही गरज आहे. त्यामुळेच ‘अब की बार चारसो पार’ यासाठी मुंबईतही तसे व्हावे, यासाठी हा लेखप्रपंच...
मुंबईत सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणूनही जाणवते की, निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार राष्ट्रवादी गट यांनी ‘मराठी विरुद्ध अमराठी’ हा मुद्दा उचलून धरलेला दिसतो. हा गुजराती, तो उत्तर भारतीय, हा मराठी, हा मराठी-मुसलमान असा सगळा भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करण्यात येत आहेत. मुंबईत मराठी-अमराठी वाद, तणाव वाढवून मराठी भाषिकांची मते मिळवण्याचा विखारी प्रचार सुरू आहे. ‘गुजराती विरुद्ध मराठी’ असा भाषा प्रांतवाद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे गुजराती आहेत आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल काय माहिती असणार, असेही ते म्हणत असतात. या पार्श्वभूमीवर 2013 सालची ती घटना आठवते.
तेव्हा मुंबईतील आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्या महिला गुजरातला नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी घोषणा झाली होती. संघटन, सामाजिक कार्याची दिशा, शहराचा विकास अशा बर्याच मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद साधणा होतो. त्यांना मराठी समजेल का? आपण हिंदीतून बोलायचे, असे आम्ही सगळ्यांनी ठरवले. एक सेकंद कमी नाही की एक सेकंद जास्त नाही, अशा दिलेल्या वेळेत नरेंद्र मोदी आले. आम्ही सगळ्या नमस्कारासाठी उभ्या राहिलो तर ते म्हणाले, ”नमस्कार ताईंनो, उभ्या का राहिलात? बसा बसा, तुमचे स्वागत आहे. प्रवास व्यवस्थित झाला ना?” त्यांनी आ अगदी आपुलकीने विचारपूस केली. त्यांचे अत्यंत स्पष्ट शुद्ध मराठी ऐकून आम्ही आश्चर्यचकितच झालो. अरे, हे तर व्यवस्थित मराठी बोलतात. आमच्या मनातले ओळखून की काय, ते म्हणाले, “मला मराठी चांगली बोलता येते आणि समजतेही.”
पुढे बोलण्याच्या ओघात ते म्हणाले की, “ज्यांनी माझ्यावर पुत्रवत माया केली, मला मार्गदर्शन केले, त्या आदरणीय स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचा जन्म महाराष्ट्रातलाच.” हे बोलताना त्यांच्या डोळ्यांत अपार स्नेह दाटला होता. लक्ष्मणराव इनामदारांचे नाव घेताना मोदींच्या डोळ्यात दाटून आलेला स्नेह आजही जसाच्या तसा आठवतोय. त्यांच्याशी संवाद साधताना कुठे गुजरातमध्ये आलोय का, भावी पंतप्रधान तेही गुजराती भाषिक व्यक्तीशी बोलत आहोत, असे वाटलेच नाही. त्यांच्या बोलण्यात सुसूत्रता होती आणि त्यापाठचा अर्थ एकच होता.
संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो
भला हो जिसमे देश का वो काम सब किये चलो
भुल कर भी मुख मे जातीपंथ की ना बात हो
भाषा प्रांत के लिये कभी ना रक्तपात हो
देश के लिये सदा जियेंगे और मरेंगे हम
देश काही भाग्य अपना भाग्य हैं ये सोच लो...
तर अशी भावना असलेल्या नरेंद्र मोदी या व्यक्तीसंदर्भात भाजप विरोधातले पक्ष ज्यावेळी पंतप्रधान मोदी गुजराती आहे म्हणून मराठी लोकांनी त्यांच्या भाजप पक्षातल्या उमेदवारांना मत देऊ नका, असे म्हणतात त्यावेळी संताप आणि दुःख होते. तरी बरं देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध केले की, उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही! या पार्श्वभूमीवर कालपरवाची घटना नमूद करावीशी वाटते. राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू सगळे बंधू या विचारांवर ठाम झालेला तो तरुण मला म्हणाला,“बघ तिकडे घाटकोपरमध्ये काय झालं? उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा मराठी उमेदवार त्या गुजरात्यांच्या बिल्डिंगमध्ये गेला आणि त्यांना त्या गुजराती लोकांनी हाकलवून दिले. म्हणाले की, आम्ही मराठी माणसाला मत देणार नाही.” त्याच्या म्हणण्यात तथ्य सत्य आहे का? यासाठी या घटनेचा मागोवा घेतला, तर दुसरेच सत्य बाहेर आले. घाटकोपर पश्चिमच्या त्या इमारतीमध्ये बहुसंख्य गुजराती भाषिक राहतात. तिथेच भाजपचाही कार्यकर्ता राहतो. त्या इमारतीमध्ये भाजपची प्रचार बैठक सुरू असताना, उबाठा गटाचे कार्यकर्तेही प्रचाराला गेले. दोघेही पक्ष समोरासमोर नको, वाद नको म्हणून त्या इमारतीमध्ये राहणार्या भाजपच्या कार्यकर्ता आणि समर्थकांनी उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले की आता इथे भाजपचा प्रचार सुरू आहे.
अर्थात, भाजप किंवा उबाठा पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना काय म्हणाले यात व्यक्तिश: मला रस नाही. मात्र, या घटनेचे रूपांतरण अगदी असे करण्यात आले की, सगळ्या गुजराती भाषिकांनी मिळून उद्धव ठाकरे गटाच्या संजय दिना पाटलांना तिथून हकलवून दिले. मराठी आहे म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा गुजराती समाजाने अपमान केला. आज उमेदवाराचा अपमान केला, आपण तर साधी लोक, आपल्याला काय करतील, अशी धादांत खोटी बातमी विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडमधील मराठीबहुल वस्तीत पद्धतशीरपणे पसरवली गेली. दुसरी घटना एका कंपनीने ‘लिंक्ड-इन’ या अॅपवर ग्राफिक डिझायनर हवा अशी जाहिरात केली होती. एचआर जान्हवी सरनाने कंपनीतर्फे ही जाहिरात त्या अॅपवर टाकली होती. त्यात या नोकरीसाठी ‘मराठी नोकरदाराने अर्ज करू नये,’ असे स्पष्ट लिहिले होते. ही जाहिरात वार्याच्या वेगाने पसरली. काही वेळातच कंपनीने ही पोस्ट डिलिट केली आणि एचआरने माफी मागितली आहे.
संविधानाने कोणत्याही भेदाशिवाय सगळ्यांना संधीचा हक्क दिला असताना, या सरनाने उमेदवार मराठी भाषिक नको, हे म्हणून भाषा प्रांतवाद केला म्हणून ती गुन्हेगारच आहे. पण, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कोणी सरना नाव असलेली ही एचआर महिला काही संपूर्ण अमराठी समाजाचे नेतृत्व करत नाही. ती म्हणजे काही सगळा अमराठी समाज नाही. ही घटना लक्षात येताच महाराष्ट्र भाजपच्या सर्वच नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आणि कारवाईची मागणीही केली. पण, या घटनेचाही वापर विरोधकांनी यासाठी केला की, बघा परप्रांतीय लोक मराठी माणसाला कसे संधी नाकारतात. अमराठी नेत्यांचा पक्ष किंवा अमराठी उमेदवार पुन्हा सत्तेत आले तर ते हेच करतील. गिधाडांनी मृतदेहावर घिरट्या घालाव्यात तसे मराठी-अमराठी वाद उकरत त्याभोवती घिरट्या घालण्याचा प्रकार सुरू आहे.
निवडणुका येतील आणि जातीलही. पण, ‘मुंबईकर’ म्हणून मुंबईत राहणारा आणि रमणारा मराठी भाषिक म्हणा किंवा अमराठी भाषिक माणूस इथेच मुंबईत राहणार आहे. मराठी आणि अमराठी भाषिक दोघेही हिंदू आहेत. रामललाच्या मंदिराने ते काही महिन्यांपूर्वीच हिंदू म्हणून एकत्र आले होते. आज मतांसाठी मात्र मराठी आणि अमराठी वाद माजवणार्या लोकांनी त्यांच्यात भाषिक, प्रांतिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर त्रयस्त नजरेने भाजपच्या प्रचाराकडे पाहिले तर जाणवते की, ‘अब की बार चारसौ पार’ म्हणणारा भाजपचा कार्यकर्ता काय करतोय? भारतीय जनता पक्षाचा जन्मच मुंबईचा. त्यामुळे उबाठा किंवा शरद पवारांच्या पक्षाइतकाच हा पक्ष मुंबईकरांचा आहे, हे पटवताना ते दिसत नाही. कोरोना काळात मोदी आणि भाजप काय करत होता आणि त्याच वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या राज्यात काय झाले? सुशांत, दिशा, मनसुख मृत्यू, वाजे आणि शंभर कोटी, पालघर साधू हत्याकांड घडले. वास्तव असे आहे की, हे सगळे 80 टक्के मुंबईकर विसरले आहेत का?
दुसरे असे की, निवडणुकीत भाजपच्या विरोधकांनी अगदी पाठ करून ठेवलेला मुद्दा म्हणजे मोदी परत सत्तेत आले तर लोकशाही धोक्यात येईल, संविधान रद्द होईल, आरक्षण बंद होईल. गोरगरिबांच्या पाड्यात वंचित वस्त्यांमध्येच नव्हे, तर उच्चभू्र वस्तीतल्या मागासवर्गीय बांधवांनाही सांगितले जाते की, भावा, हे लोक संविधान बदलणार आहेत, लोकशाही संपवणार आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू नकोस. पण, हे खरे आहे का? याबाबत प्रत्यक्ष मोदी कितीतरी वेळा म्हणालेत की ”संविधान हेच राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानामुळेच एक मागासवर्गीय समाजाचा माणूस पंतप्रधान झाला. संविधान कधीही कुणीही बदलू शकत नाही.” संविधान पूजन-सन्मान हे पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम केले किंवा भाजपच्या सत्ताकाळात किती वेळा संविधानात बदल केले गेले, तेही कशासाठी केले गेले आणि काँग्रेसच्या काळात कितीवेळा संविधानातल्या तरतुदी बदलल्या. त्याही कशासाठी बदलल्या याचा आलेख, तसेच ‘संविधान धोक्यात नाही’ हे सत्य समाजापर्यंत पोहोचवणे आता गरजेचे होते आणि आहे. अर्थात, सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे सगळे निरीक्षण आहे. हे सगळे इथे मांडण्याचे कारण एकच प्राणप्रिय भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान व्हावेत, ही माझीच नाही, तर भारताला विश्वगुरू पाहू इच्छिणार्या अगणित लोकांची इच्छा आहे. त्यामुळे ‘अब की बार चारसो पार’ होण्यासाठीचे मुंबईकर म्हणून हे काही मनातले...