युद्धसज्जता की युद्धाची खुमखुमी?

    01-May-2024   
Total Views |
 china
  
जगाची महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी एक दशकानंतर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये नुकतेच मोठे फेरबदल केले. आधुनिक युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले. जिनपिंग यांनी सैन्यात केलेल्या फेरबदलाचा उद्देश हा युद्धसज्जता की आणखी काही?
 
चीनने जवळपास दशकभरानंतर आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या संरचनेत मोठे फेरबदल केले. या फेरबदलांचा उद्देश आधुनिक युद्धातील आव्हानांना तोंड देण्याचा असल्याचे चीनकडून सांगण्यात येत आहे. चीनने आपल्या सैन्यातील ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ बरखास्त करून त्याच्या जागी ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स या युनिटची स्थापना केली आहे. पारंपरिकरित्या जमीन, पाणी आणि हवेत युद्ध लढले जायचे. पण, आजच्या काळात ‘सायबर वॉरफेयर’पासून ते अंंतराळापर्यंत युद्धाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच चीनने या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ची स्थापना केली. या युनिटच्या निर्मितीबाबत माहिती देताना चीनच्या संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषदही घेतली. पण, या पत्रकार परिषदेत हे युनिट नेमके काय काम करणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, चीनच्या सैन्य संरचनेचे चार विभाग आहेत.
 
पहिले भूदल, हवाई दल, नौदल आणि रॉकेट फोर्स. त्यासोबतच चीनच्या सैन्य दलात ‘एअरोस्पेस फोर्स’, ‘सायबरस्पेस फोर्स’, ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ आणि ‘जॉईंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’ अशी चार युनिट असल्याचीसुद्धा माहिती देण्यात आली. सैन्य प्रवक्त्याने या पत्रकार परिषदेत ‘एरोस्पेस फोर्स’च्या मदतीने चीन अंतराळात स्वतःला मजबूत करेल, तर ‘सायबरस्पेस फोर्स’ देशाचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करेल आणि डेटा सुरक्षित करण्यात मदत करेल, अशी माहिती दिली. पण, नव्याने निर्माण करण्यात आलेली ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’ नेमकं काय काम करणार, याची कसलीही माहिती दिली नाही. पण, जिनपिंग यांनी आपल्या भाषणात या युनिटला युद्धाच्या वेळी ‘इन्फॉर्मेशन वॉरफेयर’साठी सज्ज राहण्याच्या सूचना केली. २0१२ मध्ये राष्ट्रपती झाल्यापासून शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्यात आमूलाग्र बदल केले. दि. १ ऑक्टोबर १९४९ ला चीनवर कम्युनिस्ट पक्षाचा कब्जा झाला होता. त्याला २0४९ साली १00 पूर्ण होतील. याचे निमित्त साधून जिनपिंग यांना चीनला २0४९ पर्यंत सैन्य महाशक्ती बनण्याचे स्वप्न आहे. यासाठी जिनपिंग यांनी चीनच्या संरक्षण खर्चात मोठी वाढ केली. याचाच एक भाग म्हणून जिनपिंग यांनी ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ची स्थापना केली होती. पण, पुढच्या नऊ वर्षांत जिनपिंग यांना या ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ला बरखास्त करावं लागलं.
 
विशेष म्हणजे, ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’मध्ये ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’च्याच अधिकार्‍यांनी संधी देण्यात आली आहे. ‘इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स’चं नेतृत्व जनरल बी. यी यांच्याकडे देण्यात आले आहे. ते याआधी ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’चे डेप्युटी कमांडर होते. पण, ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’चे प्रमुख राहिलेल्या जू कियानशेंग यांना या नवीन युनिटमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यांच्या कारभारावर जिनपिंग खुश नसल्याची माहिती काही माध्यमांनी दिली. त्यासोबतचं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची शंका बळावली आहे. बरखास्त करण्यात आलेल्या ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’च्या अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. आधी २0१६ पर्यंत ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’चे डेप्युटी कमांडर राहिलेले माजी संरक्षणमंत्री ली शांगफू यांनाही जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आपल्या पदावरून हटवले आहे. त्यांच्यावर सध्या कारवाई सुरू आहे. या सर्व प्रकरणांमुळेच जिनपिंग यांनी ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ युनिट बरखास्त केली असण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांच्या सैन्य सुधारणा कार्यक्रमात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचाही सहभाग आहे. जगाची सैन्य महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या चीनच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. जिनपिंग यांनी याविरोधात कारवाई केली असली तरी, त्यांना फोफावलेल्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण नायनाट करता आलेला नाही. जिनपिंग यांनी चीनच्या संविधानात बदल करून हयात असेपर्यंत, राष्ट्रपती बनण्याचा आपला मार्ग प्रशस्त केलाय. पण, चीनची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, कोरोना काळात झालेली दडपशाही, यामुळे चीनमध्ये असंतोष वाढत आहे. जिनपिंगच्या एकाधिकारशाहीमुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्येसुद्धा त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण होत असल्याची माहिती अधून-मधून बाहेर येत असते. चीनचे सैन्य हे देशाचे नसून कम्युनिस्ट पक्षाचे आहे. त्यामुळे पक्षात निर्माण होणारा असंतोष हा सैन्यातही फोफावत आहे.
 
त्यामुळे चीनचे नवे माओ बनू पाहणार्‍या जिनपिंग यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. जिनपिंग यांनीसुद्धा ही भीती आपल्या भाषणात अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. जिनपिंग यांनी नव्याने स्थापन झालेल्या युनिटला कम्युनिस्ट पक्षाक्षी एकनिष्ठ राहण्याचा इशारा दिला. या वक्तव्यातून जिनपिंग यांची भीती दिसून आली. या भीतीतूनचं जिनपिंग यांनी ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ची बरखास्ती केली, असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत. यामागे कारण काहीही असो, चीन हा भारताचा पारंपरिक शत्रू. आजघडीला भारत आणि चीनचे सैन्य सीमारेषेवर आमनेसामने आहे. त्यामुळे चीनच्या सैन्यात होणार्‍या या बदलांकडे बारकाईने पाहण्याची गरज निर्माण होते. सोबतच भारताला चीन आणि पाकिस्तानचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. त्यासाठी स्वत:ची सैन्य क्षमता वाढवण्याबरोबरचं, जपान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, तैवान यांसारख्या देशांसोबत आपले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करावे लागतील.

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.
अग्रलेख
जरुर वाचा

'सिंधू पाणी करारा'ला पहिल्यांदाच स्थगिती, काय आहे हा करार? पाकिस्तानवर या निर्णयाचा काय परिणाम होणार?

(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121