मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोव्यातील सत्तरी तालुक्यातील नागवे गावामधून सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी वनमानव म्हणजेच 'ग्रे स्लेंडर लॉरिस'चे रेस्क्यू करण्यात आले (Slender loris rescue). वाळपाई जिल्ह्यात असलेल्या नागवे गावामधील एका घराच्या मागील लाकडाच्या कुंपनावर वनमानव बसलेले दिसले (Slender loris rescue). रहिवाशांनी यासंबंधीची माहिती वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव बचाव संस्थेला दिली (Slender loris rescue). संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनमानवाला ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. (Slender loris rescue)
नागवे गावामधील वर्षा परवार या मुलीला सोमवार दि. ८ एप्रिल रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील लाकडाच्या कुंपनावर वनमानव बसलेले दिसले. याविषयीची माहिती तिने तिची आई चंद्रावती परवार आणि भाऊ रामकृष्ण परवार यांना दिली. भावाने याबाबतची माहिती वाळपाईतील 'अॅनिमल रेस्क्यू स्क्वॉड'ला कळविली आणि या स्क्वॉडचे प्रदीप गौंडळकर आणि अमृत सिंघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावातील वयस्कर माणसांकडून अनेकदा या प्राण्याविषयी चांगल्या-वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी या प्राण्याची हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा देखील केली होती.
वनविभागाला याबाबत माहिती कळवल्यानंतर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी शामसुंदर गावस यांनी या मनमानवाला तात्काळ जंगलामध्ये सोडून द्यायला सांगितले. त्याप्रमाणे विनोद सावंत आणि विशांत गावकर यांनी या दुर्मीळ संकटग्रस्त प्राण्याचे रेस्क्यू करत त्याला जंगल अधिवासात मुक्त केले.
ग्रे स्लेंडर लॉरिसची वैशिष्ट्ये...
'ग्रे स्लेंडर लॉरिस' हा साधारण मानवी बाळासारखा दिसणारा प्राणी असल्यामुळे त्याला वनमाणूस किंवा वनमानव असं म्हंटलं जातं. लॉरिडे कुळातील हा प्राणी उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय कोरड्या जंगलात तसेच आर्दतायुक्त जंगलात आढळतात. भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळणारा हा प्राणी अतिशय भित्रा, लाजाळू आणि शांत असतो. लाजाळू असल्यामुळेच त्याला लाजवंती असंही म्हंटलं जातं. साधारण ५ ते १० इंच लांबीचा आणि मोठे डोळे असलेला हा प्राणी नॉक्टरनल म्हणजेच निशाचर असतो.
दक्षिण भारतातील पश्चिम घाटामध्ये मुख्य अधिवास असणाऱ्या या प्राण्याला अधिवासाचे नुकसान, शिकार तसेच तस्करीचा ही धोका आहे. हा प्राणी सर्वभक्षक असून, किडे, पक्ष्यांची अंडी, पाली हे त्यांचे आवडते खाद्य आहे. भारतीय वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत शेड्यूल १ मध्ये येणारी ही प्रजात आहे. 'आययूसीएन'च्या यादीमध्ये नष्टप्राय वर्गात मोडणाऱ्या या प्रजातीला कायद्यानुसार सर्वोच्च पातळीचे संरक्षण देण्यात आलंय. जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रे स्लेंडर लॉरिस किंवा लाजवंतीला संरक्षण आणि संवर्धनाची गरज आहे. महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी वनप्रदेशात वनमानव दिसतात.