महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना, संजय राऊत नामक प्रवक्त्यांनी धुमाकूळ घातला होता. वारंवारच्या टीका-टिप्पण्या आणि त्यातही शिव्यांचा भडीमार यांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ’सौ दाऊद, एक राऊत’ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे हर्षोल्हासित होत, राऊतही हात हलवत, त्यांना अभिवादन करू लागले. मुळात राऊत यांची तुलना थेट दाऊदशी होतेय, यात कसलं आलंय कौतुक, ही तर शरमेची बाब! ज्याने शेकडो मुंबईकरांचा बळी घेतला, अशा दाऊदसोबत आपली तुलना होणे, ही कौतुकास्पद गोष्ट नक्कीच नाही. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात रमलेल्या राऊतांना हेदेखील कौतुकच वाटते. आता तर त्यांनी नवीनच टूम काढलीय. दहा वर्षं होऊनही, दारोदार भटकावे लागतेय. मत मागण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात थांबायला हवं, तेथील भाजपची परिस्थिती गंभीर आहे, हे मला माहितेय. योगीजी सरकारी सुविधा घेऊन प्रचार करत आहे, असा जावईशोध उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लावलाय. मुळात उत्तर प्रदेशात योगी सरकार सक्षम आहे, त्यामुळे राऊतांनी उगाच चिंता करणे सोडलेले बरे. नुकतेच उद्धव ठाकरे रामलीला मैदानात पाच मिनिटांचे भाषण करण्यासाठी गेले होतेच की. आपण खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, जो बायडेन यांच्या गप्पा मारतात, त्यामुळे योगींनी महाराष्ट्रात आलं, त्यात वावगं काय. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे आणि उबाठा गट आता चार-दोन नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे निश्चितच योगी आणि मोदी प्रचाराला येणार आणि त्यासाठी राऊतांनी नाराज होण्याचे कारण नाही. दररोज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन, गरज नसताना आपली भूमिका मांडायची आणि याच्या-त्याच्यावर शिंतोडे उडवत बसायचं, हा या विश्वप्रवक्त्याचा जुनाच खेळ. राज्यसभा निवडणुकीत कसाबसा काठावर विजय मिळाल्यानंतरही, ते सावध झाले नाही. राऊत अजूनही रोज सकाळी दर्शन देतात आणि टीका-टिप्पण्यांचा खेळ खेळत बसतात. इकडे संजय निरूपम यांनी राऊतांवर खिचडी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. राऊत हेच खिचडी घोटाळ्याचे खरे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी राऊतांवर लावला आहे. त्यामुळे राऊतांनी आपल्यावरील आरोपांवर उत्तर द्यावे. पत्राचाळवासीयांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि मग उत्तर प्रदेशावर बोलावे.
खर्गेंचा नवा घोळ...
सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही, सक्रिय प्रचारात उतरल्याचे दिसून येत नाही. तिकडे काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. त्यातही ते काँग्रेसचा प्रचार होईल, काँग्रेसी विचारांचा प्रसार होईल, यासाठी कष्ट घेताना अजिबात दिसून येत नाही. उलट ते जे काही बोलतात, त्यामुळे आपल्याच पक्षाचे नुकसान करून जातात. त्यामुळे त्यांची प्रचारसभा ठेवायची की नाही, यावरून खुद्द काँग्रेसजनच संभ्रमात सापडले आहे. संसदेतही त्यांनी अशी अनेक वक्तव्ये करून, स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी खर्गेंचा प्रचार हा ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असा प्रकार झाला आहे. त्यांच्या अशा आत्मघातकी प्रचाराने आहे, तो मतप्रवाहदेखील दूर जाण्याचा धोका आहे. राजस्थानमधील एका सभेत खर्गे म्हणाले की, ”शेतकरी अडचणीत आहे. हजारो लोकं आत्महत्या करत आहे. मात्र, मोदी म्हणतात मी ‘कलम ३७०’ हटवलं. त्याचा आणि राजस्थानशी काय संबंध? मोदी इथे येऊन ‘३७०’ची गोष्ट का करतात.” बरं खर्गेंनी बोलतानाही नेहमीप्रमाणे घोळ केला. ’कलम ३७०’ऐवजी त्यांनी चक्क ‘कलम ३७१’ असा उल्लेख केला. त्यामुळे ज्यांना साधे कोणते कलम हटविले याचाही पत्ता नाही, माहिती नाही, ते ‘कलम ३७०’वर आपली चिंता व्यक्त करत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाला कोणते कलम हटविले, याचीदेखील माहिती नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला जनतेने का म्हणून गांभीर्याने घ्यावे. जम्मू-काश्मीरसाठी हजारो जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मोदी सरकार आल्यानंतर तिथे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. ऑपरेशन ‘ऑलआऊट’अंतर्गत कश्मीरच्या सर्वनाशाचे स्वप्न बघणार्या हजारो दहशतवाद्यांना आतापर्यंत यमसदनी पाठवले आहे. राजस्थानच्या भूमीतील अनेक युवकांनी काश्मीरच्या सुरक्षेसाठी आपले योगदान दिले आहे. मात्र, खर्गेंविषयाची सरमिसळ करून, काश्मीरसाठी बलिदान दिलेल्या जवानांचा अपमान करत आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्याच्या वेदना नुसत्या काश्मीरमध्ये नाही, तर देशभरही मांडल्या, तर त्यात वावगं काहीच नाही. तुकडे-तुकडे गँगचे समर्थन करणार्यांकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा, तरी कशी करणार म्हणा.
सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.