श्रीरामनवमीला गर्भगृहातील चार मिनिटांचे 'हे' विलक्षण दृष्य संपूर्ण जग अनुभवणार
08-Apr-2024
Total Views | 190
लखनौ : अयोध्येत श्रीरामललाच्या जन्मोत्सवाची तयारी सुरु झाली असून यंदाची रामनवमी जोरदार असणार आहे. विशेषतः श्री रामलल्लाच्या कपाळावरील 'सूर्य टिळक' (Surya Tilak) हे खास आकर्षण असणार आहे. रामनवमीनिमित्त चार मिनिटे प्रभू श्री रामलल्लाच्या कपाळी हे सूर्य टिळक असेल. याच्या तयारीसाठी वैज्ञानिक रविवारी रात्रभर या कामात व्यस्त होते.
यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे लावली जात आहेत, लवकरच याची चाचणीही घेण्यात येईल. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी, उत्तराखंडच्या वैज्ञानिकांची टीम या कामात सध्या गुंतलेली आहे. प्रभू श्रीरामललाच्या कपाळाचे अचूक स्थान सुनिश्चित करण्यासाठी नुकतेच याठिकाणी एक स्टिकरही लावले गेले आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या तळमजल्यावर दोन आरसे आणि एक लेन्स बसवण्यात आली आहे. सूर्यप्रकाश तिसऱ्या मजल्यावर बसवलेल्या आरशातून, तीन लेन्समधून, दोन आरशांमधून तळमजल्यावर बसवलेल्या शेवटच्या आरशापर्यंत येईल. यातून परावर्तित होणाऱ्या किरणांनी कपाळावर टिळक तयार होईल. साधारण ७५ मिमीचा गोलाकार टिळक असेल, असे सांगण्यात येत आहे. दुपारी ठीक १२ वाजता सूर्यकिरण रामललाच्या कपाळावर पडतील. किरणांनी रामललाचा चेहरा चार मिनिटे सतत प्रकाशित झालेला असेल.
रामनवमीला फळ मिळण्याची शक्यता...
श्री रामललाच्या कपाळी सूर्य टिळक करण्याची तयारी पूर्ण जोमाने केली जात आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना रामनवमीला फळ मिळण्याची शक्यता आहे. सुमारे शंभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी गर्दीचा त्रास टाळण्यासाठी भाविकांनी आपापल्या ठिकाणी राम नवमीची पूजा करून दर्शन घ्यावे.