पाटणा : बिहारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शिक्षकांना यावेळी ईदची सुटी मिळणार नाही. बिहारच्या शिक्षकांना होळीलाही सुट्टी देण्यात आली नव्हती. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के.पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात दि. ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान निवासी प्रशिक्षण होणार आहे, तर ईद ११ एप्रिल रोजी येत आहे. त्यांचा सण पाहता निवासी प्रशिक्षणाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम धर्मीय शिक्षक करत होते.
शिक्षण विभागाच्या या आदेशा संदर्भात इबादान शरियाचे सरचिटणीस मोहम्मद शिबली अल कासमी यांनीही पत्र लिहून ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या निवासी प्रशिक्षणाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या सणानिमित्त देशभरात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मात्र निवासी प्रशिक्षणाच्या तारखेमुळे मुस्लिम शिक्षकांना ईद साजरी करता येणार नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
अशा परिस्थितीत ही तारीख बदलण्याबाबत विचार व्हायला हवा. मात्र, तसे होईल असे वाटत नाही. अलीकडे होळी-दिवाळीनिमित्त सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मागणी करूनही रजा देण्यात आली नाही. ते निर्णयही के.के.पाठक यांनी जारी केले होते. विशेष म्हणजे ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या निवासी प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान, शिक्षकांना वर्गाचे व्यवस्थापन कसे करावे आणि मुलांशी समन्वय कसा ठेवावा तसेच मुलांमध्ये कौशल्य विकास कसा करावा हे शिकवले जाते. या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना शिकवणारे शिक्षक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ६ लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असले, तरी ६ पेक्षा कमी प्रशिक्षण केंद्रांमुळे ६ दिवसांच्या प्रशिक्षणात सुमारे १९ हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिक्षकांना ७ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत प्रशिक्षण केंद्रांवर हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठी नोंदणी दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.