अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले.
मुंबई : बॉलिवडूचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकणार असून दोन पिढ्यांच्या कलाकारांची नवी कॅमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नुकतीच रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना अक्षयने त्याचे आणि सायन कोळीवाड्याचे खास कनेक्शन सांगितले.
रणवीर सोबत बोलताना अक्षयने त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी विशेषत: त्याने सायन कोळीवाड्याशी त्याचे असलेले नाते सांगत तो आजही न चुकता सायन कोळीवाड्यात जात असल्याचे त्याने सांगितले. अक्षय म्हणाला की, “आयुष्यातील बराचसा काळ मी सायन कोळीवाड्यात काढला आहे. आजही तिथे आमचं जुनं घर आहे. त्या घरात माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे वेळ काढून महिन्यातून एकदा तरी मी सायन कोळीवाड्यात जाऊन जुन्या घरात वेळ घालवतो”.
हे वाचलंत का? - अक्षय कुमार आणि सायन कोळीवाड्याचे खास कनेक्शन काय आहे? जाणून घ्या....
पुढे तो म्हमाला की, “मी सकाळी ४ वाजता उठतो, माझी कार काढतो आणि सायन कोळीवाड्यामध्ये मी जिथे राहायचो त्या घरी थेट जातो. या घरासोबतच बांद्रा इस्टमध्ये सुद्धा माझं एक घर आहे तिथे पण मी जातो. या घरांसोबतच मी माझ्या शाळेतही फेरफटका मारुन येतो. डॉन बॉस्को चर्चमध्ये देखील काळ मी घालवतो. मला या ठिकाणांना भेट देणं आवडतं. मी सगळ्यात आधी जिथे रहायचो ती बिल्डिंग आता तोडणार आहेत. तिथे आता जी नवीन इमारत उभी राहणार आहे तिथला तिसरा मजला मी विकत घेणार आहे," असे देखील अक्षय म्हणाला.
जुन्या आठवणींना उजाळा देत अक्षय म्हणाला, "जुन्या घराविषयी माझ्याकडे खूप आठवणी आहेत. माझे वडील त्यावेळी ९ ते ६ अशी नोकरी करायचे. ते जेव्हा कामावरुन घरी यायचे त्यावेळी मी आणि माझी बहीण घराच्या बाल्कनीत उभे राहून त्यांची वाट पाहायचो. माझ्या या घराजवळ एक पेरुचं झाड आहे आजही तिथे पेरु लागले तर मी ते आवर्जुन तोडून खातो."
९०च्या दशकातला खिलाडी अक्षय कुमार याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतला स्टंट मॅन अशी ओळख असणारा अक्षय आता पुन्हा एकदा बडे मियां छोटे मियां या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहे. १० एप्रिल रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.