तृतीयपंथी उमेदवारांना पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता निश्चित

    07-Apr-2024
Total Views | 94
mpsc police bharati


मुंबई :   
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता (चाचणीची मानके व गुण) निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी 'पुरुष' आणि 'महिला तृतीयपंथी' अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता गोळा फेक (वजन- ७.२६० कि.ग्रॅ.) कमाल गुण १५, पुलअप्स - कमाल गुण २०, लांब उडी- कमाल गुण १५, धावणे (८०० मीटर) - कमाल गुण ५० अशी गुणनिश्चिती करण्यात आली आहे. तर, स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांकरिता गोळा फेक (वजन- ४ कि.ग्रॅ.) - कमाल गुण २०, धावणे (४०० मीटर) - कमाल गुण ५० आणि लांब उडीसाठी कमाल ३० गुण दिले जाणार आहेत.


सन २०२२ च्या परीक्षेकरिता शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के, तर सन २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७० टक्के गुण आवश्यक राहतील. त्याशिवाय मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाणार नाही. तसेच या गुणांचा अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


प्रमाणपत्र बंधनकारक

तृतीयपंथी उमेदवारांना त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील. यासंदर्भात सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.



अग्रलेख
जरुर वाचा