"उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा बाणा असेल तर..."; राणेंचे आव्हान
07-Apr-2024
Total Views | 57
मुंबई : उद्धव ठाकरेंमध्ये खरंच बाळासाहेबांचा बाणा असेल तर त्यांनी सांगली आणि भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना दिले आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरून उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. यातच आता राणेंनी ठाकरेंना हे आव्हान दिले आहे. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "काल काँग्रेस पक्षाने उबाठा गटाला एक प्रस्ताव दिलेला आहे की, सांगली आणि भिवंडीचा निर्णय होत नसेल तर आपण मैत्रीपूर्ण लढत का करत नाही? संजय राऊत अन्यवेळी उगाच छाती फुगवून दाखवत सुख्या धमक्या देतात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची कशी हवा आहे आणि आमचे ४० पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येणार अशा धमक्या देतात. जर उद्धव ठाकरेंमध्ये खरंच बाळासाहेबांचा बाणा असेल तर त्यांनी सांगली आणि भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी. त्यांना भीती का वाटते?," असा सवाल त्यांनी केला.
"सांगलीमध्ये संजय राऊत काँग्रेसला शिव्या देत तोंड काळं करत फिरत आहेत. ते सांगलीतील पश्चिम महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या मोठ्या घराण्यांना मोजतही नाहीत. त्यामुळे सांगलीमध्ये जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर उबाठा गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. ही गोष्ट उबाठाला माहिती असल्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढतीला घाबरत आहेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा बाणा आणि रक्त आहे हे दाखवण्याची त्यांना ही चांगली संधी आहे. ज्यांनी साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आणि ज्यांचा भांडूपमध्ये साध्या नगरसेवकही नाही ते संजय राऊत प्रचाराच्या निमित्ताने मोठमोठ्या वल्गना करत फिरत आहेत," असा टोलाही त्यांनी लगवला आहे.