तामिळनाडूमध्ये भाजपला सूर गवसणार?

    06-Apr-2024   
Total Views |
bjp tamilnadu loksabha


यावेळी अण्णाद्रमुकने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) फारकत घेतली आहे. अर्थात, भाजपलादेखील तेच हवे होते. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आपला मजबूत करण्याच्या इराद्याने उतरल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे यंदा तामिळनाडूमध्ये द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजप अशा तीन पक्षांच्या आघाड्या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात दक्षिण भारतातील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये सर्व म्हणजे ३९ लोकसभा मतदारसघांमध्ये आणि पुदुच्चेरीच्या एकमेव मतदारसंघात मतदान होणार आहे. दक्षिणेतील या राज्याने नेहमीच भाजप आणि काँग्रेस दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना वाव दिलेला नाही. राज्यात दीर्घकाळ करुणानिधी आणि जयललिता यांच्याद्वारे द्रमुक व अण्णाद्रमुक या प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व राहिलेले आहे. द्रविड अस्मितेचे राजकारण प्रभावी असल्याचे, या राज्यात दिसून येते. सध्या सत्ताधारी द्रमुकने या द्रविडी राजकारणास हिंदूविरोध, उत्तर-दक्षिण वाद असाही रंग दिल्याचे दिसते.

यंदाच्या निवडणुकीमध्ये द्रमुक आघाडीस त्यांचा सध्या तरी प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या अण्णाद्रमुकच्या फुटीनंतर मोठे यश मिळवण्याची आशा आहे. गतवेळी द्रमुक आघाडीने ३९ पैकी ३८ जागांवर विजय प्राप्त केला होता. यावेळी अण्णाद्रमुकने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) फारकत घेतली आहे. अर्थात, भाजपलादेखील तेच हवे होते. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आपला मजबूत करण्याच्या इराद्याने उतरल्याचे स्पष्ट दिसते.

तामिळनाडूमध्ये द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजप अशा तीन पक्षांच्या आघाड्या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. द्रमुक राज्यात आठ पक्षांचे नेतृत्व करत असून द्रमुक २२ जागा लढवणार आहे. काँग्रेस नऊ जागा, माकप आणि भाकप प्रत्येकी दोन, इंडियन मुस्लीम लीग एक, विदुथलाई चिरुथाईगल काची दोन जागा लढवणार आहे. त्याचप्रमाणे कोंगुनाडू मक्कल देसिया काची यांचा उमेदवार द्रमुकच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. अण्णाद्रमुकप्रणित आघाडीमध्ये चार पक्षांचा समावेश आहे. राज्यात अण्णाद्रमुक ३४ जागांवर, तर देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पाच जागांवर निवडणूक लढवणार आहेत. ‘पुथिया तामिळगाम’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे; परंतु त्यांचे उमेदवार अण्णाद्रमुकच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
 
तामिळनाडूमध्ये भाजप २३ जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपप्रणित रालोआमध्ये नऊ पक्षांचा समावेश आहे. ‘पट्टाली मक्कल काची’ दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर ‘तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार)’ तीन जागा लढवत आहेत. अण्णाद्रमुकमधून बाहेर पडलेले ओ. पन्नीरसेल्वन यांना एक जागा देण्यात आली आहे. टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील ‘अम्मा मक्कल मुनेत्र कळघम’ पक्षास दोन जागा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘भारत जननायक कटची’, ‘पुथिया निधी कटची’ आणि ‘तमिलगा मक्कल मुनेत्र कळघम’ हे भाजपच्या चिन्हावर प्रत्येकी एक जागा लढवणार आहेत.

भाजपला मतदान करणे म्हणजे भारताच्या संघराज्य व्यवस्थेस आव्हान देणे असल्यावर द्रमुकचा भर आहे. भाजप म्हणजे दलित आणि अल्पसंख्यांकविरोधी असल्याचे सांगून द्रमुकने भाजप हा उच्चवर्णियांचा पक्ष असल्याचा प्रचार जोरदारपणे चालवला आहे. तसेत भाजपची सत्ता आल्यास, तामिळ नागरिकांना मांसाहार करता येणार नसल्यासारखेही तथ्यहीन मुद्देही प्रचारात आहेत. त्याचवेळी सनातन-हिंदूविरोधी वक्तव्ये करण्याचे धोरण द्रमुकने अजूनही सुरू ठेवलेच आहे. त्याचप्रमाणे ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावरही द्रमुकला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.

भाजपने राज्यात यावेळी सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडूमध्ये प्रबळ असलेल्या वन्नियार समुदायाचा जनाधार प्राप्त करण्यासाठी, भाजपने ‘पीएमके’सोबत युती केली आहे. थेवर समाजाला आपलेसे करण्यासाठी, जयललिता यांच्या एकेकाळच्या विश्वासू व्ही. के. शशिकला यांचे भाचे टीटीव्ही दिनाकरन यांच्याशी युती केली आहे. याद्वारे अण्णाद्रमुकच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्याचा भाजपचा इरादा आहे. केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांना भाजपने निलगिरीतून उमेदवारी दिली आहे, ते पक्षाचा दलित चेहरा आहेत, तर तमिलीसाई सुंदरराजन आणि पोन राधाकृष्णन हे नाडर समुदायातील आहेत. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे गोंडार समुदायातून येतात, सध्या तामिळनाडूमध्ये ते भाजपचा चेहरा आहेत.

के. अण्णामलाई यांनी द्रमुकवर अतिशय आक्रमकपणे हल्लाबोल करण्यास प्रारंभ केला आहे. पक्षाने अण्णामलाई यांना कोईम्बतूर येथून लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. अण्णामलाई यांनी द्रमुक सरकारचा भ्रष्टाचार आणि हिंदूविरोध यांना थेट आव्हान दिले आहे. अण्णामलाई यांनी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री पलानीवेल थियागराज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परिणामी, मुख्यमंत्री स्टॅलिन यांना त्यांना पदावरून काढावे लागले होते. ’नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने दोन हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या जाफर सादिक याच्या अटकेवरूनही अण्णामलाई यांनी स्टॅलिन सरकारला लक्ष्य केले होते. सादिक हा स्टॅलिन कुटुंबाचा निकटवर्तीय असून, स्टॅलिन यांच्या सुनेसोबत त्याने चित्रपटनिर्मितीही केल्याचे अण्णामलाई यांनी उघडकीस आणले होते. परिणामी, यंदा तामिळनाडूमध्ये यश दृष्टिपथात आल्याचा दावा भाजप करत आहे.


पुदुच्चेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत

पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात लोकसभेची एकमेव जागा आहे. येथे २०१९ साली काँग्रेसचे व्ही. वैथिलिंगम विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात ऑल इंडिया एनआर काँग्रेसने उमेदवार उभा केला होता. यंदा ऑल इंडिया एनआर काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी काँग्रेस उमेदवारास पाठिंबा देण्यास डाव्या पक्षांनी नकार दिला आहे.


कच्चाथीवूवरुन कलगीतुरा

भाजपने कच्चाथीवू बेटाचे प्रकरणदेखील निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आणून एकाचवेळी काँग्रेस आणि द्रमुकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हे बेट तत्कालीन काँग्रेस सरकारने श्रीलंकेस देऊन टाकले असून, त्यास द्रमुकने कोणताही विरोध केला नाही, हे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. कच्चाथीवू बेट श्रीलंकेकडे असल्याने तामिळ मच्छिमारांना अटकेसह अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा मुद्दादेखील निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरत आहे.