जगभरातील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची चीनची योजना!
मायक्रोसॉफ्टचा दावा
06-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये यंदाच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून चीन हस्तक्षेप करू शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. यंदाच्या वर्षी जगभरातील किमान ६४ देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत.
या देशांमध्ये जगातील जवळपास ४९ टक्के लोकसंख्या राहते. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने इशारा दिला आहे की, चीनतर्फे भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी एआयचा वापर होऊ शकतो. तैवानच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी चीनने एआयचा वापर केला होता, त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजन्स पथकाच्या मते, उत्तर कोरियाच्या मदतीने चिनी समर्थित सायबर गट २०२४ मध्ये होणाऱ्या अनेक निवडणुकांना लक्ष्य करू शकतात. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की चीन जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एआयद्वारे तयार केलेल्या सामग्रीचा वापर करून स्वतःच्या हितासाठी जनमतावर प्रभाव टाकू शकतो.
स्टॉर्म १३७६ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाकडून तैवानच्या निवडणुकांमध्ये बनावट ऑडिओ सपोर्ट आणि मीम्स आदी सामग्री प्रसारित केली. काही उमेदवारांची बदनामी करणे आणि मतदारांच्या धारणा प्रभावित करणे हा त्यामागचा उद्देश होता, असेही मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.