"ज्यांच्याकडे विचार नाही त्यांनी..."; शेलारांचा उबाठाला टोला
06-Apr-2024
Total Views |
मुंबई : ज्यांच्याकडे विचार नाही त्यांनी राष्ट्रवादावर बोलू नये, असे प्रत्युत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊतांना आणि उबाठा गटाला दिले आहे. तसेच उबाठा सेनेचं संविधान आहे का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "उबाठा सेनेचा विचार आणि विचारसरणी कुठली आहे ते सांगावं. मुळात उबाठा सेनेचं संविधान आहे का, हे त्यांनी सांगावं. त्यांच्या गटाचं संविधान असेल तर या पक्षाची स्थापना कशामुळे आणि कशासाठी झालं हे त्यांनी सांगावं. ज्यांच्याकडे ना विचार ना विचारवाद आहे ते दुसऱ्याच्या राष्ट्रवादावर काय बोलणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्राबद्दल प्रथम विचार करणारे आहोत. संजय राऊत तुम्ही केवळ भ्रष्टाचारवादी आहात. तुम्ही गोरेगावमधील मराठी माणसाची घरं हडपली. उद्धवजीच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कोविड काळात मुंबई महापालिकेतील सामान्य माणसाची खिचडी चोरली. त्यामुळे तुम्ही आमच्या राष्ट्रवादाच्या भोपळ्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्या भ्रष्टाचारवादाचा मटका हा भाजपच फोडेल, हे निश्चित आहे," असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या घोषणापत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसचं घोषणापत्र नसून ठग करणाऱ्यांचं लूट पत्र आहे. घोटाळे करण्यात ज्यांचा हात कुणी रोखू शकत नाही त्यांनी काढलेलं घोषणापत्र हे लूटपत्र आहे. काँग्रेसचं घोषणापत्र म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे," असेही ते म्हणाले.