मुंबई : संजय राऊत हे संजय पवारच आहेत. ते शरद पवारांचे भक्त आहेत, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा शरद पवारांच्या राजकारणाचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले. सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना शिरसाटांनी शरद पवार आणि राऊतांवर निशाणा साधला.
संजय शिरसाट म्हणाले की, "उबाठा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे. ज्यावेळी आम्ही उठाव केला त्यावेळी शरद पवारांनी अमित शाहांना आम्हाला सत्तेत सहभागी करुन घ्या असा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग होता. उद्धव ठाकरेंना भावनिक करुन एकदा राजीनामा घेतला की, तुम्ही राजीनामा दिल्याने आम्ही भाजपसोबत जात आहोत, असे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतू, अमित शाहांनी त्यावेळी याला स्पष्ट नकार दिला होता."
"त्यावेळी शरद पवारांनी हे असं राजकारण केलं होतं आणि संजय राऊतांचा याला पाठिंबा होता. उबाठा गटाचे तुकडे करण्यामागे संजय राऊत आहेत. संजय पवार कुणाचा माणूस आहे, असा प्रश्न कुणालाही विचारला तर शरद पवारांचा असंच उत्तर येईल. देवेंद्र फडणवीस हा एक नेता भारी पडला म्हणून ही त्यांची पोटदुखी आहे. सत्तेपासून हे लोकं वंचित राहिलेत हे त्यांचं दु:ख आहे. म्हणून वारंवार टीका करुन आपण किती एकजूट आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आजही शरद पवार हेच सर्व पक्ष चालवतात. उबाठा गटाला चालवण्याचं कामही पक्षप्रमुख म्हणून शरद पवारच करतात. संजय राऊत हे संजय पवारच आहेत. त्यांच्या तोंडून एखाद्याच वेळी उद्धव ठाकरेंचं नाव येतं. पण ९९ वेळा शरद पवारांचंच नाव त्यांच्या तोंडून बाहेर पडतं. संजय राऊत हे शरद पवारांचे भक्त आहेत,” असेही ते म्हणाले.