वर्षा गायकवाडांना मोठा धक्का! प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्यं
29-Apr-2024
Total Views | 252
पुणे : उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उज्वल निकम यांच्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांच्यामुळे लोकांना एक चॉईस मिळतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
महायूतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश गोखले यांना उभं करण्यात आलं होतं आणि ते निवडूनही आले होते. त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. लोकसभेमध्ये एक चांगला प्रतिनिधी जायला हवा. उज्वल निकम महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यावर कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा माणसांना उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो, असं मी मानतो,” असे ते म्हणाले.
एकीकडे लोकसभेच्या काही जागांवर आपण काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, महायूतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्या उमेवारीवरील त्यांची प्रतिक्रिया ही वर्षा गायकवाडांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
तसेच “यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून भावना गवळी उभ्या राहणार नाहीत, असं ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी तिथे एक चांगला उमेदवार देऊन ती जागा जिकण्याची उद्धव ठाकरेंना चांगली संधी होती. पण त्याठिकाणी हे दिसलं नाही. अनेक मतदारसंघांमध्ये ते चांगले उमेदवार देऊ शकत होते. परंतू, जे लढू शकत नाहीत, असे उमेदवार त्यांनी उभे केले आहेत,” असेही ते म्हणाले.