‘मुंबई मेट्रो वन’ने थकविला कोट्यवधींचा मालमत्ता कर

मेट्रो वनकडे बीएमसीचा ४६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

    29-Apr-2024
Total Views | 58

metro 1


मुंबई, दि. २९:  
वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबई मेट्रो वनच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी अद्यापही करभरणा करण्यात न आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. त्यापैकी के (पश्चिम) विभागातील एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये; के (पूर्व) विभागातील ६ मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख १ हजार ५१ रुपये; एल विभागातील २ मालमत्तांसाठी १९ कोटी ४ लाख ६२९ रुपये आणि एन विभागातील २ मालमत्तांसाठी १४ कोटी ६ लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकीत आहे.
के (पश्चिम) आणि एल विभागातील मालमत्तांसंदर्भात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत मालमत्ता करभरणा करण्यास सांगितले आहे. तर, के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या चार विभागातील २८ मालमत्तांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८ कोटी २९ लाख ३६ हजार ११ रुपये इतका कर आकारण्यात आला आहे. दरम्यान, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल.

करभरणा करणार कोण?

मेट्रो वन खासगी-सरकारी भागीदारीतील प्रकल्प आहे. एमएमओपीएलने आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि २०२० मध्ये यासंबंधीचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. त्यानंतर हा हिस्सा एमएमआरडीएने विकत घेण्याचे ठरविले. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आणि आता या प्रक्रियेने वेग घेतला आहे. एमएमओपीएलच्या कर्जाची परतफेड करण्याची हमी एमएमआरडीएने दिली असून मेट्रो १ मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र आता हा थकीत मालमत्ता कर कोण भरणार हा मुद्दा उपस्थित होतो आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121