कन्हैया कुमारच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध; पक्ष कार्यालयावर काढला मोर्चा
28-Apr-2024
Total Views | 87
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांना आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील आघाडी पचनी पडत नाहीये. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर संदीप दीक्षित यांनीही पक्षाच्या निर्णयावर कठोर भूमिका घेतली आहे. त्याचवेळी काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्याची गरज आहे, बाहेरच्या व्यक्तीला उमेदवार बनवू नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस कार्यकर्ते कन्हैया कुमारच्या विरोधात आहेत. दिल्ली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. ईशान्य दिल्लीतून स्थानिकांनाच उमेदवारी द्यावी, बाहेरच्या व्यक्तीला संधी देऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यामागे आपसोबतच्या युतीशिवाय कन्हैया कुमारचाही हात असल्याचे वृत्तात म्हटले जात आहे.
काँग्रेस आम आदमी पार्टीसोबत लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यांना दिल्लीत तीन जागा मिळाल्या आहेत. यापैकी एक जागा ईशान्य दिल्लीची आहे, या जागेवरून काँग्रेसने कन्हैया कुमारला तिकीट दिले आहे, मात्र काँग्रेस कार्यकर्ते कन्हैयाच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत आहेत. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मौजपूर मेट्रो स्टेशनबाहेर निदर्शने केली.
दरम्यान, अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, त्यांनी जे काही लिहिलं आहे आणि पत्राद्वारे आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत, त्याचा पक्षाने विचार करायला हवा, असं मला वाटतं. ते पक्षाची संपत्ती आहेत, आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. राज्यात पक्षाने जे काही साध्य केले आहे त्यात बाधा आणणाऱ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. अरविंदर सिंग लवली यांना खूप वेदना होत आहेत, हायकमांडने ही बाब गांभीर्याने घ्यावी.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी लवलीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त समोर येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना अरविंदर सिंग लवली यांच्याशी बोलून दिल्ली काँग्रेसच्या संकटावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली काँग्रेसच्या बैठकीत माजी खासदार संदीप दीक्षित यांनी ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली होती.