मुंबई, दि.२७: विशेष प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक असेल. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा सर्वात मोठा रोलिंग स्टॉक डेपो हा सबारमतीत उभारण्यात येत आहे. साबरमती येथे रोलिंग स्टॉक डेपोच्या विकासासह भारत शाश्वतता आणि कार्यक्षमतेच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहे. या डेपोसाठी मातीचे काम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय इमारतीसाठी पायाभरणी आणि आरसीसीची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.
एनएचएसआरसीएल अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान ५०८ किमी लांबीचा कॉरिडॉर बांधत आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने २०२६-२७ पर्यंत धावेल असा अंदाज आहे. या संपूर्ण कॉरिडॉरसाठी नागरी कामासाठी १००% निविदा आणि गुजरातमध्ये ट्रॅकच्या कामासाठी निविदा मंजूर झाल्या आहेत. गुजरातमधील सुरत आणि बिलिमोरा या ५० किमी दरम्यानची पहिली ट्रायल रन २०२६ मध्ये सुरू होईल, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही बुलेट ट्रेन ३५० कीलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार आहे. यामुळे २ तासांत हे अंतर कापले जाईल. या कॉरिडॉरच्या दरम्यान १२ स्टेशन असणार आहेत. यातील ८ स्टेशन गुजरातमध्ये तर ४ महाराष्ट्रात असतील.
या प्रकल्पात जागतिक दर्जाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक असलेल्या या प्रकल्पात साबरमती येथे रोलिंग स्टॉक डेपोच्या विकासासह भारत शाश्वतता आणि कार्यक्षमतेच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहे. साबरमती रोलिंग स्टॉक डेपोमध्ये ट्रेनसेटच्या देखभालीच्या उद्देशाने अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. ८३ हेक्टरमध्ये पसरलेले हे तीन डेपोंपैकी सर्वात मोठे डेपो असून हा डेपो इन्सपेक्शन बे, वॉशिंग प्लांट, वर्कशॉप, शेड आणि स्टॅबलिंग लाईन्ससह अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. साबरमती डेपो हा जपानमधील डेपोपासून प्रेरणा घेऊन नविण्याचे प्रतीक म्हणून उदयास येत आहे. डेपोमध्ये 4 (चार) इन्सपेक्शन लाइन आणि १० स्टॅबलिंग लाइन्स आहेत. भविष्यात या डेपोची क्षमता वाढवून ८ तपासणी लाइन आणि २९ स्टॅबलिंग लाइनपर्यंत विस्तार करण्याची रेल्वेची योजना आहे. याव्यतिरिक्त, व्यापक देखभाल क्षमता सुनिश्चित करण्यासाठी बोगी एक्सचेंज लाइन्स आणि सामान्य तपासणी लाइन्स सारख्या विशेष सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
साबरमती डेपोची वैशिष्ट्ये
- बुलेट ट्रेनची इष्टतम कामगिरी सुनिश्चित करणे
- ट्रेनसेटच्या चाचण्या करणे
- देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे
- ट्रेन शंटिंग ऑपरेशन्स, डेपो व्यवस्थापनासाठी केंद्रीकृत नियंत्रण सुविधा
- प्रशस्त डायनिंग रूम, कॅन्टीन, ऑडिटोरियम,प्रशिक्षण सुविधा
- डेपोकर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक वातावरण
पर्यावरणीय मानकांची पूर्तता
या प्रकल्पाचे बांधकाम जसजसे पूर्णत्वाकडे जाईल तसतसे डेपो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल. याचसोबत, कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि पर्यावरणीय जबाबदारीसाठी नवीन मानके स्थापित करेल. भविष्यात सोलर पॅनेल बसवता यावेत यादृष्टीने डेपो शेड आणि इमारतींची रचना करण्यात येत आहे. साबरमती डेपोमध्ये सुमारे १४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता असेल. यासोबतच, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सांडपाण्याच्या पुनर्वापरासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश आहे. रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेलच्या पाण्यामुळे डेपोची पाण्याची गरज पूर्ण होईल. आधुनिक सांडपाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन केले जाईल.