इराणमध्ये ३३ वर्षांच्या तूमाज सालेह यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर न्यायालयीन खटला चालला. न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. रॅप साँग गाऊन त्याने भ्रष्टाचार केला, प्रशासनाविरोधात जनतेला भडकावले, दंगल माजविण्याचा प्रयत्न केला, असे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आले. सालेहने कोणते गीत गायले होते, तर त्याचे शीर्षक होते,
समवन्स क्राइम वॉज डांसिंग विथ हर हेयर इन द विंड
इराणमध्ये हिजाब घातला नव्हता, वार्यावर उडणारे केस दिसत होते, म्हणून महसा अमिन या युवतीला इराणी पोलिसांनी पकडले होते. तुरुंगात तिला मारहाण झाली. त्यात ती मृत्यू पावली. डोक्यावरचे केस दिसले, हिजाब घातला नाही, म्हणून अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू आलेली महसा अमिन! तिच्या मृत्यूने, नव्हे खुनाने, इराणमधल्या जनतेत असंतोष माजला. लोक रस्त्यावर उतरले. कधी नव्हे, ते महिला आणि युवकांनीही ‘हिजाब घालणे बंधनकारक नाही’, अशी भूमिका घेतली. आंदोलने सुरू झाली. त्यावेळी, तूमाज सालेह याने ‘समवन्स क्राईम वॉज’ हे रॅप गीत महसा अमिनच्या मृत्यूसंदर्भी गायले.
महसा अमिनचे समर्थन केले, म्हणून सालेहला पोलिसांनी पकडले. त्याला पकडल्यानंतरही इराणच्या रस्त्यावर लोक ‘समवन्स क्राईम वॉज’ हे गीत गात राहिले. इराणच्या कट्टर धर्मांध प्रशासनाला ही धोक्याची घंटा वाटली. त्यामुळे, सालेहला मृत्युदंड सुनाविण्यात आला. या शिक्षेवरून संयुक्त राष्ट्र संघाने, इराणची निंदा केली आहे. इराणच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ही अशी कथा आहे.
गाझामध्ये पॅलस्टाईन नागरिकांच्या जगण्यासाठी, इराण म्हणे आक्रमक आहे. मात्र, स्वतःच्या घरात इराण मानवी जगण्याला जास्त महत्त्व देत नाही, हेच दिसते. हिजाब घालणे हे मानवाच्या जगण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे का? सध्या इराणच्या बाबतीत तर, मानवी जगण्यापेक्षा हिजाबच महत्त्वाचा आहे. महसा अमिनच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी आंदोलन केले आणि महसा अमिनचे समर्थन केले म्हणून, आजपर्यंत इराणमध्ये हजारो लोक तुरूंगात डांबले गेले. शेकडो लोकांना फासावर चढविले गेले. ५७ मुस्लीम देशांमध्ये आपणच सच्चा मुस्लीम देश आहोत, हे दाखविण्यासाठी इराणचा हा खटाटोप आहे. त्यामुळेच तर, गाझा इस्त्रायल संघर्षात इतर ५६ देश केवळ इस्त्रायलविरोधात चर्चाविधान, निषेध करत होते.
मात्र, जगभरातील मुस्लिमांनी आपल्याला प्रमुख मानवे, कर्ताधर्ता मानवे म्हणून इराणने काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर हल्लाही केला होता. मुस्लीम जगताचे आपणच मोठे भाऊ, ही दिखाऊगिरी इराण करत आहे. पण, इराणच्या जनतेमध्ये असंतोष पेटलेला आहे. एकदा जनता पेटली की, ती आग राजसत्तेची राख बनवूनच विझते. अरब स्प्रिंग याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे, इराणी जनतेमध्ये असलेला हा उद्रेक कसाही शांत करायचा, असे इराणी प्रशासनाने ठरवले आहे. पण, त्यातून फार काही साध्य होते आहे, असे दिसत नाही.
अतिशय धार्मिक पारंपरिक मुस्लीम राष्ट्र अशी छबी जगभरात मिरवणार्या इराणबाबत मागे एक सत्य उजेडात आले. ते असे की, इस्त्रायली सैनिकांकडून माहिती काढून घेण्यासाठी, इराणी प्रशासनाने काही महिलांना नियुक्त केले होेते. त्या सोशल मीडियावर अर्धनग्न फोटो टाकून त्या इस्त्रायली सैनिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत. कोणी फसलेच, तर माहिती काढण्यासाठी वाटेल त्या थराला या महिला जात. या महिला काय गैर मुस्लीम होत्या? नाहीच. तर ज्या देशात महसा अमिनने हिजाब घातला नाही, म्हणून खून झाला, त्याच देशात इस्त्रायली सैनिकांकडून माहिती काढून घेण्यासाठी नग्न महिलांचा वापर करण्यात आला. याच इराणमध्ये नुकतीच एक घटना घडली. मौलवी अलीरजा पनाहियान म्हणाला की, “मोहम्मद पैंगबरांना एकही मित्र नव्हता.” इराणमध्ये मोहम्मद पैंगबरांबद्दल त्यांना ‘एकही मित्र नव्हता’ हे म्हणणे इशनिंदाच.
पनाहियान याच्यावर इशनिंदेअंतर्गत कारवाई व्हावी, असे जनतेचे म्हणणे. पण, त्याच्यावर कारवाई झाली नाही.कारण, पनाहियान हा इराणचे सुप्रिम लीडर अयातुल्ला खुमैनी यांचा आवडता मौलवी, तर इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचा मित्र आहे. इराणमध्ये धार्मिकता जपण्याच्या नावाखाली हजारो लोकांवर कारवाई होत आहे. अगदी हिजाबविरोधी आंदोलन ताजे आहे. मात्र, ही कारवाई करताना इराणी प्रशासन दुजाभाव करते. सत्ताधारी लोकांचे हितसंबंध जोपासते. सामान्य जनतेवर अन्याय करते. आताही तुमाह सालेहला दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा हेच सांगते.
९५९४९६९६३८