‘रिअॅलिटी शो’मधील दिग्दर्शनाचा बादशाह

Total Views |
 mayur
 
रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे खरे जीवन कसे असते? त्यांचा संघर्ष काय असतो, हे स्वानुभवातून पडद्यावर मांडणारे मयूर धामापूरकर यांच्याबद्दल...
 
पण ज्या समाजात आणि विविध प्रकारची मानसिकता असणार्याय लोकांमध्ये लहानाचे मोठे होतो, त्याचा भविष्यातील आपल्या करिअर निवडीसाठी कसा नकळतपणे उपयोग होईल, हे आपल्यालाच ठाऊक नसते. आता वास्तविक जीवन आणि करिअर यांचा मेळ कसा आपसूक घडून येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक मराठी रिअॅलिटी शोचे साहाय्यक दिग्दर्शन करणारे मयूर धामापूरकर. संपूर्ण बालपण हे लोअर परळ-एलफिस्टन या भागात चाळ संस्कृतीत गेले. आर्थिक तंगी जरी असली, तरी मनाची श्रीमंती ही मयुर यांना याच भागाने शिकवली.
 
मयूर यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत, तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादरमधील नाबर गुरूजी विद्यालयात झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सिद्धार्थ कॉलेजची निवड केली. आणि तिथे वाणिज्य शाखेत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण, कलेच्या क्षेत्रात येण्याची हुरहुर मनात असल्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असताना ,विविध स्पर्धांमधून आपली कला लोकापर्यंत पोहोचविण्याचे अथक प्रयत्न मयूर करत होते. तेरावी ते पंधरावी महाविद्यालयातील महाराष्ट्र उत्सव या स्पर्धेत भाग घेत, सामाजिक विषयांवर आधारित अॅड फिल्म्सचे लिखाण ते करू लागले. या स्पर्धेचा चांगला फायदा असा झाला की, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मयूर यांच्यातील दिग्दर्शकालादेखील हेरले. त्यामुळे महाविद्यालयापासूनच मयूर यांचा लेखक आणि दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला.
 
केवळ आवड आहे म्हणून त्या क्षेत्रात जाऊन करिअर करण्यापेक्षा, त्याचे योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण घेण्यावर मयूर यांनी भर देण्याचे ठरविले. आणि त्यानुसार त्यांनी एफटीआयची परीक्षा दिली. पण, त्यात ते नापास झाले. परंतु, शिकण्याची उर्मी कायम ठेवत त्यांनी मुंबई विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर फिल्म मेकिंगचेदेखील त्यांनी शिक्षण घेतले आणि स्पेशलायझेशन त्यांनी दिग्दर्शनातच केले. मनोरंजनसृष्टीत एक दिग्दर्शक, लेखक अशी ओळख निर्माण करण्यासाठी मयूर यांनी आधी ही संपूर्ण चौकट नेमकी काय असते, याचे शिक्षण घेऊन मगच पुढे भरारी घेतली.
 
पुढे मयूर यांचा मनोरंजनसृष्टीतील नवा प्रवास सुरू झाला. ‘कोण होणार करोडपती’ या कथाबाह्य कार्यक्रमाचे ते रिअॅलिटी प्रोड्युसर म्हणून काम पाहू लागले. ज्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे खरे जीवन नेमके कसे आहे, हे छोट्या फिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते, हे सर्व काही मयूर यांच्या नजरेतून प्रेक्षक पाहात होते.
 
यानंतर, ‘सूर नवा, ध्यास नवा’ यादेखील कथाबाह्य मालिकेत ते रिअॅलिटी दिग्दर्शक आणि क्रिएटीव्ह हेड म्हणून कार्यरत होते. याशिवाय ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेच्या दुसर्या पर्वात, ते साहाय्यक किएटीव्ह दिग्दर्शक म्हणून काम पाहात होते. एकीकडे वाहिन्यांवरील दिग्दर्शनाचा त्यांचा प्रवाह सुरू असताना, दुसरीकडे त्यांनी स्वत:च्या अॅड फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्सदेखील केल्या. यातील ‘मोगरा’ ही शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पोहोचली होती. मयूर यांनी ‘मिडनाईट स्टोरी’, ‘से चिझ’, अशा अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या. याशिवाय, महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम विभागाच्या डॉक्युमेंट्रीदेखील लोकांपर्यंत पोहोचवल्या.
 
परंतु, हा सगळा घाट घालण्यासाठी जे आर्थिक पाठबळ मयूर यांना हवे होते, ते काही मिळाले नव्हते. कारण, अतिशय सामान्य कुटुंबातून आल्यामुळे चित्रपट किंवा नाट्यगृहात जाऊन एखादी कलाकृती पाहावी, इतके पैसे नसल्यामुळे लोकांकडून मोफत तिकीट मिळाले किंवा कुठे मोफत शो लागले असतील, याचा शोध घेत त्यांनी कलेची भूक मिटविली. याशिवाय, एका उत्तम कलाकाराला वाचनाची आवड हवीच. मयूर यांनी त्यांची ही आवड ग्रंथालयात तासंतास बसून ती आवड पूर्ण केली. शिवाय, ज्यावेळी त्यांनी पहिली शॉर्ट फिल्म करण्याचा विचार केला, त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा एका व्यक्तीने केवळ मयूर यांचे नाव कुठेतरी वाचले होते आणि काम पाहिले होते यावर त्यांनी एक लाख रुपये देऊ केले आणि पुन्हा ते देऊ नका, असेही सांगितले.
 
कलेशी निगडित नसणार्याल त्या व्यक्तीने देऊ केलेले ते एक लाख रुपये, मयूर यांच्यासाठी कोटींच्या घरात होते. त्यानंतर मित्रांच्या साथीने उरलेल्या दोन-अडीच लाखांची जमवाजमव करून, मयूर यांनी पुढचे पैसे गोळा करत १ लाख, ९० हजार रुपये जमा केले आणि त्यातून ती फिल्म आधी चित्रित केली. त्यावर पुढचे तांत्रिक सोपस्कार करण्यासाठी मदतीचे हात आपोआप पुढे आले आणि मयूर यांनी आर्थिक, मानसिक अडचणींवर मात करत पहिली शॉर्ट फिल्म पूर्ण केली. ते म्हणतात ना, “मनात जिद्द असेल तर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. उलट अनेकांचे मदतीचे हात आपसूक तुमच्याकडे येतात.” मयूर यांच्या बाबतीतही हेच झाले .पुढे त्याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी एकीकडे रिअॅलिटी दिग्दर्शक किंवा शो प्रोड्युसर म्हणून काम करत त्यातून मिळणारे अर्थार्जन स्वत:च्या शॉर्ट फिल्म्समध्ये गुंतवले.
 
नवोदित तरुण पिढीकडून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळू दे हीच इच्छा व्यक्त करत ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून मयूर धामापूरकर यांना पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.