झलक न्यायपत्राची

    21-Apr-2024
Total Views | 37
 love
 
काँग्रेसशासित कर्नाटकात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आली. हत्या करणारा फैयाझ जो आरोपी म्हणून सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तो एकेकाळी तिच्याच वर्गात शिकत होता. त्याने नेहाला लग्नासाठी विचारले असता, आपण एकाच धर्माचे नसल्याने मी लग्न करू शकत नसल्याचे नेहाने फैयाझ याला स्पष्ट सांगितले होते. यामुळेच त्याने नेहाचा बळी घेतला. तिच्या वडिलांनी माझी मुलगी ‘लव्ह जिहाद’चा बळी गेली असून, देशात ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरत असल्याचे सांगितले. तसेच मी माझ्या मुलीला वाचवू शकलो नाही, पण देशातील महिलांनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे संरक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले. फैयाझ हा लग्नासाठी नेहावर जबरदस्ती करत होता. त्यावेळी नेहाने ‘बीएससी’नंतर पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नेहाच्या आईनेदेखील नेहाला त्रास न देण्याच्या आणि तिच्यापासून दूर राहण्याच्या सूचना फैयाझ याला दिल्याचे सांगितले. पण जेव्हा नेहाचे घरचे उघडपणे या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण म्हणून दोषारोप करत असताना, काँग्रेसचे सरकार मात्र यामध्ये ‘लव्ह जिहाद’चा अँगल नसल्याचे म्हणत आहे. त्यांचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी तर हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नसून, नेहाने दुसर्‍या कोणाबरोबर लग्न करू नये या विचारातून ही हत्या झाली असावी असे म्हटले आहे. पण इतकेच बोलून थांबतील, तर ते काँग्रेसी कसले? यात ‘लव्ह जिहाद’चा काही संबंध नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट करून टाकले.यामुळे काँग्रेस सरकार याकडे प्रेमप्रकरणातून झालेली हत्या असेच पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्नाटकात सरकारने ‘लव्ह जिहाद’ गुन्ह्याखाली या प्रकरणाचा तपास करावा, यासाठी आता मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. अभाविपसह अनेक हिंदुत्ववादी संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यावर असेही ते मुस्लीम धार्जिणे असल्याचे आरोप होत असतात आणि त्यात २०२४ च्या आपल्या न्यायपत्र या जाहीरनाम्यात काँग्रेसने नाती, लग्न या प्रकरणात सरकार हस्तक्षेप करणार नसल्याचे जाहीर केले आहेच. त्याचे नेमके प्रारूप असेच असेल का, असा प्रश्न नेहाच्या हत्येने कर्नाटकच्या जनतेला पडू लागला आहे.
 
काँग्रेसी अ‘न्याय’
 
भारतातील हैद्राबादच्या काळा पथ्थर इथल्या एका हनुमान मंदिरात कचरा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युट्यूबवर पत्रकारिता करणार्‍या एका पत्रकाराने याचे चित्रण केल्याने त्याच्याविरोधातच हैद्राबादमधल्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे हनुमान मंदिर गेले ७० वर्षे जुने असून शंख आणि सुदर्शनचक्र हाती घेतलेल्या स्वरुपात हनुमानाची दगडी मूर्ती तिथे आहे. सुरुवातीच्या काळात इथे हिंदूंची वस्ती होती. पण, मुस्लीम समाजाची वस्ती वाढू लागल्याने तिथल्या हिंदूंनी स्थलांतर केले. परिणामी, नंतरच्या काळात या मंदिराभोवती अनेक मज्जिद उभारल्या गेल्या. त्यामुळे नंतरच्या काळात इथे कोणीच फिरकेनासे झाल्याने हे मंदिर पूर्णपणे दुर्लक्षित राहिले. त्यामुळे स्थानिक लोकांनी या मंदिरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्याचे रुपांतर सार्वजनिक कचराकुंडीत होऊ लागले.दीर्घकाळ हाच प्रकार होऊनसुद्धा स्थानिक प्रशासनाने आपल्याला याचे काहीच सोयर सुतक नसल्यासारखे याक़डे दुर्लक्ष केले ही बाब इथे विशेषांगाने नमूद कराविशी वाटते. मध्यंतरीच्या काळात गुडी-बडी नामक एका सेवाभावी संस्थेने या मंदिराची साफसफाई करण्याचा प्रयत्न केला होता. पण साफसफाई झाल्यानंतर तिथल्या जनतेने पुन्हा कचरा टाक़ण्यास सुरुवात केली. जेव्हा या प्रकाराला युट्यूबवर पत्रकारिता करणार्‍या एका पत्रकाराने चित्रीत करून उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, न तेव्हा मात्र झोपेचे सोंग घेणारे हैद्राबादमधील प्रशासन जागे झाले आणि त्यांनी या पत्रकारावरच धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल केले. या घटनेत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी दिले आहे. पण सलोखा नेमका कोणत्या बाजूने बिघडवला गेला आणि गुन्हा कोणावर झाला प्रश्न आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा असल्याचा नियम काँग्रेसशासित राज्यात झाला आहे का? पत्रकारांना न्याय देण्याची हमी देत फिरणारे काँग्रेसी युवराज राहुल गांधी हे इथे फिरकताना दिसत नाहीत, ना त्यांच्या सरकारने यावर काही भाष्य केले आहे. हिंदू धर्माविषयी काँग्रेसच्या मनातील भावना सर्वश्रुत आहेच, त्यामुळे इथेतरी वेगळा न्याय कसा मिळेल.

-कौस्तुभ वीरकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121