नुकताच रामनवमीच्या निमित्ताने रामनामाच्या उत्सवात संपूर्ण देश न्हाऊन निघाला. रामकथा ही सर्वार्थाने आदर्श. रामायणातील अशाच अनेक आदर्शांचे, संस्कारांचे प्रतिबिंब भारताच्या एकूणच राज्यकारभारात आणि परराष्ट्र धोरणातही उमटलेले दिसते. त्याचाच घेतलेला हा आढावा...
रामायणामध्ये सीतास्वयंवरासाठी रामाने शिवधनुष्य उचलणे, यामध्ये एक प्रतिकात्मकता दडलेली आहे. ‘येणार्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे आणि त्या आव्हानांमधून मार्ग काढून मी आपली उद्दिष्टे पूर्ण करणार आहे,’ हा गर्भित संदेश रामाने शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावून दिला. याचे कारण, रामायणातील संदर्भांनुसार जनक राजाकडे परशुरामाने आपले शिवधनुष्य ठेवले होते. ते इतके वजनदार होते की, सामान्य व्यक्तीने ते उचलणे तर दूर, तोलणेही कठीण होते. आजचा भारत तशाच पद्धतीने विकसित भारताचे शिवधनुष्य हातामध्ये घेऊन उभा आहे.
आजच्या अत्यंत अस्थिर व संघर्षमय परिस्थितीमध्ये आणि येणार्या आव्हानांच्या काळात आपली स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. ज्याप्रमाणे रामाला अनेक परीक्षा देऊन आणि असंख्य संकटांचा सामना करुन स्वतःलासिद्ध करावे लागले, तशाच पद्धतीने भारतदेखील अनेक समस्यांचा, आव्हानांचा सामना करत स्वतःलासिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. अनेक परीक्षा भारताने या प्रक्रियेमध्ये दिलेल्याही आहेत. त्यामुळे आजच्या भारताची तुलना ही शिवधनुष्य पेलणार्या रामासोबत करणे, हे यथोचित ठरेल.
यासाठी भारत ही संकल्पना अत्यंत संयुक्तिक आहे. या संकल्पनेतून चार अर्थ प्रतिबिंबित होत आहेत. एक म्हणजे, भारत आर्थिकदृष्ट्या ‘आत्मनिर्भर’ होऊ पाहात आहे. याचा अर्थ, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनणे आणि त्यानंतर जगाच्या गरजा पूर्ण करणे. कोरोना महामारीच्या काळात भारताने हे सिद्ध करून दाखवले. जगभरातील विकसित राष्ट्रे केवळ आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी कोरोना लसींचे उत्पादन करत होती, तेव्हा भारताने आपल्या देशातील कोट्यवधी लोकांना लसींचे दोन डोस दिले आणि जवळपास ७५ देशांना या लसींचा पुरवठा करुन, त्या देशांमधील नागरिकांचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे, ‘हायड्रोक्सोक्लोरोक्वीन’ची मागणी होती, तेव्हाही १२5 पेक्षा अधिक देशांना भारताने या औषधांचा पुरवठा केला. तशाच पद्धतीने श्रीलंका, नेपाळ, मॉरिशस यांंसारखे शेजारी देश संकटात आले, तेव्हा त्यांनाही भारताने मदत केली. अफगाणिस्तानसारख्या देशात तालिबानची राजवट असतानाही भारताने त्यांना गहू पुरवला. ‘आत्मनिर्भर’ बनून इतरांना मदत करण्याची ही स्वयंपूर्णतेची कल्पना रामायणातील मूल्यांची शिकवणूक आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, विकासाचा विचार केल्यास भारत आज सर्वसमावेशक किंवा सर्वांना सामावून घेणारा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये केवळ भारताचा विचार नसून, संपूर्ण विश्वाचा विचार अनुस्यूत आहे. त्यामुळे ‘जी 2०’च्या व्यासपीठावर भारताने ‘आफ्रिकन युनियन’च्या समावेशाचा आग्रह धरला आणि तो पूर्णही केला.
तिसरा मुद्दा ‘राजकीय दृष्टिकोनातून भारत’ या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा असे लक्षात येते की, भारताने आपली परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता अबाधित ठेवली आहे. त्याचबरोबर इतरांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये हस्तक्षेप करणे टाळले आहे. तसेच, राम हा ज्याप्रमाणे प्रजादक्ष राजा होता, त्याचप्रकारे, भारतानेही राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी परराष्ट्र धोरणाचा वापर केला. त्यामुळेच युक्रेन युद्धानंतर अमेरिकेचा दबाव असूनही, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवली आणि जवळपास सहा अब्ज डॉलर्सचे तेल आतापर्यंत खरेदी केले. त्यामुळे भारताची ४0 हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे. यातून भारत हा दबावाला बळी न पडणारा देश असल्याचा संदेश भारताने जगाला दिला आहे.
चौथा मुद्दा म्हणजे, भारताला आज जे बलस्थान प्राप्त झाले आहे किंवा जागतिक राजकारणाला भारत जे नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा भारताशिवाय जागतिक पटलावरचा कोणताही प्रश्न सोडवणे अशक्य ठरत आहे किंवा भारत हा ‘ग्लोबल अजेंडा’ ठरवत आहे, ही क्षमता भारताला त्याच्या संस्कृतीतून प्राप्त झाली आहे. या संस्कृतीचा आधार म्हणून आपण रामायण आणि महाभारत यांकडे पाहतो. त्यामुळे ‘भारत’ ही संकल्पना चार स्तंभांवर उभी आहे आणि म्हणूनच, रामायणाचा विचार करणे गरजेचे आहे.
रामायणाच्या काळातील सामाजिक न्यायाची संकल्पना भारत आज प्रत्यक्षात आणतो आहे. ‘जी २०’चे लोकशाहीकरण करताना भारताने यामध्ये सर्वसामान्यांना सामावून घेतले. तशाच पद्धतीने एकूण जागतिक विकासाची फळे गरीब देशांना मिळाली पाहिजेत. यासाठी, भारत ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज बनला. हे भारताचे योगदान ऐतिहासिक आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ यामध्ये रामायणाची तुलना आजच्या जागतिक राजकारणाशी केली आहे. आजचे भारताचे परराष्ट्र धोरण रामाच्या धोरणाप्रमाणे कसे असले पाहिजे, याबाबत अत्यंत उत्तम विश्लेषण त्यांनी केले आहे. सद्यस्थितीत आपल्याला विकासाचे दोन प्रमुख मॉडेल्स किंवा प्रतिमान दिसतात. एक युरोपियन मॉडेल आणि दुसरे चिनी मॉडेल. यापैकी युरोपियन विकासाचे प्रतिमान हे वसाहतवादी आणि भांडवलशाही शोषणावर आधारलेले आहे. हे दुटप्पी किंवा ढोंगी मॉडेल आहे. यामध्ये इतरांवर टीका करणे आणि आपल्या इच्छा इतरांवर लादणे, मानवाधिकारांच्या मुद्द्यांचे स्वतः उल्लंघन करून अन्य राष्ट्रांना शहाजोगपणाचे सल्ले देणे, ही या मॉडेलची वैशिष्ट्ये आहेत. युक्रेन युद्धानंतर पश्चिम युरोपियन देशांनी ‘युरोपचा प्रश्न हा जगाचा प्रश्न आहे,’ असे म्हटले. पण, हीच राष्ट्रे जगाचा प्रश्न कधीच युरोपचा प्रश्न मानत नाहीत. ही दुटप्पीपणाची भूमिका युरोप नेहमीच घेत आला आहे.
दुसरीकडे चीनने आर्थिक विकास साधला, तरी लोकशाही गमावली आहे. त्यामुळे चीनचे प्रारुप एकाधिकारशाहीचे आहे. परंतु, भारत जे प्रतिमान जगासमोर मांडत आहे, ते दोन्हींपेक्षा पूर्णतः वेगळे असून ते विश्वकल्याणाचे आहे. भारत आपला आर्थिक विकास साधताना लोकशाहीची गळचेपी होऊ दिलेली नाही. त्यामुळे आता येणार्या काळात आपण ‘ग्रँड भारत’ जगापुढे मांडण्याची गरज आहे. त्यासाठीच, आपण ‘जी 20’च्या व्यासपीठाचा वापर केला. एक विकसनशील देश ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’ विकसित करून स्वतःमध्ये कशा प्रकारचा कायापालट घडवून आणू शकतो, हे भारताने जगाला दाखवून स्वतःला एक आदर्श म्हणून सिद्ध केले. अशाच प्रकारे भारत आपल्या विश्वबंधुत्त्वाच्या सांस्कृतिक वारशावर आधारित विश्वमित्रत्त्वाचा वारसा जगाला देत आहे. रामायणाची एकूणच संकल्पना ही विश्वमित्रत्त्वाच्या संकल्पनेवर आधारलेली आहे. ‘आम्हाला सर्वांचे भले हवे आहे आणि सर्वांशी मैत्री हवी आहे’ ही रामायणाची शिकवणूक असून भारत ती जगाला देऊ इच्छित आहे. त्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम युक्तिवाद या पुस्तकातून एस. जयशंकर यांनी केला आहे.
त्यांच्या मते, भारत ज्याप्रकारे पुढे जात आहे, ती वाटचाल रामायणातील धोरणांशी सुसंगत आहे. श्रीरामाप्रमाणेच भारताने स्वतःला अनेक पातळ्यांवर सिद्ध केले आहे. ज्या पद्धतीने रामाने अनेक समविचारी घटकांना एकत्र करुन रावणाविरुद्ध एक आघाडी तयार केली, त्याचप्रकारे भारत आपल्या हितसंबंधांना बाधा आणणार्यांविरोधात तयार करत आहे. याबाबत एस. जयशंकर यांनी उत्तम उदाहरण दिले. राजा दशरथाला चार पुत्र होते. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. या चौघांमध्ये स्पर्धात्मक हितसंबंध होते. असे असूनही त्यांच्यात काही सामायिक धागेही होते आणि मूल्यांबाबत हितसंबंधांची परस्परव्यापकताही होती. म्हणून, ते जेव्हा एकत्र आले, तेव्हा प्रचंड ताकदीने पुढे आले. हाच प्रकार आपल्याला आधुनिक काळात ‘क्वाड’मध्ये दिसून येतो. या गटाचे सदस्य असणार्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार राष्ट्रांमध्ये स्पर्धात्मक हितसंबंध आहेत. पण, सामायिक हेतूने ते पुढे आले, तेव्हा प्रचंड ताकदीने पुढे आले.
आजवर आपण राजनयाबाबत पश्चिमी उदाहरणे वाचत आलो आहोत. वस्तुतः रामायणाने राजनयाच्या बाबतीत अत्यंत उत्तम आदर्श घालून दिला आहे. हनुमान आणि अंगद व अंगदची आई तारा हे पहिले राजदूत होते. त्यांनी अत्यंत संकटमयी परिस्थितीत राजनयाचा कौशल्यपूर्ण वापर केला. या बाबी भारताने अनुसरणे गरजेचे राहणार आहे. भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांशी कशा प्रकारे मैत्री प्रस्थापित करावी, याबाबत रामायण हा एक आदर्श आहे.
आजवर भारत इतरांनी जे केले, त्याचे अनुकरण करत आला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांचे ठराव अमलात आणत आला आहे. आता भारत जगाला सांगेल आणि जग ते ऐकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती ज्यामुळे प्राप्त झाली आहे, त्या सांस्कृतिक आधाराला भारताने जागतिक स्तरावर नेणे गरजेचे आहे. केवळ रामायणाचे सिद्धांत आपण सांगणार नसून, रामायणाचे अनुपालन आपण करणार आहोत व त्या आधारावर आपली धोरणे तयार केली जाणार आहेत.
-शैलेंद्र देवळाणकर