मायलेकींच्या नात्यातील ममत्व उलगडणारा चित्रपट...

Total Views |

mai lake
 
आई सोबत असली की, आयुष्यात कितीही संकटे आली किंवा कोणतीही अडचण आली, तर तिचा सामना करण्यासाठी आपल्या मनगटात बळ असते. आई आणि मुलीचे किंवा मुलाचे नाते, हे शब्दांपलीकडे असते. आपल्या बाळाने मनातील एखादी गोष्ट जरी सांगितली नाही, तरीही नकळतपणे ती समजून त्यावर उपाय सांगणारी हक्काची मैत्रीणदेखील आईच! आजवर अनेक चित्रपटामंध्ये आई-मुलीचे नाते फार वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. पण, आजची तरुण पिढी आणि त्यांच्या पालकांमधील भावनिक, मानसिक नाते मोठ्या पडद्यावर तसे क्वचित पाहायला मिळते. पण, ‘माय लेक’ या चित्रपटातून दिग्दर्शिका प्रियांका तन्वर यांनी ते मांडण्याचे धाडस केले आहे. शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेला ‘माय लेक’ हा चित्रपट नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया....
 
‘माय लेक’ या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, परदेशात राहणारी एकल पालक आई आणि तिची १३ वर्षांची मुलगी. वैवाहिक जीवनात फार चढ-उतार पाहिल्यानंतर एका जागी स्थिरावलेली आई नोकरी करत तिच्या मुलीचा सांभाळ कसा करते, याचे उत्कट चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. विशेष म्हणजे, अशा एका अनोळखी देशात जिथे ‘आपलं’ असं म्हणायला कोणीच नाही, त्या देशात ही आई आपल्या मुलीचे संगोपन करते. त्या आईला परदेशातही महाराष्ट्राच्या लज्जतदार जेवणाची चव पोहोचवावी, असे वाटते. त्यासाठी तिला तिचे महाराष्ट्रीय उपहारगृहदेखील सुरु करायचे असते. यासाठी तिनेेकेलेली धडपड, दुसरीकडे वयाने मोठी होणारी मुलगी आणि त्यांच्यात होणारे वैचारिक वाद, असा या मायलेकींचा वेगळा, पण एकत्रित प्रवास चित्रपटाला खिळवत ठेवतो.
 
‘माय लेक’ या चित्रपटाची एक विशेष बाब म्हणजे, एकल पालकत्त्व कसे असते? त्यात नेमक्या कोणकोणत्या अडचणींचा पालकांना सामना करावा लागतो? या सगळ्या गोष्टी दोन स्त्रियांच्या नजरेतून चित्रपटात पाहताना फार निराळे वाटतो. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लिखाण करणार्‍या दोन्ही स्त्रिया जरी असल्या तरी, त्यांनी आई आणि मुलीची मानसिक स्थिती फार उत्तमरित्या आणि आजच्या घडीला परदेशात जी मराठी मायलेकींची जोडी राहत असेल, ज्या आपलं जीवन तिथे व्यतीत करत असतील, त्यांच्या मनाला भिडणारी कथा यशस्वीरित्या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अलीकडे मराठी कुटुंबातील मुलं परदेशी शिकायला म्हणून जातात आणि नंतर तिथेच स्थायिक होतात. मग काय, त्यांना भेटायला मुंबईहून त्यांचे पालक परदेशी जातात आणि तिथे मुलं आणि नातवंडांबरोबर वास्तव्य करतात. ही वास्तविक परिस्थिती दिग्दर्शिकेने चित्रपटात दाखवत कुठेही अतिशयोक्ती होणार नाही, याची विशेष खबरदारी घेतलेली दिसते. त्यामुळे आई-मुलीच्या नात्यावर आधारित अतिशय संवेदनशील असा हा विषय हुशारीने दिग्दर्शिकेने हाताळला आहे, असे नक्कीच म्हणावे लागेल.
 
अभिनयाबाबतीत म्हणायचे झाल्यास, पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता उमेश कामत यांच्यातील ‘केमिस्ट्री’ तितक्याच ताकदीने पडद्यावर झळकलेली दिसते. शिवाय, सोनाली खरेची मुलगी सनाया हिचे अभिनयातील हे पदार्पण जरी असले, तरी आजची तरूण पिढी कशी असते? त्यांची विचारसरणी, एखाद्या परिस्थितीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची मते आणि त्यांची नेमकी मनःस्थिती काय असते? याचे तंतोतंत सादरीकरण तिने आपल्या भूमिकेतून केले आहे, याबद्दल तिचे विशेष कौतुक. शिवाय, अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी अभिनयक्षेत्रात मुरलेले कलाकार कसे असतात, हे दाखवून दिले आहे.
 
‘माय लेक’ चित्रपटाच्या कथेचे सादरीकरण खरेच आजची तरुण पिढी किंवा परदेशात राहणारी मराठी कुटुंबे यांचे राहणीमान कसे असते? त्यांना परदेशात कशी वागणूक मिळते? त्यांना भारतीय म्हणून तिथे नोकरी करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? या सगळ्यांचे एक प्रतिबिंब या चित्रपटातून उमटलेले दिसते. शिवाय, आई आणि मुलीच्या नात्यातील धागेदोरे, त्यांचा एकमेकींवरील विश्वास किंवा एका अनोळख्या व्यक्तीमुळे दुरावलेला सुसंवाद, या सगळ्या बाबी कथानकामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने साकारल्या आहेत. त्यामुळे जर कुणा मायलेकीच्या जोडीत सुसंवाद नसेल, तर आईने आपल्या मुलीला काय वाटते? तिचे विचार काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी आणि मुलीने आपली आई कोणत्या मानसिक द्वंद्वातून जात असते? हे समजून घेण्यासाठी ‘माय लेक’ हा चित्रपट एकत्र नक्की पाहावा असाच!
 
चित्रपटाचे नाव : मायलेक
दिग्दर्शक : प्रियांका तन्वर
कलाकार : सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने, शुभांगी लाटकर
रेटिंग : 3 स्टार

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.