२०१९ मध्ये खोटे बोललो, हे उद्धव ठाकरेंनी कबूल केले - अतुल भातखळकर
20-Apr-2024
Total Views |
मुंबई - "आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' आणि दिल्लीला जाईन", असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्याला आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २०१९ मध्ये खोटे बोललो, हे उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे कबूल केले, असा घणाघात त्यांनी केला.
भातखळकर म्हणाले, "उद्धव ठाकरे सातत्याने खोटे बोलत आहेत. ते हताश झाले आहेत, हेच आता त्यांच्या मुलाखतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यांनी म्हटले की, आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीस तयार करणार. आता एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्यासाठी एक, दोन वर्षे लागतील. आदित्य ठाकरेंची बौद्धिक क्षमता लक्षात घेता एक, दोन वर्षे पुरतील, असे मला वाटत नाही", असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला.
"याचा अर्थ असा आहे, २०१९ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार होते, हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मान्य केले होते. २०१९ च्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद आम्हाला देणार, हा आपलाच दावा उद्धव ठाकरेंनी खोटा पाडलेला आहे. त्यांचा दुसरा दावा मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायच नव्हते, मला शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचे होते, हे सुद्धा त्यांनी खोट पाडले आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे होते. त्यामुळे २०१९ पासून उद्धव ठाकरे पूर्णपणे खोटे बोलत आहेत. हेच आज त्यांच्या मुलाखतीने स्पष्ट झाले आहे", असेही भातखळकर म्हणाले.