
मुंबई, दि.१९: मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या तीन महामार्गांच्या २६ पॅकेजमधील कामांसाठी मागविलेल्या निविदांना कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून या निविदा दाखल करण्यात आल्या आहेत.
मुंबईतून लगतच्या शहरांमध्ये जलद रस्ते वाहतुकीसाठी एमएसआरडीसीकडून विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशिय वाहतुक मार्ग उभारण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर ते पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान ९६ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाणार असून त्याचे ११ पॅकेजमध्ये काम केले जाणार आहे. यासाठी जवळपास ६० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यात १३६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ९ टप्प्यात काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत विस्तार करण्यासाठी जालना ते नांदेड असा १९० किमी लांबीचा महामार्ग उभारला जात आहे. या मार्गाचे काम ६ पॅकेजमध्ये केले जाणार आहे.
एमएसआरडीसीने काही महिन्यांपूर्वी या तीन महामार्गाच्या कामासाठी इच्छूक कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. त्यात १९ कंपन्या पात्र ठरल्या होत्या. या कंपन्यांकडून तीन महामार्गांच्या २६ पॅकेजच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होत्या. त्याच्या तांत्रिक निविदा गुरुवारी खुल्या करण्यात आल्या. यामध्ये या विविध कंपन्यांनी ८२ निविदा दाखल केल्या. यामध्ये प्रत्येक पॅकेजच्या कामासाठी तीन ते पाच कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मेघा इंजिनिअरिंग, एल अँड टी, अप्को, अफकॉन, पटेल इन्फ्रा, वेलस्पून इंटरप्रायजेस, मोन्टोकार्लो, एल अँड टी, जे कुमार, एनसीसी, आयआरबी, गावर कन्स्ट्रक्शन, जीआर इन्फ्रा, नवयुगा, रोडवेज आदी कंपन्यांचा समावेश आहे.