अहमदाबाद दिल्ली अंतर १२ तासांहून ३.५ तासांवर

बुलेट ट्रेन प्रकल्प वाचविणार प्रवासाचा वेळ

    19-Apr-2024
Total Views |

bullet train


मुंबई दि.१९ :
लांब अंतरावरील प्रवासासाठी वेळेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ३.५ तासांवर येण्याची शक्यता आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर गुजरातमधील हा दुसरा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असेल. रेल्वेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. ज्यात सांगितले आहे की , ट्रेनचा प्रवास शहरातील साबरमती स्थानकावरून सुरू होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी साबरमती स्थानकावर मल्टी मॉडेल हब उभारण्यात येईल.

बुलेट ट्रेन एका एलिव्हेटेड कॉरिडॉरवर सरासरी २५० किमी प्रतितास वेग गाठू शकते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही ट्रेन गुजरात, राजस्थान आणि हरियाणामधील स्थानकावरून मार्गक्रमण करेल. हिम्मतनगर, उदयपूर, भिलवाडा, चित्तोडगड, अजमेर, किशनगड, जयपूर, रेवाडी आणि मानेसर स्टेशन पार करेल.रेल्वेने नुकताच अंतिम केलेल्या तपशीलवार प्रकल्प अहवालात मार्गाची रूपरेषा दिली आहे. अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेनचा प्रस्ताव हा भारतातील विविध प्रदेशांमध्ये हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प सुरू करण्याच्या सरकारच्या योजनेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि पर्यटनाला चालना देणे आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अहमदाबाद आणि दिल्ली दरम्यान सुमारे ९०० किमी उन्नत कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा सुमारे नऊ तासांचा प्रवास वेळ वाचेल अशी अपेक्षा आहे.