स्टुअर्ट लेकॉक या ब्रिटिश लेखकाचं नवं पुस्तक. सध्या इंग्रजीत पुस्तकांची नावं लांबवचक ठेवण्याची फॅशन आहे. लेकॉकच्या या पुस्तकाचं नाव आहे-‘ऑल द कंट्रीज वुई हॅव एव्हर इनव्हेडेड ः अॅण्ड द फ्यू वुई नेव्हर गॉट राऊंड टु’. हे नाव म्हणायचे की मालगाडी? संपतच नाही!
पण जगाचा नकाशा पाहिलात, तर असे दिसेल की, आशिया खंड आणि युरोप खंड यांचा एकत्रित भूभाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सगळ्यात मोठा भूभाग आहे. आधुनिक भौगोलिक संकल्पनेनुसार या भूभागाला ‘युरेशिया’ (युरोप आणि आशिया) असे म्हणतात. आता गंमत पाहा हं! ही आधुनिक संकल्पना मांडली कुणी, तर युरोपीय भूगोलतज्ज्ञांनी आणि ते बारीक-सारीक बाबतीतसुद्धा स्वत:चा वरचश्मा कसा ठेवतात पाहा. आशिया खंड मोठा आहे आणि युरोप खंड लहान आहे. पण, तरी नावामध्ये युरोप अगोदर आणि वर ते आम्हाला युक्तिवाद सांगणार की, ‘युरेशिया’ हे नाव उच्चारायला सोप सुटसुटीत आहे. गोर्या चामडीसमोर लाळ घोटणारे आमचे बुद्धिमंत नि विचारवंत हा युक्तिवाद मान्य करणार.
हिंदू संकल्पनेनुसार, या युरेशियाला ‘जंबुद्बीप’ही संज्ञा होती. हिंदू संकल्पनेनुसार राजा या व्यक्तीने महत्त्वाकांक्षी, विजयाकांक्षी असलेच पाहिजे. राजाने महाराजा, सम्राट, चक्रवर्ती सम्राट बनण्याची आकांक्षा बाळगलीच पाहिजे. त्यासाठी त्याने राजसूर्य, अश्वमेध इत्यादी यज्ञ करून दिग्विजय केलाच पाहिजे. भारताच्या आज ज्ञात असलेल्या इतिहासात संपूर्ण जंबुद्वीप आपल्या राज्यात-साम्राज्यात आणणारा पहिला चक्रवर्ती सम्राट होता राजा मांधाता. हा मांधाता प्रभू रामचंद्राच्या कित्येक पिढ्यांपूर्वी होऊन गेला.
या वृत्तांतावरून कुणाला असे वाटेल की, प्राचीन हिंदू विचारवंत हे पक्के साम्राज्यवादी होते, तर ते होतेच साम्राज्यवादी. पण, त्यांचा साम्राज्यवाद आणि आधुनिक काळात मार्क्सवाद्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला शिवी देण्यासाठी वापरलेले साम्राज्यवादी, सरंजामशाहीवादी इत्यादी शब्द यांच्या मूळ संकल्पनेतच जमीन-अस्मानाचा फरक आहे. राजाने महाराजा, सम्राट, चक्रवर्ती सम्राट बनत असतानाच प्रजेचे पुत्रवत पालन करावे, भगवान विष्णू हा सर्वच प्राणिमात्रांचा पालक आहे. आपण त्याचे प्रतिनिधी आहोत. तेव्हा प्रजेचे पोटच्या मुलाप्रमाणे न्यायाने, धर्माने, प्रेमाने पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे, याची त्या राजांना पुरेपूर जाणीव होती. मांधाता, शिबी, रामचंद्र, युधिष्ठिर या प्राचीन राजांची गोष्ट सोडा, पण अगदी आत्ताच्या बडोदा नरेश समाजीराव गायकवाड आणि करवीर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनाही आपण एक हिंदू राजा आहोत, आपण आपल्या प्रजेचे पिता आहोत, याची पूर्ण जाणीव होती.
मार्क्सने ज्यांना साम्राज्यवादी ‘इंपिरिअलिस्ट’ ही शिवी हासडली त्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि अर्थातच इस्लामी तुर्क सत्ताधीशांची स्थिती नेमकी याच्या उलट होती. लष्कराच्या, आरमाराच्या बळावर नवनवीन प्रदेश व्यापावेत. तिथल्या राजांना विश्वासघाताने ठार मारावे. लोकांना लुटून, पिळून, जाळून बाटवावे. गुलाम बनवावे. त्यांची संपत्ती छिनावून घ्यावी. त्यांच्या बायका-मुली तर पळवाव्यातच, पण त्यांचे लहान मुलगेही पळवून विकृत वासना शमवाव्यात.
मार्क्सने साम्राज्यवाद्यांचा निषेध करून ‘प्रोलटरियेट’च्या म्हणजे ’कष्टकर्यांच्या राज्या’चा पुरस्कार केला. पण, रशियात आणि चीनमध्ये ते ’कष्टकर्यांचं- श्रमिकांचं राज्य’ प्रत्यक्षात अवतरल्यावर त्यांनी स्वतःच्या देशातल्या आणि अन्य जिंकून घेतलेल्या देशातल्या जनतेवर इतके अनन्वित अत्याचार केले की, साम्राज्यावादसुद्धा फिका पडला. आपल्या राज्यातल्या एका गरिबाच्या गाई चोरांनी पळवल्या म्हणून भर मध्यरात्री धनुष्यबाण घेऊन घराबाहेर पडणारा वीर अर्जुन; आपल्या राज्यातल्या शेतकरी जगावा, म्हणून नाना प्रकारच्या जमीनधारणेच्या योजना राबवणारे, सामान्य रयतेच्या मागे डोंगरासारखे उभे ठाकलेले शिवछत्रपती आणि आपल्या राज्यातले शेतकरी सामुदायिक शेतीला विरोध करतात म्हणून त्यांची साफ कत्तल उडवणारे लेनिन-स्टॅलिन हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे स्टुअर्ट लेकॉक या ब्रिटिश लेखकाचं नवं पुस्तक. सध्या इंग्रजीत पुस्तकांची नावं लांबवचक ठेवण्याची फॅशन आहे. लेकॉकच्या या पुस्तकाचं नाव आहे-‘ऑल द कंट्रीज वुई हॅव एव्हर इनव्हेडेड ः अॅण्ड द फ्यू वुई नेव्हर गॉट राऊंड टु’. हे नाव म्हणायचे की मालगाडी? संपतच नाही!खरं म्हणजे स्टुअर्ट लेकॉक हा रोमच्या इतिहासाचा अभ्यासक रोमन सेनापती कसे जगभर गेले आणि त्यांनी प्रंचड रोमन साम्राज्य कसे निर्माण केले, या विषयावर त्याने एक पुस्तक लिहिले. ते वाचून त्याचा स्वतःचाच पोरगा त्याला म्हणाला, “आपल्या ब्रिटनने जगातल्या कोणकोणत्या देशांवर आक्रमण केलं होतं?” ब्रिटनने एकेकाळी जगाच्या पाचही खंडात साम्राज्य गाजवलं होतं. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, ही गोष्ट ब्रिटनमधली बारकी पोरंदेखील विसरलेली नाहीत. नव्हे, ती ते विसरणार नाहीत, याची काळजी तिथल्या शिक्षण पद्धतीनेच घेतलेली आहे. आमच्या पोरांना मात्र जंबुद्वीपाचा चक्रवती सम्राट मांधाता माहीतसुद्धा नाही. त्यांना एकतर उघड्यावाघड्या नट-नट्या माहिती आहेत किंवा मग ‘मेरे बाप का सपना - सारी दुनिया का माल अपना’ म्हणणारे सटोडिये माहिती आहेत. नव्हे, त्यांना तेवढंच माहिती असावं, यासाठीच आमची कारकून निर्मिती करणारी शिक्षणपद्धती आहे. हे हिंदू लोक सिंहासारखे शूर आहेत. त्यांच्या पराक्रमाचा त्यांना विसर पाडा, पैसा आणि वासना यांच्यातच त्यांना मग्न राहू द्या.
जगातील शांततेची कबुतरं उडवीत बसणार्या या बावळटांना त्या कबुतरांसारखंच मठ्ठ आणि दुर्बळ राहू द्या. म्हणजेच आम्ही सुखाने जगावर राज्य करू, असे हे फार मोठं कारस्थान आहे आणि ते सुखाने चालू आहे, तर आपल्या पोराचे हे चिमणे बोल ऐकून स्टुअर्ट लेकॉक एकदम खडबडून उठला. त्याला संशोधनाचा एक नवीन विषय मिळाला. खूप संशोधन करून अखेर त्याने वरील लांबलचक मथळ्याचं पुस्तकच लिहिले. त्याचं तात्पर्य असे की, आज जगात सुमारे २०० देश आहेत. त्यापैकी १७८ देशांवर ब्रिटनने कधी ना कधी राज्य तरी केले होते किंवा आक्रमण करून तो देश जिंकण्याचा प्रयत्न तरी केला होता. लेकॉकने आपल्या पुस्तकात जगभरच्या देशांची अकारविल्हे (म्हणजे सध्याच्या कॉन्व्हेंट मराठीत अल्फाबेटिकल) यादीच दिली आहे. फक्त २२ देश असे आहेत की, ज्यांच्यावर ब्रिटनने कधीच आक्रमण केले नव्हते.
आपल्या या पुस्तकाबद्दल बोलताना लेकॉकने अनेक गोष्टी सूचित केल्या आहेत. “मी संशोधनाला सुरुवात केली आणि चकितच होत गेलो. मी कधी कल्पनाही केली नव्हती, अशा दूरदूरच्या देशांमध्ये जाऊन तिथे राज्य स्थापन करण्याचा आमच्या लोकांचा हा खटाटोप वाचून मी थक्क झालो,” लेकॉक म्हणाला, १९४० साली हिटलर युरोपात सर्वत्र वेगाने पुढे सरसावत होता. खुद्द ब्रिटन जर्मन हवाईदलाच्या कजाखी बॉम्बवर्षावाने भाजून निघत होता. ब्रिटिश सेना रणांगणावर सर्वत्र मार खात होत्या. अशा त्या विपरित काळात एका ब्रिटिश जहाजाने ब्रिटनच्या वायव्येला असलेल्या आईसलँड या चिमुकल्या देशावर सरळ हल्ला चढवला. या जहाजावर नौसैनिक किती होते म्हणाल, तर फक्त ७४५. कप्तानाने आईसलँड सरकारला संदेश पाठवला की, ’महायुद्धात तुम्ही कोणत्याच बाजूने उतरलेला नाहीत. म्हणून आम्ही तुमच्यावर आक्रमण करीत आहोत.’
१९४५-४६ साली तर यापेक्षाही आश्चर्यकारक प्रकार ब्रिटिश सैन्याने केला. खरं म्हणजे, दुसरे महायुद्ध नुकतंच संपले होते आणि त्यात ब्रिटनचा भयंकर शक्तिपात झाला होता. दोन पिढ्या रणांगणावर कापल्या गेल्या होत्या. तरीही व्हिएतनाम हा देश आपल्याच ताब्यात राहावा म्हणून ब्रिटिश सैन्य स्थानिक कम्युनिस्ट गनिमांशी लढू लागले. पुढे या लढाईत फ्रेंच आणि अमेरिकनही उतरले नि ब्रिटिश बाजूला झाले.
लेकॉक म्हणतो, ’‘जगाच्या कानाकोपर्यात जाऊन आपले राज्य स्थापन करण्याच्या या उपद्व्यापात आमच्या मागोमाग फक्त फ्रेंचांचा क्रमांक लागेल” आणि पुढे तो टवाळखोर भाषेत म्हणतो, ‘’आता नव्या युगात अमेरिका हा उपद्व्याप अगदी मनापासून करते आहे.” खुद्द अमेरिका हे एकप्रकारे ब्रिटनचंच पोर आहे, तर फ्रान्स हा ज्या काळात ‘गॉल’ या नावाने ओळखला जात असे, त्या काळात ब्रिटनने त्या गॉलवरही आक्रमण केलेले आहे.
ज्या २२ देशांवर ब्रिटनने आक्रमण केलेले नाही, त्यात मंगोलिया हा एक मोठा देश आहे. लेकॉक म्हणतो, ’कदाचित एखादी ब्रिटिश तुकडी मंगोलियावर गेलीही असेल, पण मला पक्का पुरावा अद्याप सापडलेला नाही.’ मंगोलियाचा हा खास उल्लेख अशासाठी की रोमन साम्राज्यानंतर १२व्या-१३व्या शतकात प्रचंड मंगोल साम्राज्य चंगेजखान याने उभारले होते. त्याच्या सरहद्दी मंगोलिया, चीनपासून पार पश्चिम युरोपपर्यंत पोहोचल्या होत्या. एवढं प्रचंड साम्राज्य कमावून ब्रिटनने ते कसे चालवते, याबद्दल मात्र लेकॉक कोणतेही भाष्य करीत नाही. करू शकणारही नाही. कारण, ब्रिटिशांचे औरस वंशज असलेल्या अमेरिकनांनीच त्यांच्या शोषणाविरूद्ध बंड पुकारून आपलं स्वतंत्र राष्ट्र उभारतो, हे जगाच्या डोळ्यांसमोरच आहे. शौर्य आणि कौर्य, दिग्विजय आणि गिधाडी आक्रमण, विजयाकांक्षा आणि लालसी महत्त्वाकांक्षा यात फरक असतो.