दक्षिण भारतातील केरळ राज्यात डाव्या पक्षांचे अर्थात कम्युनिस्टांचे स्पष्ट वर्चस्व आहे. त्याबरोबरच काँग्रेस पक्षदेखील येथे मजबूत आहे. कारण, गत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राज्यातील एकूण २० पैकी सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे केरळमध्ये भाजपला विजयासाठी दीर्घकाळपासून मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याचप्रमाणे राज्यात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ या पक्षाचाही मोठा प्रभाव आहे.
केरळची स्थूलमानाने उत्तर केरळ, मध्य केरळ आणि दक्षिण केरळ या तीन क्षेत्रांमध्ये विभागणी करता येते. उत्तर केरळ : राज्याचे एकूण चार जिल्हे केरळच्या उत्तरेकडील भागात आहेत. कासारगोड, वायनाड, कन्नूर आणि कोझिकोड. येथेही कासारगोड आणि कोझिकोड जिल्ह्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या निर्णायक भूमिका बजावते, तर कन्नूर आणि वायनाडमध्ये मुस्लिमांसह मोठ्या संख्येने ख्रिश्चन आहेत. येथे तीन जिल्ह्यांत हिंदू लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.
मध्य केरळ : केरळच्या मध्यवर्ती भागात - मलप्पुरम, पलक्कड, त्रिशूर आणि एर्नाकुलम असे चार जिल्हे आहेत. मलप्पुरममध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे, तर उर्वरित तीन जिल्ह्यांमध्ये त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. मध्य केरळमध्ये हिंदू मतदारांची फारशी भूमिका नाही. ‘एलडीएफ’ आणि ‘युडीएफ’ या दोन्ही आघाड्यांनी येथे आपली मतपेढी मजबूत केली आहे.
दक्षिण केरळ : केरळच्या दक्षिणेकडील भागात एकूण सहा जिल्हे आहेत - इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, पठानमथिट्टा, कोल्लम आणि तिरुवनंतपुरम. येथे, इडुक्की आणि कोट्टायम अल्पसंख्यांक जिल्हे म्हणून ओळखले जातात, तर अलप्पुझा, कोल्लम आणि तिरुवनंतपुरममध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे.
केरळमध्ये सध्या तरी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांचा राजकारणावर प्रभाव आहे. या दोन धर्मांमधील युती सरकारची भूमिका ठरवेल असे दिसते. १९८२ पासून केरळमध्ये ‘एडीएफ’ किंवा ‘युडीएफ’ची सरकारे स्थापन झाली आहेत. येथेही मागासवर्गीयांमध्ये डाव्यांची उपस्थिती भक्कम आहे. तर, ‘युडीएफ’ ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
भाजपसाठी या दक्षिणेकडील राज्यात नायर समाज सर्वात महत्त्वाचा आहे. या समाजाची लोकसंख्या १५ टक्के असून शबरीमला प्रकरणानंतर हा समुदाय भाजपकडे आकर्षित होऊ लागला आहे. नायर व्यतिरिक्त एझवा समाजाचीही केरळमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा वाटा जवळपास २८ टक्के आहे आणि विद्यमान मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे स्वतः या समाजाचे आहेत.
ख्रिश्चनांबद्दल बोलायचे झाले तर ते केरळमध्ये १८.३८ टक्के आहेत, तर, मुस्लिमांची लोकसंख्या २६ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे भाजपसाठी केरळमध्ये हिंदू अधिक ख्रिश्चन मतदारांना आकर्षित कऱण्याची रणनीती महत्त्वाची ठरते.
‘द केरला स्टोरी’ आणि ‘स्नेहयात्रा’ - भाजपच्या रणनीतीस साहाय्यकारी ठरणार?
‘लव्ह जिहाद’ आणि त्यातून दहशतवादाचे सत्य मांडणारा ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा देशभरात लोकप्रिय झाला. यामध्ये केरळ केंद्रस्थानी होते. या सिनेमामध्ये डाव्यांची नास्तिकता, हिंदूविरोध आणि त्याचवेळी मुस्लिमांचे लांगूलचालन; मुस्लीम वगळता हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना जिहादी मानसिकतेच्या तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात फसविणे आणि त्यानंतर त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये करवून घेणे आणि त्यास असलेला मशिदीचा पाठिंबा; हे दोन परस्परांमध्ये गुंतलेले मुद्दे अतिशय नेमकेपणाने दाखविले होते. साधारणपणे कम्युनिस्टांचा धर्मास विरोध असतो,.म्हणजे, इतरांचे ब्रेनवॉशिंग करण्यासाठीतरी ते तसे दाखवितात. केरळमध्ये अशाच प्रकारचा लाभ मुस्लीम जिहादी मानसिकेने घेतल्याचे सिनेमामध्ये दाखविण्यात आले. त्यास केरळमध्येही मोठा प्रतिसाद लाभला.
विशेष म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना प्रथम केरळमधीलच ख्रिश्चन धर्मियांनी ऐरणीवर आणली होती. ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचे चर्चने म्हटले होते. त्यामुळेच केरळमधील अनेक चर्चनी या सिनेमास उचलून धरले. त्याचवेळी ‘लव्ह जिहाद’विरोधात सत्ताधारी डाव्या पक्षांचे सरकार काहीही करत नसल्याचे ख्रिश्चन धर्मियांना खटकत असल्याचेही स्पष्ट आहे. तसेच काँग्रेसची ‘लव्ह जिहाद’विषयक भूमिकाही सर्वश्रृत आहे. आता काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर हा सिनेमा दाखविण्यात आला. त्याचेही ख्रिश्चनांमधील एका वर्गाने स्वागत केले आणि काही चर्चनेदेखील त्यांच्यातर्फे या सिनेमाच्या खेळाचे आयोजन केले होते.
त्याचप्रमाणे भाजपने राज्यातील ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी गतवर्षी स्नेहयात्रा अभियान राबविले. याअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी माउंट सेंट थॉमस येथील सायरो मलबार चर्चचे माजी प्रमुख कार्डिनल जॉर्ज लेन्चेरी, रापोलीच्या लॅटिन आर्कडिओसीसचे मुख्य बिशप जोसेफ कलातीपराबिल या प्रमुख धार्मिक नेत्यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे अगदी प्रत्येक गावामध्ये अतिशय बारकाईने नियोजन करून ख्रिश्चनांना भाजपची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन भूमिका मांडण्यावर भाजपने भर दिला होता. अर्थात, तरीदेखील ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान करणार, असे भाजप नेत्यांचे अजिबात मत नाही. मात्र, ख्रिश्चन समुदायाच्या मनात भाजपविषयी सकारात्मक मत तयार होत असल्याचा भाजप नेत्यांना विश्वास आहे.
२४ टक्के मुस्लीम मते ठरणार निर्णायक
केरळच्या ३.३० कोटी लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचा वाटा २४ टक्के आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांची कामगिरी फारच खराब होती. त्यांना फक्त एक जागा जिंकता आली, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘युडीएफ’ने १९ जागा जिंकल्या होत्या. राहुल गांधी यांचे वायनाडमधून उमेदवार म्हणून आगमन आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री विजयन यांनी शबरीमला मंदिराबाबत घेतलेली चुकीची भूमिका, या दोन कारणांनी मुस्लिमांनी डाव्यांकडे पाठ फिरविल्याचे राज्यातील राजकीय जाणकार सांगतात. तथापि, विजयन यांनी तत्काळ ‘डॅमेज कंट्रोल’ करून २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांचा पाठिंबा पुन्हा मिळवून सत्ता प्राप्त केली होती. परिणामी, यंदाही मुस्लीम मते महत्त्वाची ठरणार आहेत.
राहुल गांधींना डाव्यांचे आव्हान
एकीकडे काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीत डाव्या पक्षांचाही समावेश आहे. त्याचवेळी केरळमध्ये वायनाड येथे विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात डाव्या पक्षांच्या अॅनी राजा रिंगणात आहेत. डाव्यांनी राहुल गांधी हे मुस्लीमविरोधी असल्याचा प्रचार चालवला आहे. त्याचवेळी भाजपने यावेळी आपले प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या रूपात तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे वायनाडमध्ये लढत रंगतदार होणार आहे.
भाजपतर्फे केंद्रीय मंत्री लोकसभेच्या रिंगणात
भाजपने तिरुवनंतपुरमचे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना, तर अट्टिगंल येथून केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. दोघेही मंत्री प्रथमच लोकसभा लढवत आहेत. मात्र, याद्वारे केरळच्या मतदारांना स्पष्ट संदेश देण्याची भाजपची रणनीती आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचे भाजपवासी झालेली पुत्र अनिल अँटोनी यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.