जगात काही माणसं ही सर्वार्थाने वेगळी असतात, ती त्यांच्यातील कलेमुळे, स्वभावगुणांमुळे किंवा अन्य वैशिष्ट्यांमुळे. निलेश आर्टिस्ट हा असाच एक विस्मयकारक कलावंत. त्याच्याविषयी...
जगात काही माणसं वेगळी असतात ती त्यांच्यातील कलेमुळे, स्वभाव गुणांमुळे किंवा अन्य वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहतात. निलेश आर्टिस्ट हा असाच एक विस्मयकारक कलावंत.माणसांच्या भावनांना बोलकं करणारा बोलतं ठेवणारा निलेश हा एक बुद्धिमान कलावंत आहे. पुण्यातील चांदनी चौकातील चित्रकारी असो की, नारायण पेठेतील भगवान शिव यांची भव्य कलाकृती, सीओईपी पूलानजीक सर मोक्षगुंडम विश्वेसरैय्या यांचे चित्र, छत्रपती शिवाजी महाराज, आबासाहेब गरवारे कॉलेमधील भीत्तीचित्र, गणेशउत्सव, पुणे स्टेशननजीक गणेशउत्सवाच्या१२५ व्या वर्षानिमित्त केलेली कलाकृती एवढेच नव्हे, तर हडपसर येथील १६ हजार फूट एवढ्या भिंतीवर चितारलेली कला या सगळ्या निलेश खराडे यांच्या अद्भुत कलागुणांचे प्रतीक आहेत.
हा तरुण आज निलेश आर्टिस्ट नावानेच परिचित आहे. सोलापुरातून हा तरुण दहावी पूर्ण केल्यानंतर घरातून चक्क केवळ कलेसाठी पळून आला. स्वारगेटजवळील एका मंदिरात राहून काही दिवस गुजराण करणार्या निलेशचे यश आजच्या तरुणांना अत्यंत प्रेरणा देणारे आहे. आपल्या आई-वडिलांची नाराजी चक्क महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेल्या प्रशंसेतून दूर करून स्वतःला आपल्या माता-पित्यांपुढे एक आदर्श मुलगा म्हणून सिद्ध करण्याची निलेश याची कामगिरी नक्कीच दखलपात्र आहे.
निलेशने आज अनेकांना आनंद देत कलेसाठी अथक परिश्रम केलेत. सामाजिक भान असलेल्या या तरुणाने कलेचे सामर्थ्य अबाधित राखले. सोलापुरातून निलेश पुण्याला जाण्यासाठी निघाल्यावर त्याने मागे वळून पाहिले नाही, ‘म्युरल आर्ट’मध्ये तरबेज असलेल्या निलेश यांच्या कामगिरीचा प्रवास अत्यंत रंजक आहे. लहानपणी खूप रंगकाम करणार्या निलेश यांना आपल्यातील उपजत कलागुणांचा मार्ग गवसला. त्यावेळी आपल्यावर गावी पेंटर म्हणून शिक्का लागणे आणि चित्रकलेकडे व्यवसाय म्हणून तुच्छतेने बघणे वेदनादायी होते.
कलेवर नितांत प्रेम असल्यामुळे या कलेतील अधिकाधिक नावीन्य शोधत प्रवास जारी ठेवला आणि कला ही केवळ कलादालनांपुरतीच का मर्यादित राहता कामा नये, ती प्रत्येकासाठी उपलब्ध असली पाहिजे, म्हणूनच म्युरल आर्टला त्यांनी विकसित केले. निलेश कलाकार निलेश आर्टिस्ट म्हणून ओळख मिळविणार्या तरुणाने १०० पेक्षा जास्त भीत्तीचित्रे बनवली आहेत. संपूर्ण भारतभर आणि पुण्यातच त्यांची कितीतरी भीत्तीचित्र आहेत. यासाठी त्यांना वेळोवेळी दीपकभाऊ मानकर यांनी मदत केल्याचे निलेश आवर्जून सांगतात. निलेशचा स्ट्रीट आर्ट प्रवास २०१४ मध्ये सुरू झाला. जेव्हा मुंबईतील एमटीएनएल इमारतीची भिंत रंगविताना त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचे १२०-१५० फूट उंच असे भीत्तीचित्र रेखाटले. सलग सात दिवस हे काम चालले, हे म्युरल आशियातील सर्वांत मोठे आहे आणि स्ट्रीट आर्ट व भारतीय चित्रपट यांच्यातील समन्वय दाखवते. डिसेंबर २०१४ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, आई आणि विशेषतः वडिलांची नाराजी माझ्यावर कायम होती, ही बाब अमिताभ बच्चन यांना कळली तेव्हा त्यांनी निलेश याच्या टी-शर्टवर ‘ऑटोग्राफ’ केला आणि वडिलांना ते भेट देण्यास सांगितले. अमिताभ बच्चन यांचे चाहते असलेल्या निलेशच्या वडिलांना जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्यांनी हा दुरावा कायमचा संपविला आणि निलेश हे पुन्हा घराघरातील लोकांच्या मनात परतले.
काही वर्षांपूर्वी निलेश यांनी नेपाळमधील काठमांडूला भेट दिली आणि तेथे प्रचलित जीवंत देवी परंपरेची ओळख झाली. काठमांडू खोर्यात, तरुण नवरी मुलींची देवता म्हणून पूजा केली जाते. मुलीची निवड केली जाते. या परंपरा काहीशा अप्रिय अशाच असतात ती मुलगी कठोर परीक्षांना सामोरे जाते. एकदा निवडल्यानंतर, औपचारिक कार्यक्रम असल्याशिवाय ती तिचा वाडा सोडू शकत नाही. तिला तिच्या कुटुंबापासून दूर ठेवले जाते. निलेश यांच्या सामाजिक भान असलेल्या मनाने ही बाब हेरली आणि आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी याबाबत तेथील समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, काठमांडूच्या थामेल भागात झोस्टेलच्या भिंतीवर कुमारी म्युरल बनवले आणि आश्चर्याची बाब म्हणजे या कलाकृतीचा अनेक लोकांवर सकारात्मक परिणाम झाला व अनेकांनी या विचित्र परंपरा सोडण्याचा निर्णय घेतला.
२०१७ मध्ये निलेश यांनी दानापूर रेल्वे स्टेशन पेंट केले आणि त्यांची ही कलाकृती आर्यभट्ट यांना समर्पित केली. प्रख्यात गणिततज्ज्ञ असलेल्या आर्यभट्ट यांच्यासाठी त्यांच्या जन्मभूमीत ही केलेली सेवा निलेश यांच्यासाठी खूप मोठे समाधान देणारी आहे. याशिवाय अर्जन गड मेट्रो स्टेशनच्या फेसलिफ्टसाठीदेखील सिंगापूरच्या कलाकारांसोबत निलेश यांनी सहकार्य केले. निसर्गाच्या थीमवर आधारित कलाकृती आता दैनंदिन प्रवाशांसाठी एक दृश्य प्रेरणा प्रदान करते.कठीण हवामानात काम करणे, दीर्घकाळ रेखाचित्रे काढणे आणि पेंटिंग करणे, वस्तुस्थिती आणि कलाकृती संबंधित ठेवणे ही निलेशसमोरील काही प्रमुख आव्हाने आहेत. केदारनाथमध्ये उणे चार अंश सेल्सिअस तापमानात भगवान शिवाचे एक आजीवन चित्र बनवले. ते बनविल्याचा अनुभव निलेश यांच्यासाठी आव्हानात्मक होता अर्थात त्याची सर्वत्र प्रशंसा झाली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निलेश यांनी सहा तास लागले.
राजस्थानमध्येदेखील प्रचंड तापमान असताना आणि केरळमध्ये मुसळधार पावसात म्युरल्स बनवण्याची आव्हाने निलेश यांनी लीलया पेलली आहेत.म्युरल बनवण्यामागे बरीच विचारप्रक्रिया असते. असे त्यांचे म्हणणे आहे, आपली बहुतांश कलाकृती ही इतिहास आणि पौराणिक व्यक्तीरेखांभोवती फिरत असल्याने, निलेश यांना अधिक काळजी घ्यावी लागते. लोकांच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाहीत हे मोठे आव्हान असते. भव्यता ही त्यांच्या कलाकृतीची खासियत आहे.
आजही निलेश हे आपल्या कार्यात मग्न आहेत, अगदी तरुणाईत भव्य आणि प्रेरणादायी अशी त्यांची म्युरल्स इतरांनादेखील कार्य करण्यास प्रवृत्त करणारी आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
संपर्कासाठी त्यांचा क्रमांक