रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रामायणातील याच काही खगोलीय घटनांचा मागोवा घेणार आहोत.
‘रामायण‘ या महाकाव्याचे महर्षी वाल्मिकी हे निर्माते आहेत. हा ग्रंथ केवळ धार्मिक नसून ऐतिहासिक आहे. या ग्रंथामध्ये (१) बालकांड (२) अयोध्याकांड (३) अरण्यकांड (४) किष्किंधाकांड (५) सुंदरकांड (६) युद्धकांड आणि (७) उत्तरकांड अशी सात कांडे असून सर्गसंख्या ६४५ आणि २४ हजार श्लोक आहेत. या आदिकाव्यात इक्ष्वाकु वंशातला पुरुषोत्तम श्रीराम यांचे चरित्र वर्णन केलेले आहे.
या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी खगोलशास्त्रीय घटनांचे दाखले दिलेले आहेत. हे दाखले अभ्यासले की, “महर्षी वाल्मिकींना सखोल खगोलशास्त्रीय ज्ञान होते, हे दिसून येते. खगोलीय घटना या नियमबद्ध होत असतात. त्यांच्यावरून घटनांचा काल सांगता येतो. रामायणात महर्षी वाल्मिकींनी उल्लेखलेल्या अनेक घटनांचा संशोधकांनी अभ्यास करून, रामायणाचा काल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.”
राम जन्म
ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययु: ।
ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ ॥ (१८.८)
नक्षत्रेऽदिति दैवत्ये स्वोच्चसंस्थेषु पय्चसु ।
ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पताविन्दुना सह ॥ (१८.९)
प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोक नमस्कृतम् ।
कौसल्याजनयद् रामं दिव्यलक्षणसंयुतम् ॥ (१८.१०)
तेव्हा यज्ञ समाप्त झाल्यावर सहा ऋतू व १२ महिन्यानंतर चैत्र शुद्ध नवमीस पुनर्वसू ( मध्यान्ही पुष्य ) नक्षत्री, पाच ग्रह उच्चस्थानी असता कर्क लग्नी व गुरू पुनर्वसूमध्ये असताना कौसल्येने दिव्य लक्षणांनी युक्त श्रीरामास जन्म दिला.
महर्षी वाल्मिकींनी रामजन्माच्या वेळची आकाशातील ग्रह-नक्षत्र स्थिती अशाप्रकारे वर्णन केलेली आहे. यात पाच ग्रह उच्चस्थानी म्हटले आहे, त्यावरून काही संशोधकांनी रामजन्माच्या वेळी सूर्य मेष राशीत, गुरू पुनर्वसू नक्षत्रात, शुक्र मीन राशीत, मंगळ मकर राशीत, शनी तुला राशीत आणि चंद्र सकाळी पुनर्वसू नक्षत्रात आणि मध्यान्ही पुष्य नक्षत्रात अशी ग्रहस्थिती असल्याचे म्हटले आहे. त्या दिवशी सकाळी चैत्र शुक्ल अष्टमी होती आणि मध्यान्ही चैत्र शुक्ल नवमी होती. या सर्व खगोलीय घटनांवरून पूर्वी अशी खगोलीय स्थिती कधी झाली होती, त्याविषयी संशोधन करून, ‘ रामजन्माचा काल सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
(१) डॉ. एस. पी. सुब्रथनम्, एन. पी. रामदुराई आणि बी. सुंदरम् यांनी रामजन्माचा दिवस इसवी सन पूर्व १७ जानेवारी १०२०५ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
(२) डॉ. प. वि. वर्तक यांनी इसवीसन पूर्व ४ डिसेंबर ७३२४ हा रामजन्माचा दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला आहे.
(३)पुष्कर भटनागर यांनी रामजन्माचा दिवस इसवी सन पूर्व १० जानेवारी ५११४ असावा असे म्हटले आहे.
(४ एम. आर. यार्दी यांनी रामायणाचा काल इसवी सन पूर्व १५०० असल्याचे संशोधन केले आहे.
(५) निलेश ओक यांनी रामजन्माचा दिवस इसवी सन पूर्व २९ नोव्हेंबर १२२४० असल्याचा प्रस्ताव मांडला आहे.
(६) श्री प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी रामजन्माचा दिवस इसवी सन पूर्व १ जानेवारी ५६४८ असावा असे संशोधन केले आहे.
या सर्व संशोधकांनी महर्षी वाल्मिकींनी रामायणात रामजन्माच्यावेळची खगोलीय स्थिती दिली आहे, त्यावरून संशोधन केलेले आहे. अर्थात हे सर्व संशोधन आहे. यापुढेही अनेक संशोधक पुढे येऊन, आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, अधिक संशोधन करीतच राहतील. यापुढील संशोधकांना अगोदरच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास करण्याची संधी मिळते, तसेच आधुनिक संगणकांचा आणि तंत्रज्ञानाचाही उपयोग करून अधिक अचूक संशोधन करणे शक्य होत असते. यावरून एक गोष्ट मात्र महत्त्वाची वाटते की महर्षी वाल्मिकींनी रामायणात अनेक ठिकाणी केलेल्या खगोलीय स्थितीच्या वर्णनाचा संशोधकांना खूप उपयोग होत असतो.
प्रफुल्ल मेंडकी यांचे संशोधन
माझे मित्र प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी वाल्मिकी रामायणातील खगोलशास्त्रीय उल्लेख यांचा अभ्यास करून संगणकाच्या साहाय्याने संशोधन करून ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध‘ हा ग्रंथ लिहिला आहे. ‘पुष्पक’ प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेचे श्री. ह. ल. निपुणगे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. आज आपण प्रथम या त्यांच्या संशोधनाची ओळख करून घेऊया. या ग्रंथाला प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे.
प्रा. मोहन आपटे प्रस्तावनेत म्हणतात, “वाल्मिकी रामायणात विशिष्ट प्रसंगी आकाशातील ग्रहतार्यांची स्थिती स्पष्टपणे सांगितलेली आहे. याचा अर्थ महर्षी वाल्मिकी यांना ग्रहनक्षत्रांची उत्तम माहिती होती. त्याचप्रमाणे भारतीय पंचांगातील तिथी, ग्रहणे, अधिकमास , ऋतू, दक्षिणायन, उत्तरायण यांचे ज्ञान होते. त्याकाळी पाच वर्षांत दोन अधिक महिने, ऋतू आणि भारतीय महिने यांची सांगड घातली जात असे. उदा. रामायणात महर्षी वाल्मिकींनी रामाचा जन्म मध्यान्ही झाला, असे लिहिले आहे. अर्थात त्यावेळी आकाशातील ग्रह नेमके कुठे होते ही गोष्ट दिसणे शक्य नव्हते, पण महर्षी वाल्मिकींनी त्यावेळच्या ग्रहांची आकाशातील स्थाने दिली आहेत. त्यामुळे त्यांना पंचांगाचे गणितही येत होते,” असा सहज निष्कर्ष काढता येईल.
वसंत संपात बिंदू स्थिर नाही त्याला वक्र गती आहे. साधारणत: ७२ वर्षांनी तो एक अंशाने मागे सरकतो. पृथ्वीच्या परांचन गतीचा तो परिणाम आहे. पृथ्वीचा परिवलन इंच तिरका असून तो सुमारे २६ हजार वर्षांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. यालाच परांचन गती असे नाव आहे. याशिवाय सागराच्या भरती-ओहोटीमुळे पृथ्वीची परिवलन गतीही कमी होत आहे. म्हणजेच दिनमानही हळूहळू वाढत चालले आहे. या दोन गोष्टींचा खगोलशास्त्रीय विचार सॅाफ्टवेअरमध्ये केलेला दिसून येतो.
प्रफुल्ल मेंडकी यांनी नासाचे खगोलशास्त्रीय सॅाफ्टवेअर आणि वाल्मिकी रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह- नक्षत्रांची स्थिती आणि ग्रहणे यांची सांगड घालून नव्याने रामायणाचा काळ निश्चित केला आहे. रामायणाच्या काळात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. तसेच पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावत असल्यामुळे ‘डेल्टा टी’ नावाची काल शुद्धी लावून गणित करावे लागते. प्रस्तुत पुस्तकात या दोनही गोष्टींची माहिती लेखक प्रफुल्ल मेंडकी यांनी दिली आहे. ज्या वाचकांना भारतीय पंचांग, युगारंभ नक्षत्रे, अयन चलन, ज्युलियन आणि ग्रेगरियन कालगणना वगैरे गोष्टींची माहिती नसते त्यांना प्रफुल्ल मेंडकी यांच्या ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध‘ या ग्रंथातील ही दोन प्रकरणे उपयुक्त ठरतील.
प्रफुल्ल मेंडकी यांनी नव्याने रामायणाचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन ! प्रा. मोहन आपटे यांची मेंडकी यांच्या या पुस्तकाला ही प्रस्तावना लाभली आहे, ती वाचकांना अतिशय उपयुक्त वाटेल.
रामविवाह
इसवीसन पूर्व २८ एप्रिल ५६३२ , श्रावण शुद्ध ४ , रोजी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह झाला हे प्रफुल्ल मेंडकी यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
मघा हृद्य महाबाहो तृतीय दिवसे प्रभो ।
फल्गुन्यामुत्तरे राजंस्तस्मिन् वैवाहिकं कुरू ।
रामलक्ष्मणयोरर्थे दानं कार्यं सुखोदयम् ॥ ( ७१.२४ )
उत्तरे दिवसे ब्रह्मन् फल्गुनीभ्यां मनीषिण: ।
वैवाहिकं प्रशंसन्ति भगो प्रजापति: ॥ (७२.१३ )
- श्रावण शुद्ध ३ पूर्वा रोजी दशरथ राजाने गोदान वगैरे विधी केले.
प्रभाते काल्यमुत्थाय चक्रे गोदानमुत्तमम् ॥ (७२.२१ )
- २८ एप्रिल इ.स.पूर्व ५६३२ , श्रावण शुद्ध ४ उत्तराफाल्गुनी रोजी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह झाला.
युक्ते मुहुर्ते विजये सर्वाभरणभूषितै:।
भ्रातृभि: संहितेत राम कृतकौतुकमंगल:॥ ( ७३.९ )
रामराज्याभिषेक नव्हे, वनवासगमन अयोध्याकांड हे नियोजित रामराज्याभिषेकाने सुरू होते. रामाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिवशीच चैत्र शुद्ध ९ , पुष्य नक्षत्री २६ डिसेंबर इ.स.पूर्व ५६२४ यादिवशी रामराज्याभिषेक ठरविण्यात आला. या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात आणि सूर्य मीन राशीत होता असा उल्लेख आहे. परंतु, कैकयीने दशरथाकडे वर मागितला. रामाने १४ वर्षे दंडकारण्यात वल्कले नेसून राहावे आणि भरतास राज्याभिषेक व्हावा, असा तो वर होता. त्यामुळे रामराज्याभिषेकाऐवजी वनवासगमनाची तयारी सुरू झाली.
श्रीराम, लक्ष्मण आणि सीता नगरातून बाहेर जाण्यास निघाले तेव्हा आकाशाचे वर्णन महर्षी वाल्मिकींनी केले आहे.
त्रिशड्.कुर्लोहितागश्च बृहस्पतिबुधावपि ।
दारुणा: सोममभ्येत्य ग्रहा: सर्वे व्यवस्थिता: ॥ (४१.११ )
नक्षत्राणि गतार्चीषि ग्रहाश्च गततेजस: ।
विशाखाश्च सधूमाश्च नभसि प्रचकाशिरे ॥ (४१.१२ )
- मंगळ, बुध व शनी एका बाजूस तर गुरू, त्रिशंकू व विशाखा दुसर्या बाजूस याप्रमाणे चंद्रास सर्वांनी घेरले होते. वनवासगमनाची तारीख होती २७ डिसेंबर इ.स.पूर्व ५६२४, चैत्र शुक्ल १०, आश्लेषा नक्षत्र होते.
प्रफुल्ल मेंडकी यांनी दशरथ राजाच्या मृत्यूची तारीख २ जानेवारी इ.स.पूर्व ५६२३ चैत्र पौर्णिमा असल्याचे सांगितले आहे.
रामायणकाली ऋतू
रामायणकाली ऋतू हे वेगळ्या चांद्रमहिन्यात येत होते हे प्रफुल्ल मेंडकी यांनी स्पष्ट केले आहे.
चैत्र-वैशाखात शिशिर ऋतू, ज्येष्ठ-आषाढात वसंत ऋतू, श्रावण-भाद्रपदात ग्रीष्म ऋतू, आश्विन- कार्तिकात वर्षा ऋतू, मार्गशीर्ष- पौषात शरद ऋतू आणि माघ- फाल्गुनात हेमंत ऋतू येत होते.
यासंबंधी प्रमाण देताना मेंडकी म्हणतात, राम - भरत भेटीपूर्वी ( अयोध्याकांड ९४,९५ ) वसंत ऋतूचे वर्णन आहे. भरत रामास आषाढ महिन्यांत भेटला असा उल्लेख किष्किंधा कांडात (२८.५५) आहे. कारण, आषाढ महिन्यात वसंत ऋतू होता.
सीताहरण
जेव्हा सीतेने मृगाची मागणी केली तेव्हा राम लक्ष्मणास म्हणाले-
एक चैव मृग: श्रीमान् यश्च दिव्या नभश्चर: ।
उभावेतौ मृगौ दिव्यौ तारामृगमहीमृगौ ॥ (४३.३७ )
- हा आकाशातील मृग आहे आणि हा पृथ्वीवरील मृग आहे. असे दोन्ही मृग दिव्य आहेत. त्या दिवशी सूर्य व चंद्र मृग नक्षत्रात होते.
रावणाने सीताहरण केले तो दिवस १८ फेब्रुवारी इ.स.पूर्व ५६१० वैशाख अमावास्येचा होता.
हे सिद्ध करताना प्रफुल्ल मेंडकी यांनी महर्षी वाल्मिकी यांनी दिलेले काही खगोलशास्त्रीय दाखले उद्धृत केले आहेत.
वालीचा वध दि. ५ जून इ.स.पूर्व ५६१० रोजी झाला. त्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहण होते.
१७ सप्टेंबर इ.स.पूर्व ५६१० रोजी हनुमान श्रीलंकेस निघाला. २ ऑक्टोबर इ.स.पूर्व ५६१० रोजी पौष पौर्णिमा या दिवशी श्रीलंकेहून परत आला हेही लेखक महाशयांनी महर्षी वाल्मिकींनी दिलेल्या खगोलवर्णनावरून सिद्ध केले आहे. श्रीराम व सुग्रीव सैन्य घेऊन २ नोव्हेंबर इ.स.पूर्व ५६१० रोजी निघाले. २९ नोव्हेंबर इ.स.पूर्व ५६१० रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. या दिवशी श्रीामाचे सैन्य श्रीलंकेस पोहोचले. श्रीराम आणि रावण यांचे युद्ध झाले आणि १४ डिसेंबर इ.स.पूर्व ५६१० रोजी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी रावणाचा वध झाला, असे मेंडकी यांनी खगोलीय उल्लेखावरून सिद्ध करून दाखविले आहे. १७ डिसेंबर इ.स.पूर्व ५६१० रोजी श्रीराम सीतेसह श्रीलंकेहून निघून अयोध्येस परतले. त्यानंतर १६ फेब्रुवारी इ.स.पूर्व ५६०९ रोजी ज्येष्ठ शुक्ल ६ पुष्य नक्षत्रावर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. लव- कुश यांचा जन्म १३ एप्रिल इ.स.पूर्व ५६०८ रोजी श्रावण पौर्णिेमेच्या दिवशी झाला असल्याचे प्रफुल्ल मेंडकी यांनी महर्षी वाल्मिकींनी दिलेल्या दाखल्यावरून सिद्ध केले आहे.
मला महर्षी वाल्मिकी यांच्या अफाट बुद्धीसामर्थ्याचे आश्चर्य वाटते. ते प्रतिभासंपन्न कवी होते, महान साहित्यिक होते, महान विद्वान होते, इतिहासकार होते, खगोलतज्ज्ञ होते हे त्यांनी लिहिलेल्या रामायणावरून कळून येते. अशा या महान महर्षी वाल्मिकी ऋषींना मी विनम्र अभिवादन करतो.
‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध‘ या ग्रंथाचे लेखक प्रफुल्ल मेंडकी हे स्वत: इंजिनिअर होते. त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता. नासाशी पत्रव्यवहार करून त्यांनी केलेले संशोधन अगोदर तपासून घेतले होते. अथक मेहनत करून त्यांनी रामायणातील घटना ग्रेगोरियन तारखांमध्ये (ज्युलियन नव्हे !) सांगितल्या आहेत. आज प्रफुल्ल मेंडकी हयात नाहीत. परंतु या संशोधनाच्या रूपात ते आपल्यात आहेत. त्यांच्या या महान संशोधन कार्यास मी वंदन करतो.
प्रभू रामचंद्र आदर्श पुरूष होते. मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठीच त्यांची पूजा करावयाची असते. कर्तव्यतत्परता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श मित्र, उदार व नि:स्वार्थी मन, सदाचारी वृत्ती, एक वचनी, पराक्रमी, पितृभक्ती इत्यादी अनेक गुण प्रभू रामचंद्रांपाशी होते. रामराज्य एक आदर्श राज्य होते. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ ऋषींनी वेदविद्या शिकविली, तर विश्वामित्र ऋषीनी प्रभू रामचंद्रांना धनुर्विद्या शिकविली. जीवन कसं जगावे हे रामायण शिकविते. म्हणूनच वाल्मिकी रामायणाचा अभ्यास संपूर्ण जगभर होत आहे.
दा. कृ. सोमण
(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत)