भारत तोडणारे ‘हात’

    15-Apr-2024   
Total Views |
knaiya kumar
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली आणखी एक यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून कन्हैया कुमारला तिकीट दिले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या तिकिटावर बेगुसराय मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवली होती. परंतु, त्याचा दणदणीत पराभव झाला होता. कन्हैयाने नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याबदल्यात त्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. एकीकडे न तुटलेला, एकसंध असलेला भारत जोडण्यासाठी निघालेले राहुल गांधी आणि आता ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणांचा म्होरक्या कन्हैया कुमार. काँग्रेसला जर भारत खर्‍या अर्थाने जोडायचा असेल किंवा जोडायचे नाटक करायचे असेलही;परंतु, कन्हैया कुमारला तिकीट देऊन काँग्रेसचा खरा अजेंडा समोर आला आहे. एकीकडे ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढायची आणि त्याच भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणार्‍याला उमेदवारी जाहीर करायची, यातून काँग्रेसचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. बरं एवढेच नाही, तर कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘पोपट’, ‘रावण’ अशा उपमादेखील दिल्या. ज्याला भारत देशाविषयी तसूभरही प्रेम शिल्लक नाही, त्यानं पंतप्रधान मोदींना उपमा देणं, हेच मुळी हास्यास्पद. अशा भारतद्वेषी व्यक्तीला तिकीट देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली, हेच काँग्रेसचे दुर्दैव. त्यातच आता कन्हैया कुमारच्या समर्थकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाआईवरून शिव्यांची लाखोली वाहिली आहे. याबाबतचा व्हिडिओ ’भाजप छत्तीसगढ’ने ‘द एक्स’ अकाऊंटवरून शेअरही केला. व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी बिलासपूर पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला असून, आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कन्हैया कुमार माध्यमांशी बोलत असताना त्याने पंतप्रधानांना शिवीगाळ केली. विशेष म्हणजे कन्हैया कुमारने ना त्याला थांबवले, ना त्याला समज दिली. उलट हसत हसत निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हयात नाही, परंतु तरीही अशा विकृत मानसिकतेचे लोक आपले गटार तोंड उघडून अपशब्द काढत असतात. अशा विकृत मानसिकतेचे काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यासारखी दुर्दैव ते काय! इकडे भारतमातेविषयी ज्याला काडीचा लळा नाही, आस्था नाही, त्याच्याकडून मातृशक्तीच्या सन्मानाची अपेक्षा तरी कशी करणार म्हणा...
भरकटलेली ‘सायकल’
उत्तर प्रदेशात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव सध्या भलतेच गोंधळलेले दिसतात. सायकलवर स्वार होऊन विजयाची स्वप्न पाहणार्‍या अखिलेश यांनी उमेदवारांसोबत जणू गंमतजंमत सुरू केली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार बदलले असून, तळ्यात-मळ्यातची भूमिका कुठवर सुरू राहील, हा प्रश्नच आहे. निवडणुकीआधीच ‘सायकल’ पंक्चर झालीय, तर काँग्रेसला उमेदवारांची शोधाशोध करावी लागतेय. दुसरीकडे सपाने इतक्या वेळा उमेदवार बदलले की, जनता आणि कार्यकर्ते दोघेही चिंतेत आहे. उमेदवारी जाहीर झाली आणि कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार सुरू केला की, पुन्हा त्याचे तिकीट कापल्याने कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. ‘इंडिया’ आघाडीत सहभागी असलेल्या सपाला उत्तर प्रदेशात ६३ जागा मिळाल्या. त्यातील एक जागा त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडली. ही जागा ममतांना का सोडली, हे न सुटलेले कोडे. दरम्यान, मेरठ लोकसभेसाठी सपाने प्रथम भानू प्रताप, नंतर अतुल प्रधान आणि नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सुनीता वर्मा यांना तिकीट दिले. गौतम बुद्धनगर सर्वप्रथम महेंद्र नगर, नंतर राहुल अवाना आणि पुन्हा महेंद्र नगर यांनाच उमेदवारी दिली. मिश्रीख लोकसभेसाठी रामपाल राजवंशी यांना तिकीट दिले होते. मात्र त्यांनी आजारी असल्याचे सांगत पुत्र मनोज राजवंशी यांना तिकीट दिले. यानंतर पुन्हा उमेेदवार बदलून मनोज राजवंशी यांच्या पत्नी संगीता राजवंशी यांना तिकीट दिले गेले. म्हणजे एकाच घरात तीनवेळा उमेदवार बदलला. बागपत, बिजनौरमध्येही सपाने उमेदवार बदलला. मुरादाबादमध्येही एसटी हसन यांना तिकीट देण्यात आले, त्यानंतर रुची वीरा यांना चिन्ह देण्यात आले, त्यानंतर दोघांनीही उमेदवारी दाखल केली आणि आता पक्षाने रुची वीरा याच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. बदायूमध्ये आता शिवपाल सिंह यादव यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली. मध्य प्रदेशातील खजुराहोतून मनोज यादव यांना उमेदवारी दिली होती. दोन दिवसांनी त्यांचे तिकीट कापल्यावर सपाने मीरा यादव यांना उमेदवारी दिली. सध्या केवळ दोन टप्प्यांसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशात गोंधळलेले अखिलेशबाबू अजून कोणती अदलाबदली करतात, ते पाहावे लागेल.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.