मुंबई (विशेष प्रतिनिधी): मध्यप्रदेश वन विभाग आणि वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट (डब्लूसीटी) यांनी युरेशियन पाणमांजराला (Otter tagged) टॅग केले आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला असून यामध्ये पाणमांजराच्या शरीरावर व्ही. एच. एफ. पद्धतीचा टॅग लावण्यात आला आहे (Otter tagged). युरेशियन पाणमांजराला टॅग करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. (Otter tagged)
भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. यामध्ये स्मूथ कोटेड ऑटर, एशियन स्मॉल क्लॉव्ड ऑटर आणि युरेशियन ऑटर या प्रजातींचा समावेश होतो. यापैकी स्मूथ कोटेड ऑटर (Otter) वगळल्यास इतर दोन्ही प्रजातींची नोंद मध्य भारतातून करण्यात आली नव्हती. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली मध्य भारतातून युरेशियन ऑटरची (Otter) पहिली छायाचित्रीत नोंद करण्यात आली. या प्रजातीच्या पाणमांजराची नोंद नसल्यामुळे त्यांच्यावर अभ्यास झालेला नव्हता. युरेशियन ऑटरचे खाद्य काय, अधिवास कोणता, प्रवासाच्या आणि प्रजननाच्या क्रिया याबद्दलचा कोणताही अभ्यास उपलब्ध नव्हता.
'डब्लूसीटी'चे काही संशोधक या पाणमांजरावर गेली चार वर्ष अभ्यास करत आहेत. यामध्ये या पाणमांजराच्या विष्टेवरून त्याचे खाद्य आणि अधिवास लक्षात येऊ लागल्या आहेत. यावर अधिक सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून युरेशियन पाणमांजराला टॅगिंग करण्याचे ठरवण्यात आले. दिड वर्षापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये एका युरेशियन ऑटरला टॅग लावण्यात आला होता. मात्र, टॅग पडल्याने त्यामधून फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यामध्ये पुन्हा एका मादी युरेशियन ऑटरला व्ही.एच. एफ टॅग लावण्यात आला असून साधारण या टॅगचे वजन ३० ग्रॅम इतके आहे. तर, त्या तुलनेत पाणमांजराचे वजन चार किलो असल्यामुळे टॅगचा त्याला काहीही त्रास होण्याची शक्यता नाही, असे संशोधकांनी सांगितले.
कसे केले युरेशियन ऑटरचे टॅगिंग?
सातपुडा व्याघ्र प्रकल्पामध्ये युरेशियन ऑटरच्या मादी पाणमांजराला टॅग लावण्यात आला आहे. पूर्ण वाढ झालेल्या या मादीचे वजन चार किलो असून तिच्या पाठीवर हा टॅग लावण्यात आला आहे. पुर्वीच्या संशोधनामध्ये टॅग पडून गेल्यामुळे यावेळी त्याबाबत काळजी घेण्यात आली असून पाणमांजराच्या पाठीवरील केस विरळ करण्यात आले. त्यावर सर्जीकल गमचा वापर करत हा टॅग लावण्यात आला. साधारण ३० ग्रॅम वजनाचा हा टॅग असून पाणमांजराचे त्या भागातील केसांची पुन्हा वाढ झाल्यानंतर तो टॅग आपोआप पडून जाईल, अशी माहिती डब्लूसीटीचे संचालक डाॅ. अनिश अंधेरिया यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. साधारण या प्रक्रियेमध्ये संशोधकांच्या हाती चार महिन्यांचा डेटा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यप्रदेश वनविभाग आणि 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट' यांनी ऍस्ट्रल फाऊंडेशन आणि अल्काईल अमाईन्स फाऊंडेशन यांच्या आर्थिक सहाकार्याने हा प्रकल्प राबवला आहे.
कसे करणार संशोधन?
पाणमांजराच्या पाठीवर असलेल्या व्ही. एच. एफ. टॅगचे दुसऱ्या यंत्रावर बिप्स ऐकू येतील. त्या आवाजाप्रमाणे संशोधकांना पाणमांजराच्या जवळपास राहून किंवा पाठलाग करत लक्ष ठेवायचे आहे. यासाठी आदित्य जोशी आणि प्रसाद गायधानी या दोन्ही संशोधकांसमवेत टीम काम करत आहे. या अभ्यासामुळे परिसरातील ऑटरच्या हालचाली, अधिवास याबाबत माहिती मिळवण्यासाठी मदत होणार आहे.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.