सांगलीत विशाल पाटलांना धक्का! स्वाभिमानीनं घेतली एन्ट्री
12-Apr-2024
Total Views | 1160
सांगली : एकीकडे सांगली लोकसभेवरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मतदारसंघात एन्ट्री घेतली आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता स्वाभिमानी संघटनेने इथे आपला उमेदवार जाहीर केल्याने विशाल पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा उबाठा गटाकडे गेली आहे. उबाठा गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीचे तिकीट दिले आहे. मात्र, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील याठिकाणी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
दरम्यान, आता सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. स्वाभिमानीने महेश खराडे यांना सांगली लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विशाल पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, हातकणंगलेच्या जागेसाठी उबाठा गटाने राजू शेट्टींना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणे. हे मी कदापी करणार नाही आणि माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी याला नकार दिला होता.