वनकर्मचाऱ्यांनी उचलेले दीड टनाचे गवे; संजय व्याघ्र प्रकल्पात ५० गव्यांच्या स्थानांतरणाला यश
11-Apr-2024
Total Views | 101
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामध्ये ५० रानगव्यांचे स्थानांतरण करण्यात 'भारतीय वन्यजीव संस्थान'ला (डब्लूआयआय) यश मिळाले आहे (gaur translocation). स्थानांतरण प्रकल्पामधील शेवटचे सहा गवे ८ आणि ९ एप्रिल रोजी कान्हा प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले (gaur translocation). कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचाऱ्यांनी दीड टनाचे गवे खांद्यावरून वाहून वाहनांमध्ये हलवले (gaur translocation). महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केलेल्या गव्यांनी वासरांना देखील जन्म दिला आहे. (gaur translocation)
मध्यप्रदेशमधील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामधून साधारण २५ वर्षांपूर्वी गवे नष्ट झाले. गेल्या काही वर्षात याठिकाणी वाघांचा अधिवास वाढला. त्यामुळे वाघासाठी प्रकल्पामध्ये मोठे भक्ष्य असणे आवश्यक होते. म्हणून मध्यप्रदेश वन विभागाने गव्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वप्रथम 'डब्लूआयआय'ला यासंदर्भातील सखोल अभ्यास करण्यास सांगितले. अभ्यासाअंती संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात गव्यांचे स्थानांतरण करणे शक्य असल्याचे सांगून कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पामधून गवे आणण्यास 'डब्लूआयआय'ने हिरवा कंदिला दाखवला. या स्थानांतरणासाठी वन विभागाने 'डब्लूआयआय'च्या तज्ज्ञांचा गट तयार केला आणि त्यांच्यावर स्थानांतरणाची जबाबदारी सोपवली. गेल्या वर्षभरात 'डब्लूआयआय'ने क्रमाक्रमाने कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात ४४ गव्यांचे स्थानांतरण पूर्ण केले. उरललेल्या सहा गव्यांचे स्थानांतरण हे ८आणि ९ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आले.
गव्यांच्या स्थानांतरणाचा हा प्रकल्प आमच्या टीमसाठी आव्हानात्मक असल्याची प्रतिक्रिया 'डब्लूआयआय'चे संचालक विरेंद्र तिवारी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. गव्यांच्या स्थानांतरणासाठी सर्वप्रथम गव्यांच्या कळपांची निवड करण्यात आली. एकाच कळपातील गव्यांची स्थानांतरणासाठी निवड झाली, जेणेकरुन नव्या अधिवासात त्यांचा कळप एकसंध राहिल. पाळीव हत्त्तींच्या मदतीने गव्याचा कळप हेरून त्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध गव्यांचे वजन करुन त्यांची मोजमापे घेण्यात आली. नव्या अधिवासातील त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांची ओळख पटावी म्हणून काही गव्यांच्या गळ्यात विविध रंगांचे रेडिओ काॅलर बसविण्यात आले. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या गव्यांना उचलून वाहनांमध्ये हलवले. क्रेनच्या सहाय्याने गव्यांना हलवणे जोखमीचे असल्याने वन विभागाने वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने गव्यांना हलवण्याचा निर्णय घेतला होता. साधारण एक टनाच्या गव्याला हलवण्याची उमेद वनकर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी मातीने भरलेल्या एक टनाच्या गोणी लोखंडी स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. हा स्ट्रेचर दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी उचलण्याची तयारी केली. त्यानंतर स्थानांतरण पार पडल्याचे तिवारी यांनी सांगितले. वाहतुकीनंतर संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात गवे दाखल झाल्यावर देखील त्यांना काही दिवसांसाठी बंद अधिवासात ठेवण्यात आले. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात ५० गवे स्थानांतरित झाले असून ४४ गव्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. उर्वरित सहा गवे लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत.