मुंबई : चला आरशात बघुया असे म्हणत मनसेने उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या दुहेरी भूमिकांचा पाढाच वाचला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी ठाकरेंच्या भाषणाचे अनेक जुने व्हिडीओही पोस्ट केले आहेत.
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच मनसेने महायूतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर सभा घेत महायूतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली.
यावरुन उबाठा गटाकडून टीका करण्यात आली होती. यावर आता संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकांवरून जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे काही जुने व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. या सर्व पोस्टला त्यांनी 'चला आरशात बघुया' असे शीर्षक देत ठाकरेंना डिवचले आहे.