गडचिरोली : गडचिरोलीचा कायापालट करणं हे एकमेव ध्येय असून वेळ आल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण गडचिरोलीचं सोडणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी गडचिरोली येथे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी स्वत: गडचिरोली जिल्हा मागून घेत माझ्याकडे पालकमंत्रपद घेतलं आहे. माझी कुठलीही संस्था नसून मी २४ तास सामाजिक काम करतो. गडचिरोलीचा कायापालट करणं आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणं हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर वेळ पडल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण गडचिरोलीचं सोडणार नाही. जोपर्यंत गडचिरोलीचा विकास होत नाही तोपर्यंत याकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय मी घेतला आहे."
"विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबई ते गडचिरोली हे अंतर आता ८,९ तासांत पूर्ण करण्यात येणार आहे. पुढच्या १५ वर्षांमध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखवणार आहोत," असे आश्वासन त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, "मोदीजींनी आज २० कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्क्या घरात आणलं. गरीबाचा विकास करुनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते, हे मोदीजींनी दाखवून दिलं. २०१३ साली आपला देश अर्थव्यवस्थेत अकराव्या क्रमांकावर होता. मोदीजींनी गरीबाची सेवा करुन तो पाचव्या क्रमांकावर आणला. पुढील पाच वर्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहेत. या सर्व कामांमुळेच मोदीजींकडे जगातला सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पाहिलं जातं," असेही ते म्हणाले.