सापांचे रेस्क्यू, पर्यावरणाविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित करणार्या, नगरच्या विवेक दातिर यांचा हा प्रवास...
गेल्या ११ वर्षांपासून सर्पमित्र म्हणून अनेक सापांचे रेस्क्यू करणारे, तसेच गेली कित्येक वर्षं पर्यावरणाबाबत जनजागृतीचे काम करणार्या विवेक दातिर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गनोरे गावात झाला. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या छोट्याशा गावातून केले असून, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. शेतकरी कुटुंब आणि ग्रामीण भागातच जन्मलेल्या विवेक यांना निसर्गाची आवड. शालेय जीवनात निबंध लेखनाचीही आवड असलेल्या विवेक यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेत, अनेक पारितोषिके मिळवली.
दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी गावामध्ये सोय नसल्यामुळे, त्यांच्यासहित अनेकांनी शहराची वाट धरली. संगमनेरच्या सह्याद्री महाविद्यालयात केवळ दहावीला चांगले टक्के आहेत, या जोरावर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. बारावी उत्तीर्ण करून पुढे इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला खरा; पण मन रमेना म्हणून पहिल्या वर्षानंतर त्यांनी इंजिनिअरिंग सोडलं. किमान पदवी आपल्या हातात हवी, अशा हेतूने मग विचार सुरू झाला आणि पुन्हा कळपात सामील होत, त्यांनी ’बीएससी’ करण्याचे ठरवले. संगमनेरच्या महाविद्यालयातून त्यांनी आपली पदवी पूर्ण केली. पदवीचे शिक्षण सुरू असताना, सापांबद्दल काही कार्यशाळा महाविद्यालयात घेतल्या जाऊ लागल्या.
तिथे पहिल्यांदा सापांची ओळख झाल्यानंतर, विवेक यांना या वेगळ्या नवीन जगाविषयी कुतूहल निर्माण झाले. दैनंदिन जीवनात सापांशी संपर्क येणार्या सापासारख्या जीवाविषयी आपल्याला फार माहिती नव्हती; पण या माहितीचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो, असे त्यांनी ठरवले. पुढे सापांशी मैत्री करणार्या विवेक यांनी २०१३ पासून सापांचे रेस्क्यू करायला सुरुवात केली. गेली ११ वर्षं अविरतपणे ते साप रेस्क्यूचे काम करत आहेत. त्याचबरोबर गावागावांमध्ये सापांविषयी जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने गावकर्यांना माहिती देण्यासाठी घेतल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वयंसेवक म्हणून जायला सुरुवात केली. पुढे पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याची असे ठरवून, त्यांनी संगमनेर महाविद्यालयातच ’एमएससी’ला प्रवेश घेतला. ‘एमएससी’बरोबरच विविध अभ्यासक्रम तसेच रेस्क्यूचे काम ही चालू होते. या दरम्यान त्यांनी ’झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (ZSI) अंतर्गत ‘पॅराटॅक्झोनॉमी’चा हा कोर्स केला. समाजमाध्यमांवर रेस्क्यूबद्दलचे तसेच इतर कामांची माहिती टाकल्यामुळे, अनेक जण त्यांच्याशी जोडले गेले असून, वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करणार्या जोस लूईस यांनी त्यांना कौतुकाची थाप म्हणून रेस्क्यूचे किट भेट दिले होते.
समाजमाध्यमांचा आणखी एका चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला वापर म्हणजे, सापाच्या रेस्क्यूबाबतच्या सर्व गोष्टी ’बिगमॅप’ या अॅपवर त्यांनी नोंद करून ठेवल्या आहेत. यामुळे सापांच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रजातींचा ही रेकॉर्ड उपलब्ध राहतो. याच क्षेत्रामध्ये त्यांना अनेक ठिकाणी कामाचा अनुभव असून, त्यांनी BAIF या संस्थेमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले आहे. ’महाराष्ट्र जनूक कोष प्रकल्पा’अंतर्गत पारंपरिक पिके आणि देशी बियाणे यावर पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्यासमवेत संशोधन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर ’पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ (PBR) साठी ते प्रशिक्षण घेण्याचे काम २०१९ सालापासून करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी ’पानी फाऊंडेशन’ तसेच विविध गावांतील सर्वेक्षण करण्याचे काम केले आहे. तसेच पुण्यातील ’वेदांता कन्सल्टिंग’बरोबर ते प्रशिक्षण व इतर काम करतात.करिअरच्या संधींसाठी मदत व मार्गदर्शन, शिक्षण क्षेत्रामध्ये काम, हवामान आणि वातावरण बदलावर आधारित मार्गदर्शन व जनजागृतीपर संदेश अशा अनेक प्रकारचे काम करणार्या विवेक यांना संजीवनी शेती व विकास संस्थेमार्फत ’समाजभूषण पुरस्कारा’ने २०२२ साली गौरविण्यात आले आहे.
युवकांसाठी काम करणार्या विवेक यांनी संगमनेरमध्ये २०२० मध्ये ‘रूरल युथ डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी’ची (RYDES) स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या, बदलत्या तंत्रज्ञानाच्या विश्वात मूलभूत शिक्षण, अद्यावत कौशल्य विकसित करून शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच स्थानिक पातळीवर शिक्षण, कृषी, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यवसायिक संधी शोधून रोजगार निर्मिती करावी, या भूमिकेतून त्यांनी या संस्थेची निर्मिती केली. ”महाविद्यालयीन तरुणांनी पदवी शिक्षण पूर्ण करताना इंडस्ट्रीज, कॉर्पोरेट आणि पसेमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेत शिकणे गरजेचे आहे. केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता, व्यवसायिक संधी ही युवकांनी शोधून, शाश्वत रोजगारनिर्मिती करायला हवी,” असे ते सांगतात.ग्रामीण भागातच शिकलेला, वाढलेला तरूण अशाप्रकारे जेव्हा पर्यावरण क्षेत्र, गावातील युवकांसाठी दिशादर्शनाचे काम करतो, त्यावेळी गावकर्यांना वाटणारा अभिमान आणि तरुणांना वाटणारा आधार नक्कीच निराळा असतो. ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणार्या, या पर्यावरणाच्या कार्यकर्त्याला दै. ’मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.