भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
10-Apr-2024
Total Views | 25
नवी दिल्ली : मोदी सरकार देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत; असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये केला. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील वेल्लोर आणि मेट्टुपालयम येथे जाहिर सभांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, द्रमुकने तामिळनाडू आणि देशाच्या भावी पिढीला उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. द्रमुकच्या कार्यकाळात शाळकरी मुलेही अमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे द्रमुक कुटुंबाशी संबंध आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
द्रमुक पक्षाचे राजकारण फूट पाडा आणि राज्य करा यावर आधारित असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, देशात फूट पाडण्याचे काम द्रमुक करत आहे. द्रमुक हे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे दुसरे नाव आहे. आज देश ५ जी तंत्रज्ञानात जागतिक विक्रम करत आहे. मात्र, एकेकाळी याच द्रमुकने टूजी घोटाळा करून देशाची बदनामी केली होती. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत आहे. मोदी सरकार भ्रष्टाचार हटवा म्हणते तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा असा नारा देत असल्याचाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला.
कच्छथीवू बेट श्रीलंकेस देण्याविषयी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. काँग्रेस सत्तेत असताना श्रीलंकेला कच्छथीवू बेट देण्यात आले. कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला यावर काँग्रेस मौन बाळगून आहे. काही दिवसांपूर्वी आमचे मच्छिमार तेथे पकडले गेले, यावरही काँग्रेसने मत व्यक्त केले नाही. मात्र, त्या मच्छिमारांना केंद्र सरकारने सोडवून आणले. त्यामुळे द्रमुक आणि काँग्रेस हे तामिळनाडूच्या हिताचे शत्रू असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.