शुष्क वातावरण, रणरणत्या उन्हाने भेगाळलेली जमीन, पाण्याच्या अभावामुळे कोरडवाहू झालेली जमीन, जळून गेलेली पिके आणि थेंबाथेबासाठी आसुसलेला बळीराजा... दुष्काळ अशा विदारक वर्णनातून पुढे उभा ठाकतो. भारतासह आशिया खंडात नुकताच सुरू झालेला उन्हाळा. मी म्हणत असतानाच, पाणीटंचाईचं गंभीर संकट उभं राहतंय. केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक भागांमध्ये २०२४च्या सुरुवातीलाच दुष्काळमय स्थिती निर्माण झाली असून, यावर तत्परतेने पावले उचलणे गरजेचे आहे.
अटलांटा परिसरात दुष्काळसदृश स्थितीमुळे नुकतीच नैसर्गिक आपत्तीची घोषणा करण्यात आली. याबरोबरच इटली, स्पेन, कॅनरी बेटे, आग्नेय युरोपचे काही भाग, अमेरिकेतील काही भाग यांमध्ये देखील हीच स्थिती. अटलांटामधील पीच या राज्याला दुष्काळाचा विळखा बसला असून, या राज्यातील अनेक पिकांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. जॉर्जियातील ३० हून अधिक ठिकाणांवर दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणांना नैसर्गिक आपत्ती आलेली प्राथमिक ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. (United States Department of Agriculture)ने ही ठिकाणे घोषित केली असून, या क्षेत्रांमध्ये अटलांटातील दहा महानगरीय क्षेत्रांचा ही समावेश आहे.
अटलांटातील पीच हे राज्य शेंगदाणे, पेकान्स, ब्लूबेरी अशा पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य आहे. दुष्काळाचा फटका याच पिके आणि फळबागांना बसला असून संपूर्ण शेते जळून गेली आहेत. याबरोबरच अतिउष्णतेमुळे वणव्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामध्ये वन अधिवासाबरोबरच शेतजमिनींना सातत्याने आग-वणवे लागत आहेत. वन अधिवासांना लागलेल्या वणव्यांमुळे जैवविविधतेचे तसेच काही इतर प्रजातींचे नुकसान ओढवते, तर शेतीमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे शेतीपिकांचे नुकसान होते. पाळीव जनावरांच्या खाद्याचा प्रश्न उभा राहिल्यामुळे, त्यांचे हाल होऊन, ते मरण पावण्याचीदेखील शक्यता असते.
’नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’च्या (NOAA) म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये कमी पावसामुळे उत्तर जॉर्जियामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ पडला. दुष्काळामुळे जॉर्जियातील वणव्याचा धोकाही वाढला आहे, असे (v)ने म्हटले आहे.
गत वर्ष २०२३ हे आतापर्यंतच्या भूतकाळातील सर्वाधिक उष्ण वर्ष होते, असे सांगणारे अनेक अहवाल आणि वृत्त आहेत. ‘अल निनो’ आणि ‘ला निना’ यांच्या प्रभावामुळे तसेच वातावरण बदलामुळे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. पण, सरतेशेवटी या सर्वाला जबाबदार कोण? तर आपणच! जगभरातील काही देशांमध्ये तसेच इतर काही भागांमध्ये आलेली दुष्काळ स्थिती असेल किंवा येऊ घातलेली दुष्काळ स्थिती असेल, ती नैसर्गिक आपत्ती म्हणवली जात असली, तरी ती मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीच म्हणावी लागेल. बेसुमार जंगलतोड, प्रचंड वाढते औद्योगिकीकरण, वेगाने वाढणारी सिमेंटची जंगले, मोबाईल टॉवर्सची संख्या, प्रदूषणात झालेली प्रचंड वाढ हे सर्व घटक याला कारणीभूत ठरत असले तरी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
भारतसुद्धा या आघाडीत मागे नाही. पुढील संपूर्ण आठवडा उष्णेतच्या लाटेमुळे तापदायक राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच भारतातील काही भागात मोठाले वणवे लागल्याच्या घटनाही अलीकडल्या काळात घडल्या आहेत. सुदैवाने दुष्काळजन्य परिस्थिती अद्याप कुठल्याही राज्य किंवा जिल्ह्यात नोंदविली गेली नसली तरी देशातील उष्णतेचे प्रमाण पाहता, तो दिवस फार लांब नाही, असेच म्हणता येईल.
ग. दि. माडगुळकरांच्या ‘पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा’ ही कवितेची ओळ आठवते. दुष्काळजन्य स्थिती टाळायची असल्यास, डोंगरालाच काय तो पान्हा लवकर फुटावा अशीच अपेक्षा! मानवाने मात्र पर्यावरणाचा चालवलेला र्हास आपापल्या परीने कमी कसा करता येईल, याचीच विचारशील कृती या घडीला गरजेची आहे.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.